महापालिका शाळेतील २२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना ‘डीबीटी’ योजनेद्वारे शालेय गणवेष वाटप करण्यात येणार आहे. गणवेश वाटपास सध्या सुरुवात झाली आहे. यामध्ये एक पीटीचा गणवेश, दोन शालेय गणवेश, एक स्काऊट गाईडचा गणवेश देण्यात आला आहे.
मार्च अखेरपर्यंत उर्वरित सर्व विद्यार्थ्यांना डीबीटी योजनेद्वारे गणवेशाचा लाभ घेता येणार आहे. २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी शालेय गणवेशासाठी १२ कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे, अशी माहिती उपायुक्त योगेश कडुस्कर यांनी दिली आहे.
राज्यातील श्रीमंत महापालिका म्हणून नवी मुंबई महापालिकेची ओळख आहे. शहरातील गरीब कुटुंबांतील विद्यार्थ्यांना देखील दर्जेदार शिक्षण घेता यावे यासाठी महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून शाळांच्या प्रशस्त इमारती उभारल्या आहेत.
यामध्ये विविध सुविधादेखील देण्यात येत आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू आदी माध्यमाच्या आणि सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरू आहेत. यामुळे महापालिका शाळांमध्ये दरवर्षी विद्यार्थ्यांची पटसंख्यादेखील वाढत आहे.
शैक्षणिक वर्ष २०१४-१५ मध्ये शासनाच्या माध्यमातून डीबीटी योजनेंतर्गत गणवेष आणि अन्य शालेय साहित्य देण्याच्या सूचना दिल्या होत्या. शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून या धोरणाच्या अंलबजावणीला सुरुवात करण्यात आली होती.मात्र याला पालकांचा फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने ई-रूपी प्रणालीद्वारे हे साहित्य देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता.
यासाठी निविदा प्रक्रियाही राबवण्यात आली होती. तसेच विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या गणवेशासह सर्व शैक्षणिक साहित्याच्या नमुन्याची पडताळणी प्रयोगशाळांद्वारे करण्यात आली होती; मात्र या संदर्भात कार्यवाही अंतिम टप्प्यात असतानाच आयुक्तांना डीबीटीतून गणवेश वगळण्यात आल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले.
त्यामुळे गणवेश वगळता अन्य साहित्य ई-रूपी प्रणालीद्वारे देण्याचे ठरले. मात्र निविदा काढून गणवेश पुरवठा करण्यास विलंब होणार असल्याने पूर्वीप्रमाणे डीबीटी योजनेद्वारे विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार बालवाडी ते १० वी पर्यंतच्या २२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना ‘डीबीटी’ योजनेद्वारे गणवेश उपलब्ध झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.