Mumbai Loksabha: नाराज शिवसेना शिंदे गटाचे सांत्वन करण्यासाठी भाजपने दोन पावले पुढे टाकली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सन्मान राखण्यासाठी त्यांच्या धनुष्यबाणाला १३ जागा देण्याचे निश्चित झाल्याचे समजते.
शिंदे गटातील एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले, की स्व. आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांची कर्मभूमी असलेला ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला दिला जाणार असून दक्षिण-मध्य मुंबईचा अपवाद वगळता पाचही जागा भाजप लढवेल.
उत्तर-पश्चिम मुंबईचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी शिंदे यांच्या बंडात साथ दिली असली, तरी त्यांचा मुलगा अमोल कीर्तिकर हेच शिवसेना उबाठाचे उमेदवार असल्याने त्या मतदारसंघाचा आग्रह सोडा, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. या मतदारसंघात जिंकून येणारा चेहरा नसल्याने शिंदेंनीही या जागेसाठीचा आग्रह सोडून दिला आहे.
मुंबई कोकण टापूतील शिवसेनेचे गारूड लक्षात घ्या, असे निवेदन शिंदेंनी केले होते. धनुष्यबाण या चिन्हाची लोकप्रियता लक्षात घ्यायला हवी असे ठरले आहे.
शिंदेंच्या गटाची मतबेगमी हाही भाजपसाठी शिवसेना पक्षाचे महत्त्व कायम ठेवण्यासाठी महत्त्वाचा विषय आहे. निवडणूक आयोगाची मान्यता कायम राहण्यासाठी मतांची बेगमी करावी लागेल. भाजपच्या काही चेहऱ्यांना सामावून घेण्याची शिंदे गटाने तयारी दाखवली आहे.
दोन जागांवर भाजप त्यांचे उमेदवार शिंदेंना देऊ शकेल असे सांगण्यात येते आहे. त्या स्थितीत शिवसेना शिंदेंना १३; तर राष्ट्रवादी अजितदादांना ४ जागा दिल्या जातील, असे सांगण्यात येते. त्या स्थितीत भाजप ३१ जागा लढेल. महाराष्ट्रातील शिवसेना शिंदे गट तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट यांच्याशी जागावाटपाबाबत १४ मार्चच्या सुमारास चर्चा होण्याची शक्यता आहे; मात्र गरज वाटली तर भाजप नेते आम्हाला बोलावतील, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले.
संसदीय मंडळाच्या बैठकीत भाजप लढणार असलेल्या जागांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य या नात्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजच्या बैठकीसाठी रवाना झाले आहेत; मात्र त्यांच्यासमवेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दिल्लीला गेल्याने आज महाराष्ट्रावरील चर्चेचीही शक्यता आहे.
भाजपने २० जागांवरील उमेदवार निश्चित केले आहेत असेही सांगण्यात येते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्यावर कोणताही अन्याय होणार नसून सोयीचे मतदारसंघ आम्हाला मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.Loksabha
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.