Mumbai News: पाण्याच्या टाकीला जर झाकण लावले असते तर आता माझी दोन्ही मुले माझ्यासोबत असती. मुले कधीच उद्यानात जात नाहीत; मात्र रविवार असल्याने ती गेली. वेळ झाला तरी घरी परतली नाहीत, म्हणून शोधाशोध सुरू केली. शेवटचा पर्याय म्हणून आम्ही उद्यानातील टाकीत त्यांचा शोध घेतला. या टाकीत माझ्या मुलांचे मृतदेह आढळले. उद्यानात काय घडले हे सांगताना आई सोनू कवेठिया यांच्या अश्रूंचा बांध फुटत होता.
यापूर्वी या झोपडपट्ट्या हटवल्या होत्या. त्यातील अर्धे माहुल गावात पाठवले. मात्र भाडे देण्यासाठी पैसे नसल्यामुळे कवेठिया कुटुंब फूटपाथवर राहतात. कपड्याच्या मोबदल्यात प्लास्टिकची भांडी देण्याचा कवेठिया यांचा व्यवसाय आहे. यात दिवसाला २०० ते ३०० रुपये सुटले की एक वेळच्या जेवणाची सोय होते.
सुरक्षारक्षकांची अपुरी संख्या
माटुंगा भागातील हे मोठे आणि प्रशस्त उद्यान आहे. उद्यान मोठे असल्यामुळे सुरक्षा रक्षक कमी पडतात. दिवसा चार आणि रात्री दोन सुरक्षारक्षक येथे तैनात असतात. रात्री गर्दुल्यांचा त्रास वाढला आहे. हे तरुण सुरक्षारक्षकांना धमकवतात. उद्यानाच्या सुरक्षाभिंत आणि जाळ्यादेखील तुटलेल्या अवस्थेत आहेत. अनेकदा पाण्याच्या टाकीवरचे लोखंडी झाकणेही गर्दुले चोरून नेतात, असे रहिवाशांनी सांगितले.
मुले उद्यानात जात नाहीत; मात्र रविवारी दोघेही खेळायला गेली. सीसीटीव्ही फुटेजमध्येही ते दिसत आहेत. उद्यानातील पाण्याच्या टाकीवरचे झाकण नसल्यामुळे त्यांचा जीव गेला.
- सोनू कवेठिया, मृत मुलांची आई
मुंबईत कुठेही घर उपलब्ध करून देण्याची मागणी आम्ही वार्ड अधिकाऱ्यांकडे केली आहे.
- कांजी कवेठिया, मृतकांचे काका
मुलांची खेळणी दुसऱ्या बाजूला आहेत. मुलांना येथे येण्याची गरज नव्हती. दुसरीकडे जायला सांगितले, तरी मुले जात नाहीत. आम्हाला गर्दुल्यांचा त्रास आहे. या संदर्भात पोलिस आणि वॉर्ड अधिकाऱ्यांकडेही पत्रव्यवहार केला आहे.
- अजयकुमार रावत, सुरक्षारक्षक
ठेकेदारावर या दुर्घटनेप्रकरणी कारवाई व्हायला हवी. निष्काळजीपणामुळे या मुलांचा जीव गेला. मृत बालकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यायला पाहिजे.
- रवी राजा, माजी विरोधी पक्षनेते, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.