Mumbai News: जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून डॉ. सुनीता सावरकर लिखित आणि ग्रंथाली प्रकाशित ‘ढोर चांभार स्त्रियांच्या आंबेडकरी जाणिवांचा परिघ’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला.
ज्येष्ठ लेखिका ऊर्मिला पवार यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. एसएनडीटी महिला विद्यापीठाचा पदव्युत्तर इतिहास विभाग आणि एसएनडीटी कला आणि चं. भो. वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
पदव्युत्तर इतिहास विभाग आयोजित हिरालाल गुप्ता स्मृती व्याख्यान देताना लेखिका डॉ. सुनीता सावरकर यांनी या पुस्तकाच्या निर्मितीचा प्रवास उलगडून दाखवला. एकूण मराठी तसेच दलित साहित्यामध्येही ढोर चांभार समाजातील अनेक महिलांच्या सामाजिक योगदानाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. १९३९ मध्ये सावित्रीबाई बोराडे या पहिल्या महिला शिक्षिकेने समाजाला एक हजाराची देणगी दिली.
अनुसया शिवतरकर यांनी १९३४ मध्ये बाबासाहेबांचा जन्मदिन साजरा करण्यामागचे महत्त्व समजावून सांगितले. या समाजातील महिलांनी पँथर चळवळीतदेखील उल्लेखनीय काम केले. अशाच १२ ते १३ कर्तृत्ववान महिलांचे दलित आणि आंबेडकरी चळवळीतील योगदानाचा या पुस्तकातून आढावा घेतल्याचे लेखिका डॉ. सुनीता सावरकर यांनी सांगितले.
पुस्तक वाचताना इतिहासात दडलेल्या ढोर चांभार कर्तृत्ववान स्त्रियांचा शोध घेताना लेखिकेला किती अडचणींचा सामना करावा लागला असेल, याची प्रकर्षाने जाणीव झाल्याचे ऊर्मिला पवार यांनी सांगितले; तर महिला दिनाचे औचित्य साधून या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन केल्याचे प्राचार्या डॉ. जास्वंदी वांबूरकर यांनी सांगितले.
उतारे, कविता वाचन
या वेळी देशातील विविध प्रांत, भाषांमधील स्त्री- साहित्यातील निवडक उतारे आणि कवितांचे सादरीकरण प्राध्यापक आणि विद्यार्थिनींनी केले. यामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, सरोजिनी नायडू, कुंदनिका कपाडिया, ऊर्मिला पवार, कुमुद पावडे, कमला भसीन यांसह अनेक लेखिकांच्या साहित्यातील उताऱ्यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आदिती नाटे; तर आभारप्रदर्शन डॉ. सोनाक्षी विचारे यांनी केले.
...
बहुजन, आदिवासी यांच्यासह ढोर चांभार समाजातील स्त्रियांचे दलित चळवळीत मोठे योगदान आहे. त्यांचे कर्तृत्व जगापुढे आणण्याचा हा प्रयत्न आहे.
- डॉ. सुनीता सावरकर, लेखिका
बहुजन महिलांनी आपला आत्मसन्मान, अस्तित्व जपणे आवश्यक आहे. एक वेळा जेवण नाही मिळाले तरी चालेल; मात्र आत्मसन्मान टिकवण्याची गरज आहे.
- ऊर्मिला पवार, लेखिका
...
हे पुस्तक अधिक दुर्लक्षित स्त्री- समाजावर प्रकाश टाकते. म्हणून तो एक महत्त्वाचा दस्तावेज आहे.
- डॉ. जास्वंदी वांबूरकर प्राचार्य, एसएनडीटी महाविद्यालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.