Panvel News: पाणीटंचाई असतानाही पनवेलमध्ये होळीच्या सणानिमित्त बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा खच पालिका परिसर व वसाहतींमधून दिसला. मागील आठवड्यापासून लहान मुले पाण्याच्या पिशव्या एकमेकांना मारताना दिसत आहेत.
पनवेल महापालिका क्षेत्रात सिंगल यूज प्लास्टिक मुक्तीसाठी सर्वत्र जोरदार जनजागृती चालू आहे. नागरिकांना सिंगल यूज प्लास्टिक वापरू नये, असे सांगितले जात असताना होळीच्या निमित्ताने गेल्या आठ दिवसांपासून परिसरातील सोसायटीमधून व गल्लीबोळांतून प्लास्टिकच्या पिशव्यांचा खच पडलेला दिसत आहे.
या पिशव्या लहान व पातळ असल्याने वाऱ्याने उडून गटारे व नाल्यात जात आहेत. त्यामुळे गटारे तुंबण्याचे प्रकार होत आहेत.
होळीच्या सणाअगोदर आठ दिवसांपासून पनवेल आणि परिसरातील लहान मुलांच्या हातात पाण्याने भरलेल्या पिशव्या एकमेकांवर फेकण्याचा कार्यक्रम अव्याहतपणे चालू आहे. इतकेच नव्हे; तर रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाटसरूंच्या अंगावरही या पिशव्या फेकल्या जातात. सोसायट्यांमधून दररोज कचऱ्यापेक्षा या पिशव्यांचा खच पडताना दिसत आहे.
पनवेल महापालिकेतर्फे प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी काटेकोरपणे पाळली जात आहे. तरीही अशा प्रकारच्या लहान, पातळ पिशव्या लाखोंच्या संख्येने मुलांना होळी खेळण्यासाठी कुठून उपलब्ध होतात हा यक्षप्रश्न आहे. कळंबोली, कामोठे, खांदा कॉलनी, नवीन पनवेल, पनवेल, खारघर व पनवेल महापालिकेच्या ग्रामीण भागातही सर्रास या लहान पिशव्यांची विक्री होताना दिसत आहे. त्यामुळे पनवेल परिसरामध्ये प्लास्टिकबंदीचा कुठल्याही प्रकारचा परिणाम झालेला दिसत नाही.
पिशव्या कशा उपलब्ध होतात?
परिसरातील लहान-मोठ्या टपऱ्या, झोपडपट्टीलगतची दुकाने, हातगाडीवरचे विक्रेते, पिचकाऱ्या व होळीचे साहित्य मिळते त्या ठिकाणी हमखास या पिशव्या मिळतात. लहान मुले व ओळखीच्या ग्राहकांना या पिशव्या दिल्या जातात. तसेच बहुतेक ठिकाणी रात्री नऊ, दहानंतर या पिशव्यांची विक्री केली जाते. या संदर्भात पनवेल पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
कोरड्या रंगाचा वापर
मागील आठ दिवसांपासून पनवेल परिसरात होत असलेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर यंदा पनवेलमधील बहुतेक गृहसंकुलांमध्ये नागरिकांनी कोरड्या रंगाचा वापर केला. त्यामुळे यंदा होळीनिमित्त पाण्याचा अपव्यय खूप कमी झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.