Mumbai News: सांगली, भिवंडीप्रमाणे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. शिवसेनेने या ठिकाणावरून परस्पर अनिल देसाई यांची उमेदवारी जाहीर केली.
या जागेसाठी काँग्रेसचा आग्रह कायम असून अनिल देसाई यांच्या प्रचारातून काँग्रेस कार्यकर्ते गायब आहेत. ९ तारखेला होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीत सकारात्मक निर्णय होईल, अशी आशा काँग्रेसला आहे.
कामगार, मराठी, दक्षिण भारतीय मतदारांची मोठी संख्या असलेल्या दक्षिण मध्य मुंबई लोकसभा या मतदारसंघावरून काँग्रेस-शिवसेना ठाकरे गटामध्ये अजूनही रस्सीखेच सुरू आहे. या मतदारसंघावर काँग्रेसचा दावा असतानाही ठाकरे गटाने अनिल देसाई यांची उमेदवारी परस्पर जाहीर केली.
यामुळे चिडलेल्या काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी देसाई यांच्या प्रचारावर अघोषित बहिष्कार टाकल्याचे चित्र आहे. त्यामुळे जोपर्यंत या संदर्भात अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत आघाडी धर्माचे पालन होणार नाही, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. निर्णय बदलणार नसेल तर मैत्रीपूर्ण लढतीचा आग्रहदेखील कार्यकर्त्यांचा आहे.
दुसरीकडे शिवसेनेचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांचा प्रचार सुरू झाला असून, भाजपचे दोन्ही आमदार प्रचारात सक्रिय झाले आहेत. शिवसेनेचे राहुल शेवाळे गेले दोन टर्म दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.
sया मतदारसंघाची त्यांनी बांधणीही केली. मात्र शिवसेनेत झालेल्या बंडात शेवाळे यांनी ‘मातोश्री’ची साथ सोडून एकनाथ शिंदे यांची कास धरली. दुसरीकडे वर्षा गायकवाड यांचे वडील दिवंगत एकनाथ गायकवाड या मतदारसंघातून सातत्याने लढले आहेत. २००९ मध्ये ते विजयी झाले, तर दोन वेळा त्यांचा पराभव झाला. त्यामुळे हा मतदारसंघ मिळावा, अशी काँग्रेसची मागणी आहे.
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्यापासून धारावी पुनर्वसनाच्या प्रश्नासह अन्य नागरी प्रश्नांवर वर्षा गायकवाड यांनी सातत्याने आंदोलने उभारली. यावेळी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारीही त्यांनी केली होती.
दुसरीकडे शिवसेना-काँग्रेसच्या वाटाघाटीत मतदारसंघ अदलाबदल करण्याचा प्रस्ताव आहे. दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघाच्या मोबदल्यात उत्तर मुंबई शिवसेनेला जाऊ शकतो, असे काँग्रेसच्या सूत्रांनी ‘सकाळ’ला सांगितले. शिवसेनेकडून विनोद घोसाळकर यांच्या उमेदवारीची चाचपणी सुरू असल्याचे सांगितले जाते.काँग्रेसचा हा परंपरागत मतदारसंघ आहे. दलित, मुस्लिमांसह काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग या विभागात आहे. त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसला मिळायला पाहिजे.
अणुशक्ती नगर, चेंबूर, धारावी, सायन-कोळीवाडा, वडाळा आणि माहीम हे सहा विधानसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघात येतात. या ठिकाणी ठाकरे, शिंदे गटाचा प्रत्येकी एक एक आमदार तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येकी एक तर भाजपचे दोन आमदार आहेत.(Anushakti Nagar, Chembur, Dharavi, Sion-Koliwada, Wadala and Mahim)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.