Palghar News: पालघर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार कोण हे आमच्यासाठी महत्त्वाचे नाही. देशभरातील ५४२ मतदारसंघांत आमचा उमेदवार एकच आहे आणि त्याचे नाव नरेंद्र मोदी आहे. त्यांच्यासाठी आमचा प्रचारही सुरू झाला आहे, अशा शब्दांत भाजप महाराष्ट्र मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी पालघर लोकसभा उमेदवार निवडीवरील कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर केला आहे. तसेच, येत्या दोन दिवसांत उमेदवार निवडीचे चित्र स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले.
वसई शहर (गिरीज ते नायगाव) मंडळातील महायुती कार्यकर्त्यांचा मेळावा वसई झेंडा बाजार येथील मारोती मंदिराच्या सभागृहात रविवारी (ता. ७) सायंकाळी पार पडला आहे. या मेळाव्यात उपाध्ये यांनी मार्गदर्शन केले. महायुतीसाठी व्यक्ती महत्त्वाची नाही. येत्या दोन दिवसांत उमेदवार निवडीचे चित्र स्पष्ट होईल; पण जो कोणी उमेदवार मिळेल.
त्याच्यासाठी एकदिलाने-एकमताने काम करू. नरेंद्र मोदी यांच्या पाठिशी उभा राहणारा प्रत्येक खासदार हा आमचा उमेदवार आहे. येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी, देशाच्या भविष्यासाठी आणि सामाजिक-आर्थिक प्रगतीसाठी आम्हाला मोदी यांना पुन्हा निवडून आणायचे आहे. मोदींना पंतप्रधान करण्याचा निर्णय सामान्य जनतेने घेतलेला आहे. आपल्याला केवळ खारीचा वाटा उचलायचा आहे, असे आवाहन उपाध्ये यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना केले.
मेळाव्यात शिवसेना शिंदे गटाचे खासदार राजेंद्र गावित, भाजप सरचिटणीस राणी द्विवेदी, भाजप जिल्हाप्रमुख महेंद्र पाटील, भाजप वसई विधानसभा प्रमुख मनोज पाटील, जिल्हा उपाध्यक्ष मुकुंद मुळ्ये, शिंदे गट जिल्हाप्रमुख नीलेश तेंडोलकर, जिल्हा सचिव अतुल पाटील, उपजिल्हाप्रमुख दिवाकर सिंग यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
चारशे वर्षांच्या संघर्षानंतर राममंदिर बांधले गेले. जम्मू-काश्मीरमध्ये लागू केलेले ३७० कलम हटवले गेले. तीन तलाख पद्धती बंद करण्यात यश आले. हे सर्व नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शीपणामुळे हे घडले. काँग्रेसचा आताचा जाहीरनामा पाहा. ३७० हटवण्याची, तीन तलाक बंद करण्याची भाषा त्यात करण्यात आली आहे. या माध्यमातून मुस्लिम माता-भगिनींना पुन्हा अंधारात नेण्याचे काम ते करू पाहत आहे. दहशतवादी कारवाया बंद झाल्याने आपल्याकडे वाकड्या नजरेने कुणी पाहण्याचे धाडस करत नाही. केवळ मोदींमुळेच आज महाराष्ट्र व देश सुरक्षित आहे, असे ठाम मत उपाध्ये यांनी व्यक्त केले.
बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष तथा सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी दोन दिवसांपूर्वीच पालघर मतदारसंघात आमचे सहापैकी तीन आमदार आहेत. त्यामुळे आमचा खासदारकीचा हक्क असून कार्यकर्त्यांशी बोलून उमेदवार देणार आहोत, असे स्पष्ट केले होते. पण, महायुतीकडून वसई, विरार, नालासोपारा परिसरात जे प्रचारार्थ मेळावे सुरू आहेत, त्यावर घटक पक्ष म्हणून बविआचे नाव टाकले आहे. त्यामुळे बविआ कार्यकर्त्यांत संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. यावर केशव उपाध्ये यांना प्रश्न विचारला असता, बविआचा आम्हाला पाठिंबा आहे, असे सांगितले. मात्र, त्यावर हितेंद्र ठाकूर यांनी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही उमेदवार देणार आहोत. त्यांना काय टाकायचे ते टाकू द्या. एक दोन दिवसांत भूमिका स्पष्ट होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.