नवी मुंबई, ता. १६ : वेधशाळेने दिलेल्या इशाऱ्यानंतर नवी मुंबईसह पनवेल आणि उरण परिसरात ४१ अंशापेक्षा जास्त पारा मोजला गेला. नवी मुंबईत दुपारी दोन वाजता ४२ अंश इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ३९ अंश सेल्सिअस इतके सरासरी तापमान नवी मुंबईत नोंदवले गेले. उष्णतेच्या लाटेमुळे गेले दोन दिवस नवी मुंबई महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्र आणि रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात उष्माचा त्रास झाल्याच्या रुग्णांची संख्या वाढली आहे.
मुंबईतील वेधशाळेने १५ एप्रिलला मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला होता. १७ एप्रिलपर्यंत ही लाट असण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्या धर्तीवर नवी मुंबई महापालिकेनेही नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. दुपारी १२ ते चार या वेळेत गरज नसल्यास घराबाहेर फिरणे टाळावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
नवी मुंबईत १५ एप्रिलला शहरात ४० अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. १६ एप्रिलला सकाळपासूनच वातावरणातील हवा गरम झाली होती. दुपारी १२ नंतर सूर्यनारायण आग ओकत होता. दुपारी दोन वाजता ४२ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. दुपारनंतर संध्याकाळी सहा वाजेपर्यंतही वातावरणात गारवा निर्माण झाला नव्हता. तेव्हाही गरम हवा सुरू होती. त्यामुळे घराबाहेर कामानिमित्त पडलेल्या नोकरवर्गाला उन्हाचे चटके सहन करावे लागले. महापालिकेच्या रुग्णालयांतील आणि नागरी आरोग्य केंद्रातील बाह्यरुग्ण विभागात डोकेदुखी, अंगदुखी, थकवा, उलट्यांचा त्रास होणे अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे.
दिवसरात्र उन्हात काम करणाऱ्या सफाई, उद्यान आणि मलेरिया निर्मूलन विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकरिता महापालिकेने खास सूचना प्रसिद्ध केली आहे. दुपारच्या एक ते तीन या वेळेत उन्हात फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. अतिगरजेचे काम असल्यास खबरदारीच्या उपाययोजना घेण्याची सूचना करण्यात आल्या आहेत. स्वच्छतेच्या ठिकाणी टोपी, मास्क लावण्याकरिता साहित्य उपलब्ध करण्याची सूचना कंत्राटदारांना दिली आहे, अशी माहिती उपायुक्त डॉ. राहुल गेठे यांनी दिली.
- पुरेसे पाणी प्यावे व तहान लागली नसली तरीही दर अर्ध्या तासाच्या अंतराने पाणी प्यावे.
- घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करावा.
- दुपारी १२ ते तीन वाजण्याच्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळावे.
- सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी घरातील पडदे आणि झडपांचा वापर करावा.
- हलके, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.
- प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे.
- उन्हात काम करीत असल्यास टोपी, छत्री किंवा ओल्या कपड्याने डोके, मान, चेहरा झाकावा.
- शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनवण्यात आलेली लस्सी, पन्हे, लिंबू-पाणी, ताक इत्यादींचा नियमित वापर करावा.
- अशक्तपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम अशी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत. चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा, तसेच रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात.
- पंखे, ओले कपडे यांचा वापर करावा. थंड पाण्याने वेळोवेळी अंघोळ करावी.
उन्हात अतिकष्टाची कामे करू नयेत.
मद्य, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेये घेऊ नयेत.
उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नये.
लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये.
गडद घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.
बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत.
उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे. मोकळ्या हवेसाठी स्वयंपाकघराची दारे व खिडक्या उघड्या ठेवाव्यात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.