Panvel News: जाहिरात फलक व्यवस्थित दिसावेत, यासाठी रस्त्यालगतच्या झाडांची सर्रासपणे कत्तल केली जात आहे. यामुळे पर्यावरणाला हानी पोहचून शहराचे विद्रूपीकरण सुरू आहे.
याकडे पनवेल महापालिकेच्या पर्यावरण, उद्यान, परवाना विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. पनवेल महापालिका क्षेत्रातील अधिकृत ५६ जाहिरात फलकांपैकी जास्तीत जास्त फलक हे सायन-पनवेल महामार्गावरील रस्त्यांच्या कडेला आहेत.
हे जाहिरात फलक व होर्डिंग दिसण्यासाठी त्यांची सर्रासपणे कत्तल सुरू असून झाडे होल्डिंगच्या आड येऊ नयेत म्हणून त्यांची वाढ होऊ न देता कापण्याची तीन वर्षांतील ही पाचवी वेळ आहे.
पनवेल महापालिका व सरकारकडे वारंवार तक्रार करूनही हे प्रकार थांबले नाहीत. उलट प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत आहे.
महापालिकेच्या ११०.६ चौरस किमी क्षेत्रफळ असणाऱ्या या भागांमध्ये फक्त सहा लाख ७७ हजार ९२४ इतकीच झाडे आहेत. त्यामुळे विकासाच्या नावावर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असून सिमेंटच्या जंगलात हिरवाई नष्ट होत असून पनवेलचे तापमान वाढत आहे.
सायन-पनवेल महामार्गावरील कळंबोली सर्कल ते कामोठे या ठिकाणी रस्त्यालगत आठ डेरेदार वडाची झाडे अर्ध्या भागातून कापली आहेत. सायन-पनवेल मार्ग हा कायमस्वरूपी रहदारीने गजबजलेला असल्यामुळे या रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणावर जाहिरात फलक आहेत. तसेच या मार्गाच्या कडेला वड, पिंपळ यासारखे मोठे वाढणारे वृक्ष लावण्यात आले आहेत.
परंतु या वृक्षांची वाढ झाल्यानंतर ते जाहिरात फलकांच्या आड येत असल्याने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन या ठिकाणी झाडे अर्ध्यातून छाटली जात आहेत व त्यांची वाढ खुंटत आहे. रस्तारुंदीकरणानंतर या मार्गालगत मोठ्या प्रमाणावर वटवृक्ष व पिंपळाच्या झाडे लावण्यात आली आहे; परंतु या रस्त्यालगत असलेल्या जाहिरात फलकामुळे या झाडांचे भवितव्य अंधारात आहे.
जाहिरात फलक दिसण्यासाठी ही झाडे वाढूच दिली जात नाहीत. या संदर्भात पनवेल पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता या प्रकाराविषयी पालिका अनभिज्ञ असल्याने या संदर्भात पाहणी करून कारवाई करण्यात येईल, असे वारंवार सांगण्यात येते.
विनापरवाना वृक्षतोडीसंदर्भात पर्यावरणप्रेमी प्रशांत रणवरे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व नवी मुंबई पोलिस आयुक्त यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यांनी प्रधान सचिव नगरविकास विभाग-२ कडे ही तक्रार वर्ग केल्याचे त्यांना मेलद्वारे कळवण्यात आले आहे.
महापालिका क्षेत्रातील वृक्षगणना नुकतीच करण्यात आली आहे. ११०.६ चौरस किमी क्षेत्रफळ असणाऱ्या या भागांमध्ये फक्त सहा लाख ७७ हजार ९२३ इतकीच झाडे आहेत. त्यामुळे विकासाच्या नावावर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असून सिमेंटच्या जंगलात हिरवाई नष्ट होत असल्याने भविष्यात विविध संकटांची भीती पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.
ज्या ठिकाणी ही झाडे कापली आहेत, त्याच १० प्रभागांमध्ये वृक्षघनता कमी असून ती अवघी ४,००२ आहे. या ठिकाणी गृहसंकुलासाठी बेसुमार वृक्षतोड झाली आहे. तसेच त्या बरोबरीने पुनर्लागवड झालीच नाही. त्यामुळेच या ठिकाणी पर्यावरणाचा समतोल ढासळला असून परिसराचे तापमान तसेच प्रदूषण वाढलेले आहे. कळंबोली येथील प्रदूषणाची वाढलेली पातळी त्याचेच जिवंत उदाहरण आहे.
जाहिरात फलक लावण्यासाठी झाडे कापण्यास पालिका परवानगी देत नाही व पालिकाही ही झाडे कापत नाही. अशा प्रकारे झाडे कापली जात असतील तर संबंधित विभागाला सांगून कारवाई करण्यात येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.