Mumbai Politics News: यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राजकीय पक्षांना कार्यकर्त्यांची टंचाई भासत आहे. पक्षफुटीमुळे ही परिस्थिती ओढावली आहे. त्यामुळे भाडोत्री कार्यकर्त्यांच्या जिवावर प्रचार करण्याची वेळ पक्षांवर आली आहे. त्यामुळे निवडणुकीपुरते का होईना, बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळत आहे. विशेषतः सोशल मीडिया हाताळणाऱ्या तरुणांना या निवडणुकीने मालामाल होण्याची संधी दिली आहे.
लोकसभा निवडणुकांचा पहिला टप्पा संपला आहे. महामुंबईत अजूनही लढतीचे चित्र स्पष्ट झालेले नाही. सर्वच राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीने प्रचाराचे नियोजन करत आहे. प्रचारसभा, रॅली, रोड शो यामार्फत प्रचार आणि जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी पक्षांकडून सुरू आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गरज पडते.
अशात राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष फुटल्यामुळे कार्यकर्तेही गटातटात विभागले गेले आहेत. पक्षनिष्ठाही जुजबी ठरल्यामुळे यंदा कार्यकर्त्यांचा तुटवडा जाणवतो आहे. ही तूट भरून काढण्यासाठी पेड वर्कर म्हणजेच भाडोत्री कार्यकर्त्यांना पक्षाने कामी लावले आहे. प्रचार फेऱ्यासोबत सोशल मीडियाच्या आघाडीवर पेड वर्कर्स कार्यरत आहेत.
वेगवेगळे उमेदवार या पेड कार्यकर्त्यांना वेगवेगळे दर देतात. साधारणतः कुशल, अकुशल कार्यकर्त्यांना ५०० ते हजारापर्यंत पैसे सुटतात. निवडणूक प्रचार संपेपर्यंत या पेड वर्कर्सच्या सेवा बुक करण्यात आल्या आहेत. पक्षाचा झेंडा घेऊन हे कार्यकर्ते दिवसभर रॅलीत फिरतात. बाईक रॅली असेल, तर पेट्रोलचा खर्च मिळतो. सकाळचा नाश्ता, दोन वेळचे जेवणही कार्यकर्त्यांना लागू आहे. राष्ट्रीय नेत्यांच्या सभेला उपस्थितीचे दर वेगळे आहेत.
यंदा प्रचाराची लढाई ही सोशल मीडियावर प्रामुख्याने लढवली जात आहे. त्यामुळे सोशल मीडियावर चांगले फॉलोवर असणारे तरुण या वेळी लखपती होत आहे. एक लाखाच्या वर फॉलोवर असणारे शेकडो फेसबुक, इन्स्टाग्राम पेज, यू ट्यूब चॅनेल विकत घेण्याचा सपाटा प्रमुख राजकीय पक्षांनी लावला आहे. आतापर्यंत यामध्ये कोट्यवधी रुपये ओतले गेले आहेत. फेसबुक, इन्ट्राग्राम पेज, यू ट्यूब चॅनेलचे किती फॉलोवर, त्याचा रिच याचे मूल्यमापन करून मानधन ठरते. सध्या प्रति फॉलोअर तीन ते चार रुपये हे दर आहेत. सरासरी प्रति फेसबुक, इन्टाग्राम पेज एक ते दोन लाख रुपयाला खरेदी केले जात आहे. राज्यात हजारोंच्या संख्येने हे पेज विकले गेले आहे. हे पेज विकत घेऊन त्या माध्यमातून टार्गेटेड मतदारांना प्रभावित करण्याचे काम पक्ष करत आहेत.
सोशल मीडियावर चांगले लिखाण करणाऱ्या तरुणांच्या हातालाही काम मिळत आहे. फेसबुक, ट्विटवरवर प्रभावी लिखाण करणाऱ्यांना काही मानधन देऊन उमेदवारांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकायला सांगितले जाते. प्रतिस्पर्धी उमेदवाराचे कच्चे दुवे शोधून त्यांना ट्रोल करण्याची जबाबदारीही फिक्स केली जाते. संवादकौशल्य असणाऱ्या किंवा इंटर्न पत्रकारांना स्थानिक यू ट्यूब चॅनेलचा बूम हाती देऊन मतदारसंघात फिरून जनतेच्या प्रतिक्रिया घेण्याचे काम सोपवले गेले आहे. या तरुणांना २० ते २५ हजार रुपये मानधन दिले जाते. याखेरीज ते उमेदवारांच्या मुलाखती घेताता. त्यांना गुणवत्तेनुसार मानधन आम्ही देतो, असे एका पदाधिकाऱ्याने सांगितले.
निवडणुकीत रील्सस्टारला तुफानी मागणी आहे. अनेक लोकप्रिय रील्सस्टारला प्रचारासाठी रील्स बनवण्याचे काम पक्षाकडून दिले जात आहे. बडे रील्सस्टारची किंमत जास्त आहे; मात्र स्थानिक रीलस्टारलादेखील चांगला मोबदला मिळत आहे. प्रचाराचे रील्स तयार करणे ते पोस्ट करणे, यासाठी रील्सस्टार तीन ते चार लाख रुपयांपर्यंत मानधन वसूल करत आहे. त्यामुळे यंदा स्थानिक रील्सस्टारही मालामाल होत असल्याचे चित्र आहे.
शाळांना सुट्ट्या लागल्या आहे. मुंबईत काम करणारे कंत्राटी कामगार उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आपल्या गावी निघाले आहे. बड्या कंत्राटदारांकडे असलेले मजूर सालाबादप्रमाणे गावी शेतीची मशागत करण्यासाठी गेले आहेत. त्यामुळे पक्षांना मुंबईत कार्यकर्त्याची कमतरता भासत आहे. शिवाय आजकाल अपवाद वगळता पक्ष निष्ठा नावाची गोष्ट कार्यकर्त्यांमध्ये शिल्लक राहीली नाही. त्यामुळे आपल्या सोयीप्रमाणे कार्यकर्ते प्रचारासाठी येतात. दुसरे म्हणजे या वेळी पक्ष फुटल्यामुळे कार्यकर्ते विभागले गेले आहेत.
यंदा उमेदवारांचा प्रचारासाठी रील्स तयार करण्यासाठी चांगले मानधन मिळत आहे. लोकप्रियतेनुसार आम्ही पैसे चार्ज करतो.
- एक रील्सस्टार
उमेदवारांचे पोस्टर लावणे, रॅली आणि प्रचारसभेत सहभागी होण्यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी येत आहे.
- सुरेश शेलार (बदललेले नाव)
...
काही काळासाठी का होईना निवडणुकीमुळे दोन पैसे कमवण्याची संधी आम्हाला मिळाली आहे.
- रेखा कुलकर्णी (बदललेले नाव)
...
सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. त्यामुळे सोशल मीडिया हाताळणाऱ्या तरुणांना चांगली कामे मिळत आहेत.
- एक राजकीय नेता
…..
- पक्ष फुटल्याने कार्यकर्त्यांची कमतरता
- पेड वर्करला मागणी
- प्रचार सभा, रोड शो, रॅलीत सहभागाचे मानधन
- हजारो फेसबुक, इन्स्टाग्राम, यू ट्यूब पेजची खरेदी
- रील्सस्टारची मागणी वाढली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.