मुंबई

Bhiwandi Loksabha: हट्ट करुन मागून घेतला मतदारसंघ.. भिवंडीत मात्र ‘तुतारी’ला सूर गवसेना

CD

राहुल क्षीरसागर : सकाळ वृत्तसेवा


Thane News: महाविकास आघाडीच्या जागा वाटपात मोठ्या हट्टाने राष्ट्रवादी शरद पवार गटाने भिवंडी लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे खेचून आणला. पण उमेदवारी अर्ज भरण्याची घटिका समीप आली, तरी भिवंडीत ‘तुतारी’ला सूर गवसत नसल्याचे चित्र दिसत आहे.

आपला पारंपरिक गड सोडण्यास काँग्रेस अजूनही तयार नाही. या मतदारसंघावर काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी आपला दावा न सोडता इच्छुक उमदेवारांनी अर्ज घेतले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत बंडाचा झेंडा फडकणार असल्याचे चिन्ह असून ‘तुतारी’साठी ‘हाता’मुळे डोकेदुखी वाढणार आहे.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुतीचे विद्यमान खासदार कपिल पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश ऊर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांच्यात प्रमुख लढत होणार होती. मात्र, जिजाऊ संघटेनेचे नीलेश सांबरे यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केल्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होणार असल्याचे दिसून येत आहे. महायुतीत अंतर्गत धुसफूस तर महाविकास आघाडीत मित्रपक्षाचा असहकार यामुळे दोन्ही उमेदवारांसाठी ही निवडणूक मोठी जिकरीची झाली आहे.

खरे आव्हान हे महाविकास आघाडीच्या बाळ्या मामांसमोर आहे. भिवंडी हा काँग्रेसचा गड असून गेले दोन निवडणुका सोडल्या तर येथून हाताच्या चिन्हावर खासदार निवडून येत होते. भिवंडी लोकसभा मतदारसंघात २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे सुरेश टावरे हे निवडून आले होते. त्यानंतर २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. परंतु, या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. पारंपरिक मतदारसंघ असताना शरद पवार गटाने हा मतदारसंघ आपल्याकडे खेचून घेतल्यामुळे काँग्रेसमध्ये मोठी नाराजी पसरली आहे.


दरम्यान, बाळ्या मामा यांना उमदेवारी जाहीर होताच, त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. मेळावे, मतदार व नेते आणि पक्ष कार्यालयांना भेटी देण्यास सुरुवात केली आहे. भिवंडी पूर्व येथील समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख, ठाकरे गटाच्या नेत्यांच्याही भेटीगाठी घेतल्या आहेत. त्या पाठोपाठ काँग्रेसचे भिवंडी शहराध्यक्ष व माजी आमदार रशीद ताहीर मोमीन यांची मनधरणी करण्यात त्यांना यश आले आहे.

ताहीर हे म्हात्रे यांच्या प्रचारासाठी सक्रिय झाले. असे असले तरी दुसरीकडे भिवंडीतील काँग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे आणि काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे हे मात्र प्रचारापासून अलिप्तच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे भिवंडीत तुतारीला अद्याप सूर गवसत नसल्याचे दिसून येत आहे.
........................
प्रचारापेक्षा मनधरणीत अधिक वेळ
भिवंडी लोकसभेत मित्रपक्षांच्या नाराजी नाट्यामुळे प्रचारापेक्षा मनधरणी करण्यातच महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा वेळ आणि शक्ती खर्च होत असताना दिसत आहे. प्रचाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात बाळ्या मामांनी काँग्रेस कार्यालय गाठण्याचा प्रयत्न केला. प्रचंड मेहनतीने त्यांना शहर कार्यालयाचे दरवाजे उघडे झाले आहेत.

मात्र ग्रामीण भागात काँग्रेसने हात झटकल्याचे दिसते. अद्यापही ग्रामीणचे काँग्रेस पदाधिकारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यात ठाकरे गटातील नाराज एका नेत्याचे मन राखण्यात यश आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

मोठा फटका बसण्याची शक्यता
काँग्रेसची नाराजी दूर करण्यात बाळ्या मामा यांना अद्याप यश आल्याचे दिसून येत नाही. नाराजीमुळेच ते अद्याप प्रचारात उतरलेले नाहीत. दुसरीकडे निवडणूक अर्ज घेण्याच्या पहिल्याच दिवशी भिवंडीतून तब्बल २५ उमेदवारांनी ५४ नामनिर्देशन अर्ज घेतले. यामध्ये काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने सात अर्ज घेतले आहेत. त्यामुळे येथून बंडखोरी होण्याची दाट शक्यता आहे. पक्षाने साथ दिली नाही, तर काँग्रेसचे काही पदाधिकारी अपक्ष निवडणूक लढण्यासही तयार असल्याची माहिती मिळते.

भिवंडी मतदारसंघ हा मुस्लिमबहूल असल्याने या समाजाची एक गठ्ठा मते फुटणार आहेत. त्यात अपक्ष उमेदवार नीलेश सांबरे असून, त्यांची सामाजिक ताकद मोठी आहे. या परिस्थितीत हाताची साथ न मिळाल्यास महाविकास आघाडीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT