Ulhasnagar News: मटका किंग संदीप गायकवाड याच्या मुलावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या हितेंद्र उर्फ हितेन ठाकूर या आरोपीला उल्हासनगरातील मध्यवर्ती पोलिसांनी गुजरातमध्ये सापळा रचून अटक केली आहे.
२०२० मध्ये हितेंद्र ठाकूर याने श्रीराम चौकातील डान्सबारसमोर मटका किंग संदीप गायकवाड याच्यावर गोळीबार केला होता. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी ठाकूर याला अटक केली होती.
त्यानंतर जेलमधून बाहेर आल्यावर त्याने गायकवाड याचा मुलगा प्रथमवर ९ डिसेंबर २०२२ रोजी सी. ब्लॉक येथील राहत्या घराच्या परिसरात उभा असताना हितेंद्र ठाकूर, राहुल पगारे, अजय बागुल, योगेश वाघ यांनी चाकूने जीवघेणा हल्ला केला होता. त्यावेळी परिसरातील नागरिक मदतीसाठी धावून आल्याने हल्लेखोरांनी पळ काढला होता. याप्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी राहुल पगारे, अजय बागुल, योगेश वाघ यांना अटक केली होती; मात्र हितेंद्र उर्फ हितेन ठाकूर हा फरार झाला होता.
ठाकूर हा आंध्रप्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश याठिकाणी सिमकार्ड बदलून लपून राहत होता. त्यामुळे कौशल्यपूर्वक व तांत्रिकदृष्ट्या तपास करून ठाकूरचा ठावठिकाणा मिळवणे पोलिस पथकाला कठीण जात होते; मात्र ठाकूर याने त्याच्या इंस्टाग्राम खात्यावरून पोस्ट टाकली होती. यावरून ठाकूर हा गुजरात वापी येथील कांचननगर येथे असल्याचे निष्पन्न झाले.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर आवताडे, पोलिस निरीक्षक गुन्हे उमेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विशाल चिटणीस, सहायक पोलिस निरीक्षक विलास मालशेटे, पोलिस हवालदार प्रवीण जाधव, प्रवीण पाटील, विलास जरग, महेश बगाड, सुशांत हांडे देशमुख, प्रवीण इंगळे यांच्या पथकाने वापीमध्ये सापळा रचून हितेंद्र ठाकूरला अटक केली. शनिवारी त्याला उल्हासनगर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवस पोलिस कोठडी ठोठावली आहे.
हितेंद्र हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर नारपोली पोलिस स्टेशनमध्ये घरफोडी व चोरीचे एकूण पाच गुन्हे व पडघा पोलिस स्टेशनमध्ये घरफोडीचे दोन गुन्हे दाखल होते. श्रीराम चौकात डान्सबारबाहेर संदीप गायकवाडवर झालेल्या गोळीबार प्रकरणात हितेंद्र ठाकूरला विठ्ठलवाडी पोलिसांनी अटक केली होती, अशी माहिती मध्यवर्ती ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर आवताडे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.