सानपाडा येथे नाल्याच्या बाजूला संरक्षण जाळी बसवण्याची मागणी
तुर्भे, ता. २९ (बातमीदार) : सानपाडा सेक्टर सहा गोदावरी पार्क सोसायटी (गजानन महाराज चौकजवळ) ते जुईनगर रेल्वे स्थानकापर्यंत मोठ्या नाल्याच्या बाजूला नवीन संरक्षण जाळी बसविण्याची मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे. नुकतेच नवी मुंबई महापालिकेचे शहर अभियंता संजय देसाई यांना निवेदन देण्यात आले आहे.
नवी मुंबई महापालिकेने सानपाडा सेक्टर सहा गोदावरी पार्क सोसायटी (गजानन महाराज चौकजवळ) ते जुईनगर रेल्वे स्थानकपर्यंत मोठ्या नाल्याच्या बाजूला मागील वर्षी संरक्षण जाळी बसवली होती. मात्र, आता सध्या संरक्षण जाळी काही ठिकाणी तुटली आहे. तर काही ठिकाणी चोरीला गेल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे येथील हरितपट्ट्यात कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे रात्री लघुशंका करण्यासाठी मद्यपींकडून येथील जागेचा सर्रास वापर केला जात आहे. त्यामुळे परिसराला बकालपणाचे स्वरूप प्राप्त झाले असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या ठिकाणी रस्त्यावरून ये-जा करताना नागरिकांना दुर्गंधीचा मोठा सामना करावा लागत आहे. तसेच संरक्षण जाळी तुटल्याने हरितपट्ट्यातील माती हळूहळू पदपथावर येऊ लागली आहे. पावसाळासुद्धा जवळ येत असल्याने हरितपट्ट्यातील माती भविष्यात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर तसेच पदपथावर येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे या जागेची पाहणी करून लवकरात लवकर येथे नवीन संरक्षण जाळी बसविण्यात यावी, अशी मागणी रहिवासी योगेश शेटे यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.