विरार, ता. १७ (बातमीदार) : मेहनतीच्या वीस रुपयांच्या मजुरीसाठी एका गरीब दुकानदाराला पोलिस कर्मचाऱ्याने बेदम मारहाण करीत नाक फोडल्याची घटना गुरुवारी (ता. १६) माणिकपूर पोलिस ठाण्यात घडली.
त्यानंतर जखमीने पोलिस तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता, त्याला अधिकाऱ्यांनी पिटाळून लावले. पोलिसांच्या या प्रकारामुळे पोलिस अधीक्षक मधुकर पांडे यांच्याकडे तक्रार व निवेदन सादर करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद अली अन्सारी (वय ३३) याचा माणिकपूर पोलिस स्टेशनसमोर चावी बनवण्याचा व्यवसाय आहे. गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता एक व्यक्ती दोन चाव्या बनवण्यासाठी त्यांच्याकडे आला होता.
त्यावेळी दोन चाव्यांचे ८० रुपये होत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र चाव्या बनवल्यानंतर आपण पोलिस असल्याचे सांगत साठ रुपये देऊन अन्सारी यांना दमदाटी केली. हा वाद माणिकपूर पोलिस ठाण्यातील अंमलदार राजशेखर सरगरे यांना सांगितला. तक्रार सांगितल्यानंतर सरगरे यांनी अन्सारींना पैसे मिळवून न देता शिवीगाळ करत पोलिस ठाण्यातच मारहाण केली. यामध्ये अन्सारींच्या नाकाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यानंतर हा प्रकार पोलिस निरीक्षक राजू माने यांना सांगितला, मात्र त्यांनीही तक्रार घेण्यास टाळाटाळ केली.
तक्रारदार अन्सारींना बेदम मारहाण केल्याने त्यांच्या नाकाचे हाड मोडल्याने त्यांना रुग्णालयात दाखले केले. मारहाण करणाऱ्याची चौकशी केली असता संबंधित व्यक्ती रेल्वे पोलिस असल्याचे निष्पन्न झाले आहे.
त्यामुळे हे प्रकरण आता पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त वसई यांच्याकडे गेले आहे. याबद्दल वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजू माने यांना विचारणा केली असता, त्यांनी आपली रात्रपाळी असल्यामुळे या प्रकाराबद्दल आपल्याला माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.