मुंबई

बळीराजाला वेध आवणीचे

CD

वाणगाव, ता. ३ (बातमीदार) : यंदा पावसाने जिल्ह्यात वेळेत हजेरी लावली होती; परंतु मधल्या काळात माघार घेतल्याने बळीराजाने डोळे आकाशाकडे लावून धरले होते. अशा परिस्थितीत मेघराज पुन्हा शेतकऱ्यांच्या हाकेला धावून आले. त्यानंतरच्या काळात नियमितपणे सुरू झाल्याने पेरलेल्या बियाण्यांची चांगली उगवण झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे बळीराजाला आता आवणीचे वेध सुरू झाले आहेत.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे भातशेती हे खरीप हंगामातील एकमेव उत्पन्नाचे साधन आहे. येथील शेतकरी पूर्णपणे पावसावर अवलंबून असतात. संसाराचा गाडा ओढण्यासाठी बळीराजा दिवस रात्र शेतामध्ये राबत असतो. मागील वर्षी निसर्गाच्या कोपामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. यंदा नुकसान भरपाई खरीप हंगामात भरून काढावी, यासाठी बळीराजाची धडपड सुरू आहे. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर मेघराजा पुन्हा बरसल्याने शेती बहरली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आवणीचे वेध लागले आहेत. सध्या भाताची रोपे २० ते २५ दिवसांची झाल्याने शेतकऱ्यांनी लागवडीस सुरुवात करावी, असे डहाणूचे तालुका कृषी अधिकारी रवींद्र पाचपुते यांनी सांगितले.

भातरोपांची पुनर्लागवड कशी करावी?
रोपे लागवड करताना जातीच्या कालावधीनुसार योग्य वेळेत लावणी करावी. हळव्या जातीसाठी २० ते २३ दिवस, निमगरव्या जातीसाठी २५ दिवस आणि गरव्या जाती २५ ते ३० दिवसांनी लावाव्यात. एका चुडात फक्त तीन ते चार रोपे लावावीत. रोपांची तिरपी व खोल लावणी केल्याने फुटवा कमी येण्याची शक्यता असते. सर्वसाधारणपणे हळव्या जातीसाठी १५×१५ सेंटीमीटर अंतरावर, निमगरव्या आणि गरव्या जातीसाठी २०×१५ सेमी. अंतरावर लागवड करावी.

खतांचे नियोजन
हेक्‍टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश अशी खतांची शिफारस करण्यात आलेली आहे.
हळव्या जाती : हळव्या जातीमध्ये लागवडीच्या वेळी ५० टक्के नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश आणि उरलेले ५० टक्के नत्र लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी द्यावे.
गरव्या आणि निमगरव्या जाती : निमगरव्या व गरव्या जातींमध्ये लागवडीच्या वेळी ४० टक्के नत्र आणि संपूर्ण स्फुरद व पालाश द्यावे. लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी ४० टक्के नत्र आणि २० टक्के ५५ ते ६० दिवसांनी द्यावे.
संकरित जाती : संकरित जातींसाठी हेक्‍टरी १२० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश या प्रमाणात खतांची शिफारस आहे.लागवडीच्या वेळी ५० टक्के नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश आणि उरलेले २५ टक्के नत्र लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी आणि उर्वरित २५ टक्के नत्र लागवडीनंतर ५५ ते ६० दिवसांनी द्यावे.

सध्या पाऊस नेहमीच सुरू असल्याने आवणीच्या कामांची पूर्वतयारी सुरू आहे. भातरोपांची वाढ चांगली आणि सशक्त आहेत. लागवडीसाठी पाऊस पोषक असल्याने सुरुवातीच्या काळात ७० ते ८० दिवसांत तयार होणाऱ्या हळव्या जातीची लागवड आणि त्यानंतर ११० ते १२० दिवसांत तयार होणाऱ्या गरव्या जातीच्या भाताची लागवड करण्यात येणार आहे. सध्या भात खननीची करण्याची कामे सुरू आहेत. पुढील दोन दिवसांत आवणीच्या कामांना सुरुवात करणार आहे. पाऊस नियमित राहिल्यास पुढील १५ ते २० दिवसांत भातलागवडीची कामे पूर्ण होतील असा अंदाज आहे.
- संजय पाटील, प्रगतशील शेतकरी, डहाणू

पालघर जिल्ह्यात जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला होता. परंतु, पालघर जिल्ह्यात सरासरी ८९.१ टक्के पावसाची नोंद झालेली आहे. महावेधच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात ३० जूनपर्यंत सरासरी पाऊस ४११.९ मिमी इतका होतो. यावर्षी ३६७.२ मिमी (१०.८ टक्के कमी) पावसाची नोंद झाली आहे. एकंदरीत जिल्ह्यात भातशेतीच्या लागवडीसाठी चांगला पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांनी कामांना वेगाने सुरुवात करावी.
- डॉ. विलास जाधव, प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल.

ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे, त्यांची भातलागवड झाली आहे. पावसामुळे आता आवणीला मोठ्या प्रमाणात सुरुवात होईल. डहाणू तालुक्याची १०० टक्के भातपेरणी झाली आहे. भातलागवड करताना शेतकऱ्यांनी रोपास प्रक्रिया करणे आवश्यक आहे. रोपवाटिकेतून रोप काढल्यानंतर लगेच ते क्लोरोपायरीफॉस (डार्सबन)च्या द्रावणात बुडवून घ्यावे. त्यानंतर पीएसबीच्या द्रावणात अर्धा तास बुडवून ठेवावे. यामुळे पिकास किडीपासून संरक्षण होतेच आणि रोपाच्या मुळावर पीएसबीमुळे फायदा होतो. रोप लवकर जीव धरते. यामधून फॉस्फेट लवकर उपलब्ध झाल्याने पिकाची वाढ चांगली होते.
- रवींद्र पाचपुते तालुका कृषी अधिकारी, डहाणू

तालुकानिहाय जूनमधील पावसाची नोंद
पालघर .. ४६७.७ मिमी
मोखाडा .. १६८.० मिमी
डहाणू ... ३६७.० मिमी
जव्हार ... २१५.७. मिमी
तलासरी ... ३०६.० मिमी
वसई ... ३८१.३ मिमी
विक्रमगड ... ३५९.४ मिमी
वाडा ... ४०७.१ मिमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT