मुंबई

मुंबईवरचे संकट थोडक्यात टळले!

CD

मुंबईवरचे संकट थोडक्यात टळले!

मरीन ड्राईव्‍हवरील गर्दी नियंत्रणात यंत्रणा अपयशी

मुंबई, ता. ५ : क्रिकेटची पंढरी अशी ओळख असलेल्या मुंबईत टी-२० विश्‍वचषक विजेत्या संघातील खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी मरीन ड्राईव्‍हवर क्रिकेटप्रेमींची ‘त्सुनामी’ आली होती. या गर्दीवर नियंत्रण मिळवताना पोलिसांची अक्षरश: दमछाक झाली. कोणतेही नियोजन नसल्याने सरकारी यंत्रणा सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून आले. विजयाचा उन्माद आणि जीवघेणा अतिउत्साह यामुळे एखादी चूकही हाथरससारख्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेला निमंत्रण ठरले असते. अस्ताव्‍यस्त पडलेला चपलांचा खच, तुटलेले बॅरिकेड्स, गर्दीत बेशुद्ध पडलेली महिला ही दृश्‍ये पाहिल्यास मुंबईवरचे मोठे संकट टळल्याची खात्री पटत आहे. या नियोजनातील ढिसाळपणाबाबत पोलिसांमधूनही नाराजीचा सूर उमटत आहे.

भारतीय संघाने तब्बल १७ वर्षांनंतर टी-२० विश्वचषकावर पुन्हा आपले नाव कोरले. यानिमित्त विश्वविजेत्या संघाची मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियमपर्यंत विजय यात्रा काढून जल्लोषात स्वागत करण्यात आले. मात्र, यात्रेत होणाऱ्या संभाव्‍य गर्दीचे योग्य नियोजन करण्यात सरकारी यंत्रणा सपशेल अपयशी ठरल्याचे उघड झाले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर गर्दी होईल, याचा अंदाजच त्यांना आला नव्‍हता. गर्दीमुळे गुदमरून बेशुद्ध पडलेल्या क्रिकेटप्रेमी महिलेला चक्क पोलिसांनी खांद्यावर घेऊन गर्दीतून वाट काढली. अन्य १६ जणांनाही गर्दीमुळे श्‍वास घेण्यास त्रास झाल्याने त्यांना जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे हाथरसमधील चेंगराचेंगरी ताजी असताना मुंबईतही उसळलेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी घटना न घडल्याने मुंबईकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. याबाबत पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, सहपोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले.
------
पोलिस दलातून नाराजीचा सूर
विश्वविजेता भारतीय संघ दिल्लीत उतरला, पंतप्रधान मोदींना भेटला; मग घातपात आणि अपघाताचा इतिहास असलेल्या संवेदनशील मुंबईतच मिरवणूक का आयोजित केली गेली? दिल्लीत क्रिकेटचे चाहते नाहीत की काय, असा थेट प्रश्न पोलिस दलातून उपस्थित केला जात आहे. नियोजनशून्य, घिसाडघाईत केलेल्या आयोजनाबाबत मुंबई पोलिसांनी नाराजी व्‍यक्त केली आहे.
---------
ना नियोजनाची बैठक, ना सुरक्षा तपासणी!
विजयी मिरवणुकीत किती गर्दी अपेक्षित आहे, त्याचे नियोजन कसे करावे, याबाबत आयोजक, सरकार आणि पोलिसांची बैठक घेण्यात आली नव्हती. याबाबत पोलिस दलातील विभागांचे मतही विचारात घेण्यात आले नव्हते. घाईगडबडीत अपेक्षित गर्दीचा अंदाज, त्याचे व्यवस्थापन आणि गर्दीच्या अनुषंगाने घातपाती कारवायांबाबतची गोपनीय माहिती गोळा करण्यासाठी लागणारा कालावधी पोलिसांना मिळू शकला नाही, अशी माहितीही पोलिस सूत्रांनी दिली. आंतरराष्ट्रीय, आयपीएल सामने पाहण्यासाठी येणाऱ्या चाहत्यांची मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी होते. गुरुवारी मिरवणूक सोहळ्यासाठी स्टेडियममध्ये जागा मिळवण्यात यशस्वी ठरलेल्या चाहत्यांची झाडाझडतीही घेण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले.
-----
...तर मोठी मनुष्यहानी झाली असती
- स्टेडियम आणि बाहेर दोन लाखांवर चाहते उपस्थित होते. या गर्दीत पाय ठेवायलाही जागा नव्हती. अशा परिस्थितीत एखादी अफवाही चेंगराचेंगरीसारख्या दुर्घटना घडवण्यास कारणीभूत ठरली असती, अशी प्रतिक्रिया एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. यासाठी त्याने काही वर्षांपूर्वी एल्फिन्स्टन रोड (आताचे प्रभादेवी) रेल्वेस्थानकात घडलेल्या चेंगराचेंगरीचे उदाहरण दिले. आमचे (पोलिसांचे) आणि क्रिकेट चाहत्यांचे नशीब म्हणूनच काल असे काही घडले नाही, असे सांगण्यासही तो विसरला नाही.
- विधानसभेच्या निवडणुका नसत्या, तर ही मिरवणूक मुंबईत झाली असती का, असा सवालही त्याने व्‍यक्त केला. २००७ मध्येही टी२० विश्वविजेत्या भारतीय संघाची मिरवणुकीवेळी भारतीय संघाने ओपन डेक बसमधून विमानतळ ते वानखेडे स्टेडियम असा प्रवास केला होता. त्यामुळे गर्दी विखुरली गेल्याने नियोजन सोपे झाले होते. यंदा ही गर्दी एकाच ठिकाणी झाली. त्यातच भारतीय संघ दोन ते अडीच तास उशिरा पोचल्याने ही गर्दी आणखी वाढल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
-----
विलंब फायदेशीर
भारतीय संघ उशिरा पोचल्याने कार्यक्रम उशिरा सुरू झाला आणि उशिरा संपला. हा कार्यक्रम जर नियोजित वेळेत उरकला असता, तर संध्याकाळी कामावरून घरी जाणाऱ्यांच्या गर्दीत चाहत्यांची गर्दी मिसळली असती. चर्चगेट, सीएसएमटी आदी स्थानकांवर जाणाऱ्या सर्व मार्गांवर वाहतूककोंडी झाली होती. स्थानकांवर तोबा गर्दीने अनुचित प्रकार घडू शकले असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT