मुंबई

बदलापूरकरांचा प्रवास खडतर

CD

बदलापूर, ता. ९ (बातमीदार) : मागील ४८ तासांमध्ये मुंबई आणि उपनगरात पडलेल्या जोरदार पावसाचा फटका बदलापूरकरांना बसला. रेल्वे तसेच रस्ते वाहतूक विस्कळित झाल्याने अशा स्थितीत बदलापूरहून मुंबई गाठणे जवळपास अशक्यच होते. रेल्वेशिवाय बदलापूरवासीयांना पर्यायी वाहतूक सेवा उपलब्ध नसल्याने कामावर दांडी मारावी लागते, तसेच खासगी वाहनांनी मजल दरमजल प्रवास करत मुंबई गाठण्याचा खटाटोप करण्याची वेळ येते. सोमवारी (ता. ७) लोकल सेवा विस्कळित झाल्याने बदलापूरकरांना लेट मार्कचा फटका बसला, तसेच अनेकजणांनी पर्यायी व्यवस्था नसल्याने घरीच राहणे पसंत केले.

मुंबई उपनगरातील १० बाय १० च्या खोलीतून चांगल्या आणि परवडणाऱ्या घरांच्या शोधात चाकरमानी बदलापूरमध्ये येतात. परवडणाऱ्या घरांच्या किमती व निसर्गरम्य वातावरणामुळे चाकरमान्यांची बदलापूरला पहिली पसंती असते; मात्र शहरात वास्तव्यास असलेल्या चाकरमान्यांना नोकरीसाठी मुंबई गाठण्यासाठी रोजचा खडतर प्रवास करावा लागतो. बदलापूर शहरातील चाकरमानी पावसाळ्यात पुरता हवालदिल झालेला असतो. त्यातच सोमवारी पहिल्याच पावसात मध्य रेल्वेची सेवा विस्कळित झाली. त्यानंतर बदलापूर शहरातून नोकरीचे ठिकाण, मुंबई गाठणे कठीण होऊन बसले. सकाळी सात वाजल्यापासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत बदलापूरकरांना हा संघर्ष करावा लागला. त्यात अनेकांनी स्टेशनवरून माघारी फिरण्यात शहाणपण समजले, तर काहींनी खासगी वाहनांनी अव्वाच्या सव्वा भाडे देऊन मजल दरमजल करत मुंबई गाठली; मात्र या सगळ्यात मेट्रोची स्वप्ने दाखवणाऱ्या प्रशासनाला साधी शहरातून एक पर्यायी वाहतूक सेवा उपलब्ध करून देता न आल्याने चाकरमानी संताप व्यक्त करत आहेत.

स्थानिक प्रशासन अथवा राज्य परिवहन सेवेच्या निदान बदलापूर ते कल्याण व ठाण्यापर्यंत बस सेवा उपलब्ध करून दिल्या असत्या, तर बदलापूरहून मुंबई, नवी मुंबई व ठाणे असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला असता; मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उदासीनतेचा फटका चाकरमान्यांना बसतो. मागील १६ वर्षांपासून बदलापूर शहरातून उपनगर व मुंबईला जोडणाऱ्या परिवहन सेवा सुरू करण्याचे प्रयत्न केले जात होते; मात्र रिक्षाचालकांनी विरोध दर्शवल्याने येथील नेतेमंडळींनीदेखील या सेवेचा पाठपुरावा करणे बंद केले. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून ही परिवहन सेवा फक्त विचाराधीन आहे.

प्रशासकीय अनास्था
शहरातील प्रवासी संघटना व सुजाण नागरिकांनी प्रशासनावर दबाव टाकला, तर नक्कीच बदलापूरसाठी किमान कल्याण डोंबिवलीपर्यंत जाण्यासाठी तरी परिवहन सेवा उपलब्ध होईल, अशी माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. बदलापूर शहराची समस्या फक्त परिवहन सेवा उपलब्ध नाही, इतकीच नाही, तर शहरातील उदासीन प्रशासकीय यंत्रणा, नेतेमंडळी यांच्या निष्क्रियतेमुळे बदलापूर शहराला कोणत्याच सुविधा मिळत नसल्याची बाब अधोरेखित होत आहे.

चार्जिंग स्टेशनअभावी रखडल्या ई-बस
कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून पाच ते सहा इलेक्ट्रिक बस सेवा उपलब्ध करून देण्याबाबत बदलापूर पालिकेच्या वतीने पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यानंतर कल्याण-डोंबिवली महापालिकेनेदेखील या बस सेवेसाठी हिरवा कंदील दिला; मात्र या इलेक्ट्रिक बस सेवेसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्यात यावेत, अशी अट आहे; मात्र अद्याप हे चार्जिंग स्टेशन उभे राहिलेले नाहीत. त्यामुळे ही परिवहन सेवाही बदलापूरकरांसाठी उपलब्ध करून देता आली नाही, अशी माहिती कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.


पीएमपीएल या पुणे परिवहन यंत्रणेच्या धर्तीवर ठाणे जिल्ह्यातील केएमपीएल परिवहन यंत्रणा उभारण्यात आली आहे. ज्यात कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर महापालिका व अंबरनाथ, बदलापूर नगरपालिकांचा समावेश आहे; मात्र प्रशासकीय अनास्थेमुळे संबंधित यंत्रणा अद्याप सुरू झालेली नाही. कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त या कमिटीवर आहेत, तसेच वरिष्ठ अधिकारी यांचाही समावेश आहे; मात्र इतर कोणत्याही प्रशासकीय स्तरावर याबाबत अजून पुढाकार घेतलेला नाही. शासनाने पीएमपीएलवर आयएएस अधिकारी नेमला आहे, त्याच धर्तीवर आयएएस अधिकारी केएमपीएलवरदेखील नेमावा; मात्र निव्वळ प्रशासकीय अनास्थेपोटी ही सुविधा शहराला मिळत नाही.
संभाजी शिंदे, माजी नगरसेवक


मागील अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पालिका प्रशासनाकडे परिवहन सेवेची मागणी करण्यात येत आहे. बदलापूर शहरात किमान अंतर्गत परिवहन सेवा व उल्हासनगरपर्यंत जाण्यासाठी बस सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे; मात्र पालिकेच्या मुख्याधिकारी यांना याबाबत शहराविषयी कोणतीच आस्था नाही. ते कोणाचे म्हणणेदेखील ऐकून घेत नाहीत. प्रशासकाच्या अनास्थेमुळे बदलापूर शहर या सुविधेपासून वंचित आहे.
आशिष दामले, प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT