मुंबई

Navratri : ५५० किलोचे चांदीचे सिंहासन अन् फुलांची सजावट, नवरात्रोत्‍सवासाठी महालक्ष्मी मंदिर सज्ज

दिनेश चिलप मराठे

मुंबादेवी, ता. २ (बातमीदार) ः दक्षिण मुंबईतील समुद्रकिनारी असलेल्या भुलाभाई देसाई मार्ग येथील महालक्ष्मी मंदिर नवरात्रोत्‍सवासाठी सज्‍ज झाले आहे. महालक्ष्मी मातेच्या उत्सव सोहळ्याची तयारी पूर्ण झाल्‍याची माहिती मंदिराचे व्यवस्थापक नितीन कांबळी यांनी दिली.
आदिशक्तीचे गुप्त तंत्र साधनेतील नवदुर्गा आणि दश महाविद्या यांची गुप्तपणे उपासना करणारे उपासक म्‍हणजेच शाक्त हे देशभरातून महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी येतात.

महालक्ष्मी मंदिरात परंपरेनुसार शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत असतो. देवीचे अनेक भक्त या कालावधीमध्ये मंदिरात दर्शनासाठी येतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील मंदिराने भक्तांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. भाविकांच्या सुरक्षेची चोख व्यवस्‍था केली आहे.

परतीचा पाऊस आणि ऑक्टोबर हिटमुळे बसणारा उन्हाचा तडाखा लक्षात घेता भाविकांसाठी मंदिर प्रशासनाने भुलाबाई देसाई मार्गावरील शोभा हॉटेल ते शीतल स्टोअरपर्यंत मंडप उभारणी केली आहे. रांगेतील भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. मंदिरामध्ये डॉक्टरांचे पथक सज्ज असून प्रथमोपचार पेटीची व्यवस्थाही केली आहे, तसेच मंदिर परिसरात भाविकांसाठी मुंबई महापालिकेने सुलभ शौचालयाची सोय करून दिली आहे. पादत्राणे ठेवण्याची व्यवस्थाही मंदिराच्या प्रांगणात करण्यात आली आहे.

येथील स्थानिक रहिवासी आणि विशेष कार्यकारी अधिकारी (एस.ई.ओ.) उदय लाड हे आपल्या सहकारी मित्रांसोबत नवरात्रोत्सवाचे १० दिवस येणाऱ्या भाविकांना सहकार्य करीत असतात. सुरक्षेसाठी गावदेवी पोलिस ठाणे सज्ज झाले असून वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी ताडदेव वाहतूक पोलिस तैनात करण्यात आले आहेत.


प्रत्येक भाविकाला मेटल डिटेक्टरमधूनच मंदिरामध्ये प्रवेश करणे आवश्यक असून सर्व वस्तू व बॅग्स, पर्स या स्कॅनरमधून स्कॅन करण्यात येणार आहेत. पोलिसांच्या बंदोबस्तासोबतच मंदिराचे सेवेकरी आणि अनिरुद्ध बापू यांच्या संस्थेचे सेवेकरी उत्सव काळात सेवेत असणार आहेत.
नवरात्रोत्सव काळात श्रींच्या पूजेनंतर श्री महालक्ष्मी मंदिर दर्शनासाठी दररोज सकाळी ५.३० वाजता दर्शन सोहळ्यासाठी उघडणार असून सकाळी ७ ते ७.३० वाजेपर्यंत आरतीसाठी, दुपारच्या नैवेद्यासाठी. १२ ते १२.२० पर्यंत, सायंकाळची धुपारती ६ ते ६.४० वाजेपर्यंत, त्यानंतर सायंकाळच्या आरतीसाठी ७.३० ते ८ या काळात मंदिर गाभारा दर्शनासाठी बंद राहील. उत्सव काळात मंदिर दररोज रात्री १०.३० वाजता बंद होईल, असे मंदिर प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.


गुरुवारी (ता. ३) आश्विन शुद्ध प्रतिपदेला नवरात्रोत्सवाचा प्रारंभ होऊन देवीच्या मंदिरात सकाळी ६.३० वाजता ध्वजारोहन, गर्भगृहात घटस्थापना होऊन सकाळी ७ वाजता आरती होईल. सोमवारी (ता. ७) आश्विन शुद्ध पंचमीला ललिता पंचमी पूजन करण्यात येईल. शुक्रवारी (ता. ११) आश्विन शुद्ध अष्टमीला दुर्गाष्टमीनिमित्त अष्टमीच्या होमहवन विधीस सकाळी ८ वाजता आरंभ होऊन दुपारी १२ वाजून ७ मिनिटांनी पूर्णाहुती व त्यानंतर आरती होईल. शुक्रवारी (ता. ११) दुपारी १२ नंतर आश्विन शुद्ध नवमी आणि शनिवारी (ता. १२) आश्विन शुद्ध विजयादशमीला आनंदमय दसरा साजरा करण्यात येणार आहे.


भाविकांना दर्शनासाठी एक नंबर गेट, तर दोन आणि तीन नंबर गेट फक्त स्थानिक साधूबेला सोसायटीसह अन्य सोसायटीतील रहिवाशांना प्रवेशासाठी ठेवण्यात आले आहे. सप्तशती ग्रंथामध्ये वर्णन केल्याप्रमाणे प्रत्येक मंदिर पूर्व दिशेला असावे, त्यामुळे हे मंदिरही पूर्व दिशेला समुद्रकिनारी आहे. समुद्र वसने देवी म्हणजे समुद्रकिनारी राहणारी, असे शास्त्रात लिहिले आहे. इथे मंदिराच्या मागे समुद्र, उजवीकडे पॅसिफिक महासागर, डावीकडे अरबी महासागर आणि मुंबई शहर आहे.

भाविकांची कोणतीही असुविधा होऊ नये, यासाठी उत्तम व्यवस्था केली आहे, असे मंदिर व्यवस्थापक नितीन कांबळी यांनी सांगितले.

फुलांची सजावट

मंदिराच्या गर्भगृहात महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती या तीन देवींच्या मूर्ती एकत्र आहेत. या तिन्ही मूर्ती सुंदर दागिने आणि मोत्यांनी सजवलेल्या आहेत. मंदिराच्या गर्भगृहात ऑर्चीड, गोंडा, तसेच विविध फुलांच्या माळा आणि तोरणाने सजावट करण्यात येते, तर बाहेरील सजावट करताना विद्युत तोरणमाळा या कलशापासून खाली सोडण्यात येतात. देवीचा मुकुट शुद्ध सोन्याचा आहे, त्याचे वजन सुमारे पाच किलो आहे. तिन्ही देवींचे मुख चांदी आणि तांब्याने मढवलेले आहे. १९५० मध्ये मंदिराच्या देखभालीसाठी ट्रस्टची स्थापना करण्यात आली होती.

५५० किलोच्या चांदीच्या सिंहासनावर महालक्ष्मी विराजमान

या मंदिरात ५५० किलो चांदीच्या सिंहासनावर महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती विराजमान असून त्यांचे स्वर्णतेजोमय दर्शन घेण्यासाठी भविकांचा खास ओढा असतो. मंदिराच्या गर्भगृहात खास ऑर्चीडच्या फुलांची आरास करण्यात येते. या मंदिराचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे स्वयंभू मंदिर आहे. या देवींच्या अंगावरील सजावटीच्या अलंकारांची किंमत काही कोटी रुपयांच्या घरात आहे.

आम्ही सर्व मैत्रिणी ठाणे येथून आलो आहोत. उद्या नवरात्र सुरू होतेय. गर्दीमुळे उद्या येणे शक्य नसल्याने आम्ही आजच दर्शन घेतले.
-दिशा राजीव शर्मा, भाविक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Recruitment 2024: पुढच्या आठवड्यात गट ब अन् गट क पदांसाठी मोठी भरती; फडणवीसांची माहिती

Harshvardhan Patil Tutari: हर्षवर्धन पाटलांनी अखेर तुतारी फुंकली, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची केली घोषणा

Bigg Boss 18 : नव्वदच्या दशकातील सेन्सेशनल स्टार शिल्पा शिरोडकर दिसणार बिग बॉसच्या घरात ; "सलमानबरोबर काम करण्याचं स्वप्न"

Mumbai Indians कडून १८ कोटी मिळावे, एवढी हार्दिक पांड्याची पात्रता आहे का? वाचा कोणी केलं हे विधान...

Latest Marathi News Updates : तिरुपती बालाजी लाडू प्रकरणी सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे आदेश

SCROLL FOR NEXT