लोकसभा निवडणुकीनंतर वर्धा जिल्ह्यात तेली-कुणबी समाजाचे राजकीय बलाबलचे गणित बदलले आहे. लोकसभेत तेली समाजाच्या उमेदवाराचा पराभव झाल्यामुळे समाज अस्वस्थ झाला आहे. त्यामुळे राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये विशेषत: पूर्व विदर्भात तेली समाजाची नाराजी दूर करण्याचे मोठे आव्हान काँग्रेस, भाजपपुढे आहे.
वर्धा जिल्ह्यात कुणबी व तेली या दोन समाजाची लक्षणीय ताकद आहे. लोकसंख्येच्या आधारावर या जिल्ह्यात या दोन्ही समाजाला बरोबरीचे राजकीय प्रतिनिधित्व मिळते. गेल्या १० वर्षांपासून खासदार तेली समाजाचा, तर चार आमदारांपैकी तीन कुणबी, तर एक कोमटी समाजाचा, असा समतोल राखला गेला, मात्र रामदास तडस यांच्या पराभवामुळे हा सामाजिक समतोल ढासळला आहे. या पराभवानंतर तेली समाजाचे जिल्ह्यातील राजकीय प्रतिनिधित्व शून्यावर आले आहे. यामुळे तेली समाजात नाराजीची भावना वाढल्याचे चित्र आहे. वर्धा विधानसभा मतदारसंघात
गेल्या १५ वर्षांपासून या मतदारसंघात कुणबी समाजाचा आमदार निवडून येतो, मात्र काँग्रेसने तेली समाजाचा उमेदवार देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. माजी विधानसभा उपाध्यक्ष दिवंगत प्रमोदबाबू शेंडे यांचा मुलगा शेखर शेंडे यांनी या वेळीदेखील उमेदवारीवर दावा केला आहे. त्यांना उमेदवारी मिळाल्यास तेली समाजाची नाराजी दूर होईल, सोबत इतर विधानसभा मतदारसंघात त्याचा फायदा होईल, असे गणित मांडले जात आहे, मात्र शेखर शेंडे तीनदा पराभूत झालेत; ही बाब त्यांच्या मार्गातील अडथळा ठरत आहे, मात्र विपरीत परिस्थितीतही शेंडे यांनी तुल्यबळ लढत दिली होती, हे सर्वजण मान्य करतात. या वेळी परिस्थिती अनुकूल असल्यामुळे कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्याची तयारी शेखर शेंडे यांनी सुरू केली आहे.
काँग्रेसकडून डॉ. उदय मेघे, डॉ. सचिन पावडे हे उमेदवारीच्या स्पर्धेत पुढे आहे. या दोघांचेही आरोग्य तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम आहे. दोघेही कुणबी समाजातून येतात. विद्यमान आमदार पंकज भोयर हेदेखील कुणबी समाजाचे आहेत. भाजपमधूनही तेली समाजाला संधी देण्याची मागणी होत आहे. माजी खासदार सुरेश वाघमारे, अतुल तराळे यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. विद्यमान आमदार यांचा दावाही तेवढाच मजबूत आहे. दुसरीकडे भाजपमधील तेली नेतृत्वाला ओढण्याचा प्रयत्न काँग्रेसने सुरू केला आहे. माजी नगराध्यक्ष अतुल तराळे यांच्याशी काँग्रेसच्या काही नेत्यांनी संपर्क साधला असल्याचे कळते. या ऑफरवर अतुल तराळे हे काय भूमिका घेतात त्यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत.
प्रमुख मुद्दे
- पूर्व विदर्भात तेली समाजाचे प्राबल्य
- नागपूर. गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा जिल्ह्यात समाजाचा प्रभाव
- विदर्भातील २५ ते ३० मतदारसंघांवर प्रभाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.