कचरा, रस्ते, वाहतूक कोंडी ठरणार कळीचे मुद्दे
वेध ठाणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा; मतदारांसमोर मांडावे लागणार विकास व्हिजन
विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असली तरी दिवाळीनंतर खऱ्या अर्थाने प्रचाराचे फटाके फुटण्यास सुरुवात होणार आहे. जागावाटपातील हेवेदावे दूर करत महाविकास आणि महायुतीचे मित्रपक्ष जोमाने कामाला लागणार आहेत; पण यंदाच्या निवडणुकीत केवळ भावनिक मुद्दे घेऊन चालणार नाही. नवमतदारांची मोठी फळी ही विकासकामांवर मतदान करतेच; पण पारंपरिक मतदारही यावेळी अधिक सजग झालेला दिसतो. त्यामुळे उमेदवारांना आपल्या विधानसभा मतदारसंघांत प्रचार करताना स्थानिक मुद्दे आणि समस्यांनाही तोंड द्यावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर दैनिक ‘सकाळ’ने ठाणे जिल्ह्यातील मतदारसंघांमध्ये कोणते कळीचे मुद्दे आहेत, याबाबत घेतलेला आढावा.
ठाण्याला कोंडीने घेरले
राहुल क्षीरसागर
ठाणे : मेट्रो सिटीकडे झेप घेणाऱ्या ठाणे शहरात ठाणे, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा हे तीन विधानसभा मतदारसंघ येतात. हे तीन वेगळे मतदारसंघ असले तरी ठाणे महापालिकेच्या हद्दीत आहेत. त्यामुळे ठाण्याचे प्रवेशद्वार असलेल्या कोपरीपासून ते ओवळाच्या घोडबंदर परिसरापर्यंत सध्या वाहतूक कोंडी हाच कळीचा मुद्दा ठरला आहे. गेल्या १५ वर्षांमध्ये ही कोंडी सोडवण्यासाठी रस्ते रुंदीकरण, उड्डाणपुलांची कामे झाली आहेत; पण सध्या मेट्रोच्या कामांमुळे आणि वाढत्या नागरीकरणासोबतच वाहनांची संख्याही वाढल्यामुळे वाहतूक कोंडीचीच समस्या सर्वाधिक जाणवत आहे.
कोपरी पाचपाखडीला कचऱ्याने ग्रासले
राज्याच्या सत्ता स्थापनेचा केंद्रबिंदू ठरलेल्या ठाणे जिल्ह्यातील कोपरी-पाचपाखडी हा मतदारसंघ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला. हा मतदारसंघ झपाट्याने विकासाकडे झेप घेत आहे. येत्या काही काळात क्लस्टरच्या माध्यमातून या मतदारसंघाचा कायापालट होत आहे. धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना हक्काची पक्की घरे मिळणार आहेत. मतदारसंघाशी त्यांची नाळ जुळली आहे; मात्र सध्या हा मतदारसंघ वाहतूक कोंडी आणि त्याहून जास्त कचराकोंडीने ग्रासला आहे; तर या मतदारसंघात असलेले औद्योगिक क्षेत्र कमी होऊन त्याठिकाणी व्यावसायिक क्षेत्र उभे राहत आहे. त्यामुळे हे लघु व्यावसायिक क्षेत्र टिकवून ठेवणेदेखील आव्हानात्मक बाब येत्या काळात असणार आहे.
मुख्यमंत्र्यांचा अभेद्य किल्ला
सलग तीन वेळा मोठ्या मताधिक्यांनी निवडून आलेले आणि ठाण्याला मुख्यमंत्रिपदाचा मान मिळवून देणारे एकनाथ शिंदे यांचा कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघ अभेद्य किल्ला ठरला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा मतदारसंघ असला तरी गेल्या अनेक वर्षांत येथे एकही मोठा प्रकल्प पूर्णत्वास गेलेला नाही. रस्ते आणि पाण्याची समस्या या मतदारसंघात नाही; पण आनंदनगर, इंदिरानगरसारखी मोठी झोपडपट्टी आहे. अनेक जुन्या, धोकादायक इमारती येथे आहेत. त्यांना हक्काची पक्की घरे देण्यासाठी क्लस्टरचा नारळ फुटला आहे. पहिल्या टप्प्यातील इमारतीचे काम वेगात सुरू आहे. दुसरीकडे विस्तारित ठाणे स्थानकाचे काम अजूनही पूर्णत्वास आलेले नाही. मतदारसंघात खेळण्यासाठी मैदान नाही. तीन हात नाका येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कोपरी पुलाखाली पर्यायी मार्ग तयार करण्यात यश आले आहे. विशेष म्हणजे, ठाण्यातील डिप क्लिनिंगची मोहीम मुख्यमंत्र्यांच्या विधानसभा मतदारसंघातून सुरू झाली; पण सध्या या मतदारसंघातील सी. पी. तलाव कचरा हस्तांतरण केंद्राचे डम्पिंग ग्राऊंडमध्ये रूपांतर झाले आहे.
लघुउद्योग टिकवण्याचे आव्हान
ठाण्यातील वागळे इस्टेट येथील एमआयडीसी क्षेत्र आहे. अनेक लघू औद्योगिक क्षेत्र असून हे क्षेत्र हळूहळू कमी होऊन त्या ठिकाणी व्यावसायिक (कमर्शियल) क्षेत्रात वाढ होत आहे. त्यामुळे या ठिकाणचे लघू औद्योगिक क्षेत्र टिकवून ठेवणे गरजेचे आहे.
पुनर्विकासाचे अडले घोडे
ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार संजय केळकर तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत. यावेळी त्यांच्यासमोर शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे आणि मनसेचे अविनाश जाधव अशी तगडी लढत आहे. दोन सेना विरुद्ध भाजप अशी रंगत येथे असली तरी वाहतूक कोंडी आणि जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मुद्दा ऐरणीवर आहे. जाचक अटी शिथिल झाल्या असल्या तरी स्थानक परिसर दाटीवाटीने वसलेला आहे. त्यामुळे अनेक अडथळे येत आहेत. दोन ते तीन वेळा रस्ता रुंदीकरणाची मोहीमही या मतदारसंघात राबवली; पण आता हे रस्तेही तोकडे भासू लागल्याने ऐन गर्दीच्यावेळी अंतर्गत रस्त्यावर कोंडीचा सामना करावा लागतो. याशिवाय घोडबंदर मार्गावरील उच्चभ्रू वस्त्यांना अपुरा पाणीपुरवठा होत असून टँकरचा फेरा वाढला आहे. वाहतूक कोंडी, कचरा आणि पाणी या समस्यांनी घोडबंदरवासीय हैराण झाले आहेत.
ओवळा-माजिवड्याला पाणीटंचाई, कोंडीचे ग्रहण
राजीव डाके
ठाणे शहर : ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघ ठाणे ते भाईंदरपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे या मतदारसंघातील आमदाराला ठाणे आणि मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्याची काळजी घ्यावी लागते. येथे दोन शिवसेना आणि मनसे अशी तिहेरी निवडणूक होत असली तरी निवडणुकीमध्ये खरी रंगत येणार आहे ती येथील कचरा, पाणी आणि वाहतूक कोंडीच्या समस्येने. उमेदवारांच्या प्रचाराचे हेच तीन प्रमुख मुद्दे असणार आहेत. प्रताप सरनाईक सलग तीन वेळा येथून निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांच्यासमोर उभ्या राहिलेल्या इतर उमेदवारांच्या पाणी, कचरा आणि वाहतूक कोंडीच्या समस्यांच्या आरोपांना उत्तरे देताना चांगलीच दमछाक होऊ शकते.
मतदारसंघामधून घोडबंदर मार्ग जात असल्याने या मार्गावरून जेएनपीटी गुजरातकडे रोज हजारोंच्या संख्येने जड- अवजड वाहने आणि कंटेनरची वाहतूक होत असते. या मार्गाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात नव्याने असलेल्या टोलेजंग इमारती आहेत. परिणामी, येथील रोजगार वाहतूक कोंडीने ते त्रस्त झालेले दिसतात. ठाणे महानगरपालिकेचे कचरा टाकण्याचे दिवा आणि भंडार्ली डम्पिंग ग्राउंड बंद असल्याने शहरातील कचरा उचलणे कठीण झाले आहे. या मतदारसंघांत रोज सुमारे २०० मेट्रिक टनांहून जास्त कचरा जमा होतो. या मतदारसंघांत सात लाखांच्या वर लोकसंख्या आहे. एकट्या घोडबंदर परिसरातील नागरिकांसाठी रोज ९० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. तरीही अनेक सोसायट्यांना पाण्याच्या टँकरवर अवलंबून राहावे लागते.
कळवा-मुंब्य्राचा पाणीप्रश्न ऐरणीवर
किरण घरत
कळवा : मुंब्रा- कळवा मतदारसंघात गेले तीन टर्म राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड मोठ्या मताधिक्यांनी निवडून येऊन या भागातून प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यांनी त्यांच्या मतदारसंघात रस्ते, मैदाने, उद्याने व नागरी भागात गटार, पाणीपुरवठा व अन्य सुविधांची कामे करून मतदारसंघाचा चेहरा बदलण्याचे काम केले आहे; मात्र कळवा पूर्वेतील आतकोनेश्वर, पौंडपाडा, भास्कर नगर या पारसिक डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून येथील नागरिकांना मार्च महिन्यानंतर पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. प्रत्येक निवडणुकीत पाणीटंचाईचा हा प्रश्न कायस्वरूपी सोडविण्याचे आश्वासन राष्ट्रवादी, शिवसेना देत असते; परंतु तो प्रश्न सोडविण्यासाठी हे दोन्ही पक्ष अपयशी ठरले आहेत.
वनविभागाच्या जागेत अनधिकृतपणे अनेक झोपडपट्टी दादांनी अतिक्रमण करून झोपड्या बांधल्या आहेत. या भागात गेल्या काही वर्षांत प्रचंड लोकसंख्या वाढून लाखो लोक गेल्या दोन दशकांपासून वास्तव्याला आहेत. सरकार महायुतीचे असो अथवा महाआघाडीचे; परंतु जेव्हा या बेकायदा उभारलेल्या झोपड्यांवर सरकारकडून कारवाई होते, तेव्हा येथील स्थानिक नेते न्यायालयात जाऊन त्यावर स्थगिती आणतात. त्यामुळे लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकीत हा परिसर राष्ट्रवादी व शिवसेनेसाठी ‘व्होट बँक’ ठरलेला आहे; मात्र त्यांचा पाणी व स्वच्छतेचा प्रश्न मात्र सुटलेला नाही.
कळवा परिसरात पाण्यासाठी स्टेम व एमआयडीसीतून पाणीपुरवठा होण्यासाठी मोठे आठ जलकुंभ आहेत; मात्र या डोंगरी भागात कायमस्वरूपी पाणीयोजना राबविली गेली नसल्याने येथील नागरिकांना दोन ते तीन दिवसांनी पाणी मिळते. त्यामुळे या परिसरात पाणीचोरी करणारे दादा निर्माण झाले आहेत. ते येथे पाण्याच्या मोटर बसवून महिन्याला पैसे देणाऱ्यांना पाइपलाइन तयार करून देतात व पाणी उंचावर पोहोचवतात, त्यामुळे हे दलाल दर महिन्याला पैसेवसुली करतात. तीच परिस्थिती मुंब्र्यात असून कौसाच्या काही भागात व मुंब्रादेवी परिसरातील उंच भागातील नागरिकांना नेहमी पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न
मुंब्र्यात चुहा खाडीपूल, शिबली नगर, अमृतनगर, मुंब्रा कॉलनी परिसरात अनेक ठिकाणी कचरा व गटारे भरून वाहतात. नालेसफाई झालेली नसते, यासाठी आमदारांच्या कार्यकर्त्यांना आंदोलने करावी लागली आहेत. तर, शिळ-डायघर येथील डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न निर्माण झाल्याने मुंब्र्यातील घंटागाड्या कचरा उचलण्यास विलंब करतात. त्यामुळे शहरात नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. यासाठी स्थानिक आमदार आवाज उठवत नसल्याने थोडी नाराजी आहे.
.......................................
कल्याण ग्रामीणला अमृतजलची प्रतीक्षा
शर्मिला वाळुंज
डोंबिवली : कल्याण ग्रामीण विधानसभा या मतदारसंघात पाण्याची समस्या अजूनही तीव्र आहे. अमृत जल योजनेच्या संथगती कामाचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. तर, उपनगरांना मुंबई, ठाणे व नवी मुंबईला जोडणारा मुख्य रस्ता कल्याण- शिळ रोडवरील वाहन कोंडी हादेखील एक जटिल प्रश्न होऊन बसला आहे. कल्याण- शिळ रोडचे सिमेंट काँक्रीटीकरण झाल्यानंतर येथे मेट्रोचे काम आले, सुरळीत वाहतुकीचा बट्ट्याबोळ झाला. सत्ताधारी पक्षांनीच ही कामे आणत कोंडी केल्याचे म्हटले जात आहे.
१४ गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश, नवी मुंबई विमानतळाला स्वर्गीय दि. बा. पाटील यांचे नाव मिळविण्यासाठी लढ्यात सहभागी, दिवा, भंडार्ली येथील डम्पिंग ग्राउंड हटले, भाल गावात डम्पिंग होऊ नये म्हणून पाठपुरावा या विद्यमान आमदार राजू पाटील यांच्या जमेच्या बाजू आहेत; मात्र आमदार पाटील हे सर्वसामान्य नागरिकांना तत्काळ भेटत नसल्याने नागरिकांच्या मनात काहीशी नाराजी आहे.
डोंबिवली मतदारसंघात रस्त्यांची दुरवस्था
डोंबिवली विधानसभा मतदारसंघात आमदार रवींद्र चव्हाण हे चौथ्यांदा रिंगणात उतरून भाजपचा गड राखण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्यासमोर शिवसेनेचे दीपेश म्हात्रे यांचे पुन्हा एकदा आव्हान असले तरी आता शिवसेनेत दोन गट पडले आहेत. त्यात शिंदे गटातून ठाकरे गटात उडी मारत ठाकरे यांनी चव्हाण यांच्याविरोधात शड्डू ठोकला आहे. मंत्री चव्हाण गेले तीन टर्म येथील आमदार असले तरी डोंबिवली क्षेत्राचा विकास झाला नसल्याने नागरिकांच्या मनात नाराजी आहे. शहरातील रस्त्यांची दुरवस्था, रस्त्यावर पडलेले खड्डे, कोंडी ही समस्या तर वर्षानुवर्षे कायम आहे. निवडणुकीच्या तोंडावर शहरातील अनेक रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे एकदम काम हाती घेण्यात आले; मात्र यामुळे आणखीनच कोंडीत भर पडली.
लोकलची संख्या वाढवण्याची मागणी
लोकलमधून अनेक डोंबिवलीकरांचा जीव जात आहे. डोंबिवली लोकलची संख्या वाढवण्यात यावी, अशी मागणी होत आहे; मात्र त्याकडे लक्ष दिले नसल्याने नागरिक नाराज आहेत. विरोधक या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याची शक्यता असली तरी सध्या विरोधात असलेले दीपेश हे पूर्वी सत्तेतील शिंदे गटात होते. त्यामुळे येथील विकासकामांवरून त्यांनी आधी केलेले कौतुकाचे व्हिडिओ भाजप कार्यकर्ते व्हायरल करत त्यांचीच कोंडी करत आहेत. यामुळे डोंबिवली विधानसभा निवडणुकीत मतदारांचाच कौल महत्त्वाचा ठरणार आहे.
.....................................................
खोदलेले रस्ते उल्हासनगरकरांसाठी डोकेदुखी
दिनेश गोगी
उल्हासनगर : रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचे काम सुरू असून त्यासाठी रस्ते खोदण्यात आलेले आहेत; मात्र हेच खोदलेले रस्ते उल्हासनगरकरांसाठी डोकेदुखी ठरले आहेत. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने एमएमआरडीएच्या माध्यमातून सात मुख्य रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यात येत आहेत. त्यासाठी प्रथम सांडपाणी वाहिनी टाकण्यात येत आहे. त्यानंतर अर्ध्या रस्त्याचे काम करताना दुसरा रस्ता हा वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात येत आहे.
सातपैकी जवळपास पाच रस्त्यांचे काम प्रगतिपथावर असून हिराघाट ते पवई श्रीराम चौक, हिराघाट ते डर्बीपर्यंतचे काँक्रीटीकरण कामाच्या प्रतीक्षेत आहे. ड्रेनेजच्या लाइनचे काम पूर्ण झाल्यावर आळीपाळीने रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचे काम सुरू केले जाणार आहे. पवई चौक ते शांतीनगर या रस्त्याचे कामही सुरू असून एक बाजू पूर्ण झाली आहे; पण खोदलेल्या रस्त्यांमुळे वाहतुकीचा ताण हा दुसऱ्या बाजूच्या रस्त्यावर येत असल्याने कमालीची वाहतूक कोंडी होत आहे. उल्हासनगरात स्वस्त वस्तूंची सर्वात मोठी बाजारपेठ आहे; पण या बाजारपेठांचा दर्जा उंचावण्यासाठी आतापर्यंत काहीच प्रयत्न झालेले नाहीत. येथील रस्ते अरुंद आहेत. त्यामुळे कोंडीचा सामना करावा लागतो. शहरातील अनधिकृत जुन्या इमारतींचा प्रश्न कायम आहे.
..................................
अंबरनाथमध्ये डम्पिंगची समस्या
श्रीकांत खाडे
अंबरनाथ : प्राचीन शिवमंदिरामुळे नावारूपाला आलेल्या अंबरनाथ शहराचा चेहरामोहरा गेल्या काही वर्षांत बदलला आहे. मजबूत रस्त्यांपासून ते विविध विकासकामांचा धडाका येथे सुरू आहे. या विकासकामांच्या जोरावर विद्यमान आमदार डॉ. बालाजी किणीकर चौथ्यांदा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. त्यांच्यासमोर शिवसेना ठाकरे गटाचे राजेश वानखेडे यांचे आव्हान आहे; पण लोकसभा निवणुकीच्यावेळी शिवसेना शिंदे गटाचा घटलेला मतदानाचा टक्का महायुतीची डोकेदुखी वाढवणार आहे. याशिवाय कचराकोंडीचा सामानादेखील डॉ. किणीकरांना या निवडणुकीत करावा लागणार आहे. शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार कचरा आणि डम्पिंग ग्राऊंडची उग्र समस्या उभी ठाकली आहे.
अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर शहराचा एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू होण्यासाठी शासकीय पातळीवर हालचाली सुरू आहेत. १४८.६८ कोटींच्या या प्रकल्पाला एमएमआरडीएची तांत्रिक मान्यता मिळाली आहे; मात्र अद्यापि प्रकल्प सुरू होण्याच्या दृष्टीने हालचाली सुरूच झाल्या नाहीत. पाणी, कचरा आणि वाहतूक कोंडीची समस्या आहे. यासाठी सॅटिसअंतर्गत पूर्व पश्चिम भागात वाहनतळ स्कायवॉक यांचा समावेश आहे. याही योजनेला मुहूर्त लागलेला नाही. रेल्वे स्टेशन परिसरात आमूलाग्र बदल झाले, काही सुरू आहे; मात्र प्रवाशांची संख्या लक्षात घेता लोकल गाड्यांची संख्या वाढवावी, महिला लोकल सुरू करावी, अशा मागण्या नागरिकांकडून होत आहेत.
नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करावी, सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार करताना रस्त्याच्या बाजूला असलेली गटारे बंद केली, त्यामुळे पावसाळ्यात पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहते, या समस्येवर तोडगा काढावा.
- रत्नाकर चांदस्कर, रहिवासी, अंबरनाथ
....................................
भिवंडी पूर्व झोपडपट्टी, प्रदूषणाचे आगार
पंढरीनाथ कुंभार
भिवंडी : भिवंडी पूर्व मतदारसंघ या क्षेत्रात मोठ्या संख्येने झोपडपट्टी असून या भागात मोठ्या प्रमाणात हवा, पाणी आणि नदीनाल्यांचे प्रदूषण आहे. त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा सामना येथील करीत आहेत. या सर्व वस्तुस्थितीकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असून रस्ते, पाथवेज आणि गटारे या कामांमधून हे लोकप्रतिनिधी कोणाचा विकास साधत आहेत, याचा शोध घेणे जरूरी बनले आहे.
एमएमआरडीएमध्ये भिवंडी शहराचा समावेश झाल्याने या शासनाच्या संस्थेंतर्गत शहरात अनेक कामे झाली; परंतु त्यापैकी भिवंडी पूर्व क्षेत्रात मोठ्या प्रमाणात झाली. या मतदारसंघात मोठ्या संख्येने कामगार झोपडपट्टीमधून राहत असल्याने त्यांच्या परिस्थितीचा गैरफायदा निवडणुकीसह विविध शासकीय उपक्रमांतून घेतला जातो. या क्षेत्रातील कामगारवर्ग शौचास उघड्यावर जात होता. त्यामुळे एमएमआरडीएच्या माध्यमातून शौचालये बांधली; पण त्यामध्ये येथील नागरिकांना पैसे देऊन जावे लागते. या भागातील गटारे वर्षानुवर्षे साफ केली जात नाहीत; मात्र नवीन गटारे व पाथवेज काही मुदतीत नियमित बनविली जातात. झोपडपट्टी असल्याने त्यामध्ये अमली पदार्थांची विक्री आणि गुन्हेगारीचे प्रमाण जास्त असल्याने सर्वसामान्य लोकांना त्रास सहन करावा लागतो.
धार्मिक ध्रुवीकरण
सरकारी जागेवर झोपडपट्टीत राहणारे कामगार आणि श्रमिक असल्याने ते लोक तुटपुंजा उत्पन्नातून अनधिकृत बांधकाम करतात. तर, काही स्थानिक लोकप्रतिनिधी ट्रस्टच्या जागेवर आणि सरकारी जागेवर इमारती बांधण्यास प्रोत्साहन देतात. त्यामुळे या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात अनधिकृत व कमकुवत बांधकाम केले जाते. त्यामुळे या क्षेत्रात इमारती कोसळण्याच्या घटना जास्त प्रमाणात होतात. या मतदारसंघात लोकवस्तीत मोठ्या संख्येने प्लॅस्टिक दाण्यापासून मोती बनविणे आणि त्यावर कोटिंग करण्याचे कारखाने आहेत. त्यापासून प्रदूषण पसरून लोकवस्तीत नागरिकांना विविध आजार होत आहेत. मतदारसंघात वर्हाळदेवी तलाव आणि कामवारी नदी आहे. या दोन्ही ठिकाणी सांडपाणी गेल्याने हे पाणी प्रदूषित झाले आहे. याबाबत लोकप्रतिनिधी जागृत नाहीत. तसेच, नागरिकांच्या मूलभूत गरजा भागत नाहीत. बऱ्याचवेळा या भागात मतदारांत धार्मिक गोष्टींचे ध्रुवीकरण करून मतांची बेरीज-वजाबाकी केली जाते. त्यामुळे नागरिकांच्या समस्या वर्षानुवर्षे खितपत पडल्या आहेत.
समस्यांच्या गर्तेत भिवंडी पश्चिम
भिवंडी : शासनाने मंजूर केलेल्या भिवंडी महापालिकेच्या विकास आराखड्याची अंमलबजावणी दिलेल्या मुदतीत पूर्ण न केल्याने शहराचा नियोजनात्मक विकास झालेला नाही. शहरात अनेक वर्षांपासून अरुंद रस्ते आहेत. त्यामुळे सिटी बस सुरू झाल्या नाहीत. अरुंद रस्त्यांमुळे वाहनचालकांना अनेकदा वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागते. तर, रिक्षाचालकांना रिक्षास्टँड न दिल्याने त्यांनी नेहमी रस्त्याला वेढा घातलेला आढळतो. पालिकेचे अतिक्रमण विभाग कारवाई करीत नसल्याने जागोजागी फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने पादचाऱ्यांना चालणे कठीण होऊ लागले आहे. तसेच, खड्ड्याचे साम्राज्य असल्याने शहरात रस्ते आहेत काय, असा प्रश्न पडतो.
भिवडी पश्चिम मतदारसंघात यंत्रमाग कारखाने आणि लोकवस्ती अशी मिश्र वस्ती आहे. त्यामुळे टोरेंट पॉवरचे वीज मीटर फास्ट चालतात आणि वीजबिल वाढीव येते, अशा तक्रारी नेहमी नागरिकांकडून आणि यंत्रमाग कारखान्याच्या मालकांकडून नेहमी केल्या जातात. अनेकवेळा हा निवडणुकीचा मुद्दादेखील बनविला जातो; पण राज्य व केंद्र शासनाकडून कोणतीही कारवाई करण्यासाठी लोकप्रतिनिधीला यश आले नाही.
...........................................
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.