सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २० : कल्याण-डोंबिवलीमधील चारही विधानसभा मतदारसंघात सकाळपासून नागरिकांनी केंद्राबाहेर मतदान करण्यासाठी रांगा लावल्या होत्या. या रांगांमध्ये ज्येष्ठ नागरिक, वृद्ध, कामावर जाणाऱ्या नोकरदारांचा सर्वाधिक सहभाग होता. महिला वर्गाची रांगेतील हजेरी लक्षणीय होती. ग्रामीण भागातही मतदार मोठ्या प्रमाणात सकाळीच बाहेर पडल्याचे दिसून आले. मतदारांचा उत्साह चांगला असला, तरी केंद्रावरील मशीन धीम्या गतीने चालत असल्याने मतदार ताटकळत केंद्राबाहेर उभे होते.
डोंबिवली, कल्याण ग्रामीण, कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासूनच मतदान करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडले. कामावर जाणारे कर्मचारी, ज्येष्ठ नागरिकांनी सकाळीच घराबाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानाच्या पाच दिवस अगोदर भारतीय निवडणूक आयोग, पक्षीय उमेदवारांकडून मतदारांना घरपोच मतदान केंद्राच्या ठिकाणाची माहिती व्हाॅट्सॲप, मतचिठ्ठ्यांमधून दिली होती. त्यामुळे मतदार स्वयंस्फूर्तीने मतदान केंद्रावर येत होते. मतदारांचा उत्साह ओसंडून वाहत होता. मतदान केल्यानंतर केंद्राजवळील सेल्फी पॉईंटवर फोटो काढत होते. मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास परवानगी नव्हती, तरी अनेक जणांनी आणले होते.
मतदान केंद्रांबाहेर वृद्ध, ज्येष्ठ नागरिकांना पाणी, आसन व्यवस्थेची सोय करण्यात आली होती. महिला मतदारांसाठी वेगळ्या रांगेची सोय करण्यात आली होती. दुपारनंतर मतदान केंद्रावरील मतदान यंत्र संथगतीने काम करत असल्याच्या तक्रारी मतदारांकडून वाढल्या होत्या. त्यामुळे केंद्रांबाहेरील रांगाचे प्रमाण वाढले होते. मतदान केंद्रांवर महिला, वृद्ध, ज्येष्ठांना प्रथम प्राधान्य देऊन मतदान करून दिले जात होते.
लहान मुले, पाळीव श्र्वानही केंद्रावर
मतदानासाठी सुट्टी असल्याने बहुतांशी नोकरदार रांगेत तिष्ठत राहून मतदान करण्यास लागू नये, यासाठी सकाळीच मतदानासाठी कुटुंबीयांसह बाहेर पडले होते. काही मतदार कौतुकाने आपली लहान मुले, पाळीव श्वान घेऊन मतदान केंद्र परिसरात आले होते.
अमेरिकन काॅर्पोरेटचे मतदान
नोकरीनिमित्त अमेरिकेत राहत असलेल्या काॅर्पोरेट अपूर्वा पांडे दोन दिवसांपूर्वी डोंबिवलीत दाखल झाल्या आहेत. डोंबिवली पूर्वेतील मतदार यादीत नाव असल्याने अपूर्वा यांनी सावरकर रस्त्यावरील संगीता विद्यामंदिरात मतदान केले. तर डोंबिवलीकर युवा मतदाराने कॅनडा येथून १२,५०० किलोमीटरचा प्रवास करून मतदानाचा अधिकार बजावला. राघव पुराणिक यांनी, लोकशाहीचा हक्क बजावण्यासाठी कॅनडाहून भारतात आलो आहे. तसेच, येथील मतदारांनीही सायंकाळी सहाच्या आत मतदान करण्याचे आवाहन केले.
उमेदवार मतदारसंघात
कल्याण पूर्व, पश्चिम, ग्रामीण, डोंबिवलीतील उमेदवार मतदान प्रक्रिया शांततेत सुरू आहे ना. कार्यकर्त्यांकडून मतदारांना मतदानासाठी घराबाहेर काढले जात आहेत की नाही, याची पाहणी करण्यासाठी उमेदवार मतदारसंघात समर्थकांसह फिरत होते. मतदान केंद्रांवरील कर्मचाऱ्यांचे भोजन, त्यांच्या पाण्यासाठी या वेळी चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती. लोकसभेसारखी परिस्थिती यावेळी निर्माण होऊ नये, याची विशेष काळजी निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतली होती.
दोन गटांत बाचाबाची
डोंबिवली पश्चिमेत राजूनगर परिसरात एक माजी नगरसेवक आणि स्थानिक कार्यकर्ता यांच्यात बाचाबाची झाली. भाजपच्या वरिष्ठाने या प्रकरणात मध्यस्थी करून त्यावर पडदा टाकला. ग्रामीणमधील दातिवली भागात दोन गटांत बाचाबाची झाल्याची चर्चा होती. राजकीय चढाओढीतील हे किरकोळ प्रकार वगळता कल्याण, डोंबिवली परिसरात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मतदान केंद्र परिसरात मतदारांना कोणी कसलेही प्रलोभन दाखवणार नाही, याची विशेष काळजी पोलिसांनी घेतली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.