विरार, ता. २० (बातमीदार) : विरार येथे पैसे वाटपावरून झालेल्या राड्यानंतर बुधवारी (ता. २०) सकाळपासून मतदान शांततेत सुरू होते. मंगळवारी घडलेल्या घटनेनंतर या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दुपारी ३ वाजेपर्यंत या ठिकाणी ४०.९६ टक्के इतके मतदान झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले.
सकाळी मतदान सुरू झाल्यानंतर नालासोपाऱ्यातील केंद्रांवर गर्दी झाली होती. सकाळी ११ नंतर ऊन वाढत गेल्याने ही गर्दी कमी होताना दिसली. दुपारी ३ नंतर मात्र पुन्हा मतदानासाठी मतदार बाहेर पडू लागले होते. भाजप आणि बहुजन विकास आघाडीत मंगळवारी झालेल्या राड्यानंतर त्याचे पडसाद मतदानादिवशी उमटतील, असे वाटले होते. परंतु, सकाळपासूनच चोख पोलिस बंदोबस्तात मतदान सुरू झाले. मतदारसंघातील बहुजन विकास आघाडीचे उमेदवार क्षितिज ठाकूर यांनी सपत्नीक आणि आपले वडील आमदार हितेंद्र ठाकूर, आई माजी महापौर प्रविणा ठाकूर, क्षितिज ठाकूर यांचे भाऊ उतुंग ठाकूर, शिखर ठाकूर, मेहुल ठाकूर यांच्यासह विरार येथील नेहरू हिंदी विद्यालय येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावला. तर भाजपचे उमेदवार राजन नाईक यांनी निळे मोरे येथील शाळेत सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला.
मतदारांना मदत करण्यासाठी प्रत्येक पक्षांनी मतदार केंद्रात बूथ तयार केले होते. परंतु, बहुजन विकास आघाडीचे नालासोपारामध्ये सर्वांत जास्त बूथ दिसत होते. त्यापाठोपाठ भाजपचे आणि प्रहार पक्षाचे बूथ दिसत होते. राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसचे तुरळक बूथ दिसत होते. त्यावर वयस्कर कार्यकर्ते दिसत होते. सर्वांत जास्त तरुण बविआच्या बुथवर दिसत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.