मुंबईः शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात आज हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला आहे. उद्या बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन आहे. बाळासाहेब हे वीरपुरुष होते. त्या वीरास अखेरची मानवंदना देण्यासाठी 17 नोव्हेंबर, 2012 रोजी शिवतीर्थावर 40 लाख मर्दांचा सागर जमला. हे भाग्य कुणाला लाभले काय? बाळासाहेबांच्या स्मृतीस आमचे लाखो लाखो साष्टांग नमस्कार, असं अग्रलेखात म्हटलं आहे.
सामनाच्या अग्रलेखात आज काय लिहिलं आहे?
- आज महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान झालेला असताना बाळासाहेब देहाने आपल्यात नाहीत, पण मंत्रालयावर भगवा फडकणे हे त्यांचेच यश आहे. बाळासाहेबांमुळे महाराष्ट्र, मराठी माणूस, हिंदुत्व सतत विजयी होत राहिले. संकटाच्या छाताडावर पाय रोवून ते लढत राहिले! बाळासाहेब हे मनुष्यच होते, पण ते अमर आहेत. ते दैवीपुरुष होते, पण देवानांही त्यांच्या लोकप्रियतेचा, त्यांच्यावरील श्रद्धेचा हेवाच वाटत असावा. बाळासाहेब हे वीरपुरुष होते. त्या वीरास अखेरची मानवंदना देण्यासाठी 17 नोव्हेंबर, 2012 रोजी शिवतीर्थावर 40 लाख मर्दांचा सागर जमला. हे भाग्य कुणाला लाभले काय? बाळासाहेबांच्या स्मृतीस आमचे लाखो लाखो साष्टांग नमस्कार.
- ब्रिटिश काळात किंकेड हे मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश होते. त्यांनी मराठी इतिहासाचा अभ्यास केला, तेव्हा रणझुंजार बाजीरावांविषयी हे मत व्यक्त केले. किंकेड या काळात असता व झुंजार बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी अभ्यास केला असता तर यापेक्षा वेगळे मत व्यक्त केले नसते. अद्भुत शौर्यकथेच्या नायकासारखे शिवसेनाप्रमुख मनाला चटका लावून उठून गेले हेच मत त्याने व्यक्त केले असते. लोकभावना आजही तीच आहे. सन 1969 ते 2012 पर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणावर फक्त एकाच माणसाचा प्रभाव होता. 1991 ते 2012 पर्यंत देशातील हिंदू समाजाचे भवितव्य केवळ एका व्यक्तीच्या हाती होते. ती व्यक्ती म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी मराठी मन तर जपलेच होते, पण त्याचवेळी देशात हिंदुत्वाचा वन्हीदेखील चेतविला होता.
- बाळासाहेबांचे वैशिष्टय़ असे की, सतत चिकाटीने श्रम करण्याची त्यांच्यात जिद्द होती. व्यंगचित्रकाराची नजर असल्याने सूक्ष्म निरीक्षणाची शक्ती होती. सारासार विचार होता. अंगीकृत कार्यावर त्यांची श्रद्धा होती. शिवसेनाप्रमुखांचा जीवनप्रवास झंझावाती होता. त्यामुळे कित्येकांना छत्रपती शिवाजी महाराजांशी त्यांची तुलना करण्याचा मोह झाला. कुणी त्यांची तुलना रणझुंजार बाजी तर कुणी त्यांची तुलना लोकमान्य टिळकांशी केली. ते काहीही असेल, पण बाळासाहेब हे सदैव सेनापतीच राहिले. लोकनायकाने सेनापतीपदी विराजमान होणे हा दुर्मिळ योग बाळासाहेबांच्या बाबतीत घडला. बाळासाहेबांनी समाजातील प्रत्येक घटकाचे नेतृत्व स्वीकारले. शिवसेना स्थापन झाली तेव्हा मुंबईतील मराठी बेरोजगार तरुणांच्या पोटातील आग बाळासाहेबांच्या मुखातून बाहेर पडत होती. त्या ठिणग्यांतूनच मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांचा लढा वणव्यासारखा पेटला.
- त्या लढय़ाचे सेनापती बाळासाहेब ठाकरे होते. बेरोजगार भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी निर्माण झालेल्या एका संघटनेची पुढे देशाला आणि जगाला दखल घ्यावी लागली. हे का घडले? साऱया युरोपभर दिग्विजय मिळविणाऱया आपल्या सैन्याबद्दल फ्रान्सच्या नेपोलियनने म्हटले आहे की, ‘एखाद्या प्रखर, ज्वलंत भावनेमुळे जरी सैन्य लढत असले तरी ते चालते मात्र पोटावरच!’ हे विधान सत्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना याची पूर्ण जाणीव होती. हीच जाणीव बाळासाहेबांना होती म्हणून लढणाऱया लाखो शिवसैनिकांसाठी त्यांनी मुंबई आणि आसपासच्या शहरांत नोकऱया, रोजगाराची व्यवस्था केली. मुंबई-महाराष्ट्रातील रोजगारावर पहिला हक्क भूमिपुत्रांचाच. या लढय़ाची ठिणगी पन्नास वर्षांपूर्वी बाळासाहेबांनी टाकली. त्या विचारांचा प्रसार आज देशभर झाला आहे. प्रादेशिक अस्मिता आणि स्थानिकांना रोजगार यावरच आज निवडणुका लढवल्या जात आहेत (बिहारातही काल तेच दिसले). त्याचे श्रेय बाळासाहेबांनाच द्यावे लागेल. देशभरात प्रादेशिक पक्षांचे ‘राष्ट्रीय’ राजकारण आज जोरात सुरू आहे. त्याचे जनकत्व शिवसेनाप्रमुखांकडेच जाते. देशाच्या राजकारणात प्रादेशिक अस्मितेचा आवाज ऐकला गेला नाही तर अराजकाची ठिणगी पडेल हे सांगणारे बाळासाहेब ठाकरे हेच होते. त्यांनी मराठी माणसांचा लढा धगधगत ठेवून पुढे हिंदुत्वाची मशाल हाती घेतली. राममंदिराच्या लढय़ात ते मर्दासारखे रणमैदानावर उभे राहिले. बाबरीच्या पतनानंतर भल्याभल्यांनी हात वर केले तेव्हा हिंदूंचे तारणहार म्हणून एकमेव बाळासाहेब ठाकरेच गर्जना करीत पुढे आले. ‘बाबरी पाडणारे माझे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे’, अशी सिंहगर्जनाच त्यांनी केली.
- या गर्जनेने संपूर्ण देश रोमांचित झाला. वीज कडाडून तुफान निर्माण व्हावे तसे हिंदुत्वाचे तुफान देशात आले. त्याच तुफानाच्या लाटा आजही उसळत आहेत. देशाच्या राजकारणावर जबरदस्त पकड ठेवणारे, लोकांची नाडी अचूक ओळखून निर्णय घेणारे बेमिसाल नेतृत्व म्हणून बाळासाहेबांची कीर्ती दुमदुमत राहील. लोकांनी बाळासाहेबांना अवतारी पुरुष मानले. अवतारी व्यक्तीच्या लक्षणांपैकी शौर्य, भाग्य आणि श्रद्धा ही लक्षणं बाळासाहेबांच्या जीवनात प्रतित झाली. वैभव आणि यशाच्या मागे ते कधीच लागले नाहीत, पण कीर्ती, यश त्यांच्या मागे आपसूक आले. सत्ता हेच त्यांच्यासाठी यश नव्हते. कमालीची लोकप्रियता, लोकांना त्यांनी दिलेला विश्वास हेच त्यांचे यश होते. यशाच्या शिखरावर असतानाच त्यांनी स्वर्गारोहण केले. वाद, मतभेद, संकटे या सर्वांवर आपल्या ताकदीने मात करून केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर हिंदुस्थानच्या नेत्यांत निर्विवाद श्रेष्ठत्व सिद्ध करून बाळासाहेबांनी आपली जीवनयात्रा संपवली.
Tomorrow balasaheb thackeray 17th November death anniversary saamana editorial
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.