वसई ः वसईच्या मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. यासाठी मार्गदर्शिका पट्टे रस्त्यांवर आखले जातात; परंतु या ठिकाणच्या मार्गावर मार्गदर्शिका पट्टे नसल्याने वाहने दिशा भरकटत भरधाव धावतात. यामुळे अपघात घडण्याची शक्यता व्यक्त होत असून या मार्गावरील प्रवास धोकादायक झाला आहे.
मुंबई ते गुजरात दिशेने रोजच चारचाकी, ट्रक व अन्य अवजड अशी हजारो वाहने महामार्गाचा वापर करून इच्छित स्थळ गाठत असतात; मात्र भटक्या जनावरांचा वावर, उड्डाणपुलाअभावी वाहनचालकांची गैरसोय होत आहे. पथदिव्यांचा अभाव; त्याचबरोबर सुरक्षित जाळ्यांची कमतरता आहे. वाहनांना हटविण्यासाठी यंत्रणा, दुर्घटना घडल्यास महामार्गावर इस्पितळ नसल्याने मुंबई किंवा वसईच्या रुग्णालयात नेण्यासाठी अधिक वेळ लागतो.
त्यातच रस्त्याच्या कडेला अवजड वाहने, वाहतूक कोंडी असते. शिवाय वसई-सातिवली, खानिवडे टोल नाका या रस्त्यावर मार्गदर्शिका पट्टाच नसल्यामुळे चालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. महामार्गावरील व अन्य ठिकाणचे नागरिकही येथूनच प्रवास करत असतात. त्यामुळे त्यांचीदेखील अवजड वाहनांमुळे भंबेरी उडत आहे. अनेकदा वाहने घसरणे, अपघात होणे अशा घटना घडत असून थंडी सुरू झाल्याने मार्गावर धुके पसरत आहे, अशा वेळेस मार्गदर्शिका पट्ट्यांअभावी अडचणीत वाढ होत आहे.
अनेकदा वाहनांत बिघाड झाल्यावर रस्त्याच्या कडेला ती उभी केली जातात. तसेच या मार्गालगत असणाऱ्या ढाब्यात जेवणासाठी चालक वाहने वळवत असतात, अशा वेळी मागर्दर्शक पट्टे असतील, तर योग्य दिशा लक्षात येते; परंतु याची कमतरता असल्याने वाहनांना धोका निर्माण होऊ शकतो. दरम्यान मुंबई-अहमदाबाद महामार्ग सुरक्षित असावा, यासाठी सुसज्ज रस्ते उभारण्यात येत आहेत; परंतु वसईच्या महामार्गावरील रस्ते ठीकठाक असले, तरी सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यास रस्ते प्राधिकरण तोकडे पडत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात यावी, अशी मागणी वाहनचालकांमधून जोर धरू लागली आहे.
महामार्गावर ज्या ठिकाणी मार्गदर्शिका पट्टे नाहीत, त्याची तपासणी करण्यात येईल. माहिती घेऊन त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल. वाहनांची गैरसोय होऊ नये, यासाठी योग्य ती खबरदारी घेऊ.
विवेक देवस्थळी, आयआरबी, अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.