नवी मुंबई : कोरोना महामारीच्या काळात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून 99 नाही तर 100 टक्के कामाची गरज आहे. अशा परिस्थितीत बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही, असा ताकीद वजा इशारा महापालिकेचे नवे आयुक्त अभिजित बांगर यांनी दिला आहे. शहरातील वाढते कोरोनाचे प्रमाण आवाक्यात आणण्यासाठी चाचण्यांवर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. बांगर यांनी मंगळवारी महापालिकेचा कारभार स्विकारला. त्यानिमित्ताने त्यांनी आज पत्रकारांसोबत संवाद साधला.
मुंबईपाठोपाठ नवी मुंबई शहरातही कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत आहे. अशा परिस्थितीत शहरात जास्तीत जास्त चाचण्या करण्यावर भर देणे गरजेचे असल्याचे मत बांगर यांनी व्यक्त केले. त्याकरिता महापालिकेच्या स्वतःच्या मालकीची प्रयोगशाळा उभारणीच्या कामाला गती देणार असल्याचे बांगर यांनी सांगितले. कोरोनासारख्या महामारीच्या काळातही आरोग्य विभागातील कर्मचारी आणि अधिकारी कामातून पळवाटा शोधत आहेत, असा प्रश्न बांगर यांना पत्रकारांनी विचारला असता अशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचे करण्याचे संकेत बांगर यांनी दिले.
जागतिक महामारीच्या सावटात सरकारी सेवेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी 24 तास स्वतःला कामात झोकून दिले पाहिजे, कर्तव्यात हलगर्जी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, अशा शब्दात बांगर यांनी अधिकाऱ्यांना इशारा दिला. शहरातील कोरोनाबाधितांचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी संसर्गाची साखळी खंडीत होणे गरजेचे आहे. त्याकरिता लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी नवी मुंबई पोलिसांची मदत घेतली जाणार असल्याचे बांगर यांनी सांगितले. तसेच सध्या महापालिकेच्या रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयांमध्ये होत असलेल्या उपचारांमध्ये बदल होणे गरजेचे असल्याने तज्ज्ञ जाणकारांची मदत घेतली जाणार असल्याचे बांगर यांनी सांगितले.
शहरात लवकरच एँन्टीजेन टेस्ट सुरू होणार
संशयित रुग्णांना तात्काळ दिलासा मिळावा याकरिता सर्व रुग्णालयांना एँन्टीजेन टेस्ट करण्याची परवानगी देण्यात आली आहे. महापालिकेने स्वतःच्या रुग्णालयांसाठी सुमारे 40 हजार एँन्टीजेन टेस्टच्या किट्स घेतल्या आहेत. त्यामुळे लवकरच शहरात एँन्टीजेन टेस्ट सुरू होणार असल्याची माहिती अभिजित बांगर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नव्या आयुक्तांपुढे नवी आव्हाने
नवी मुंबई महापालिका प्रशासनाला शहरातील वाढत्या कोरोनाबधितांचा प्रमाण नियंत्रणात अपयश आल्यामुळे तत्कालीन आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची उचलबांगडी केल्याची चर्चा शहरात रंगली आहे. त्यामुळे शहरातील कोरोना नियंत्रणात आणणे हे मुख्य आव्हान नवे आयुक्त अभिजित बांगर यांच्यापुढे असणार आहे. त्याप्रमाणे मिसाळ यांनी सुरू केलेल्या कोरोना लॅब उभारणीचे काम पूर्णत्वास नेणे, कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांना शोधून उपचार करणे, शहरातील खासगी रुग्णालयावर नियंत्रण आणून खाटांची उपलब्धता वाढवणे, कोरोनाची संसर्ग साखळी तोडणे, आरोग्य विभागातील निवडक अधिकाऱ्यांची मक्तेदारी मोडीत काढणे, आदी आव्हानांना बांगर यांना सामोरे जायचे आहे.
---
संपादन : ऋषिराज तायडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.