कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात २३ मार्चपासून टाळेबंदी म्हणजेच लॉकडाऊन सुरू झाला; मात्र हा लॉकडाऊन सोबत घेऊन आला बेरोजगारी, उपासमारी आणि नैराश्य. या काळात अनेक निराशाजनक, हैराण करणाऱ्या बातम्या लोकांनी ऐकल्या, अनुभवल्या. पनवेल महानगरपालिका ही त्यापैकीच एक. सुरुवातीला महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या कमी होती; मात्र आपत्कालीन कर्मचाऱ्यांना लागण, परप्रांतीयांची गावाकडे जाण्यासाठी धडपड आदींमुळे रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढू लागला. सोशल मीडियावरून महापालिकेवर, नेत्यांवर, अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले जाऊ लागले. त्या वेळी एक योद्धा संसर्गाची पर्वा न करता, गोरगरिबांसाठी दिवसरात्र लढत होता. ते होते जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष, पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे.
सरकारच्या मदतीची वाट न पाहता, पनवेल शहर तसेच ग्रामीण भागातील अडल्या-नडलेल्यांसाठी त्यांनी मदतीचा हात पुढे केला. जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टने एखाद्या प्रतिसरकारप्रमाणे मदतकार्य सुरू केले.
अन्न सेवा
लॉकडाऊनमध्ये सगळ्यात मोठा व मूलभूत प्रश्न ऐरणीवर आला तो म्हणजे पोटाची खळगी भरण्याचा. हातावर पोट असलेल्या हजारो गोरगरिबांवर उपासमारीची वेळ आली होती. जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टने दिलेल्या मदतीने शेकडो कुटुंबांच्या चुली पेटल्या. अगदी सुरुवातीपासून सुरू केलेले हे मदतकार्य अनलॉकनंतरही अव्याहत सुरूच होते. गरजूंना जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य पुरवण्याचे ट्रस्टचे कार्य आजही संपलेले नाही. महापालिका क्षेत्रातील रोजंदारीवर काम करणारे मजूर असो, नाका कामगार असो वा छोटे व्यावसायिक, ट्रस्टच्या माध्यमातून त्यांच्या जेवणाची, निवाऱ्याची सोय करण्यात आली. या काळात अनेक प्रार्थनास्थळांनीही मदतीसाठी पुढाकार घेतला, त्यांना जे. एम. म्हात्रे यांनी आणखी बळ दिले.
जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
कोरोना काळात गोरगरीब असो वा सर्वसामान्य, प्रत्येकालाच कोणत्या ना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागले. या सर्वांनाच एका फोन कॉलवर अथवा एका ट्विटवर जीवनावश्यक वस्तू घरपोच उपलब्ध करून देण्याची जबाबदारीही प्रीतम म्हात्रे यांनी घेतली. आजतागायत महापालिका क्षेत्रातील हजारो लोकांना प्रीतम म्हात्रे यांनी स्वखर्चातून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे. कामधंदे ठप्प असल्याने नाभिक समाजाच्या लोकांचीही दयनीय अवस्था झाली होती. त्यांनाही म्हात्रे यांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. शाळा व महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थी वाहक संघटनेच्या वाहनचालकांनाही या काळात मदत करण्यात जे. एम. म्हात्रे ट्रस्ट आघाडीवर होते. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील अनेक आदिवासी पाड्यांत त्यांनी रेशनचे वाटप केले.
आरोग्य सेवा
प्रीतम म्हात्रे यांच्या जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेमार्फत नागरिकांसाठी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. रुग्णवाहिका मिळण्यात अडचणी असो वा रक्त ट्रस्टच्या माध्यमातून रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी दिवस-रात्र प्रयत्न सुरू होते. यासाठी रक्तदान शिबिर, ज्येष्ठांसाठी घरपोच आरोग्य सुविधा या वेळी पुरवण्यात आल्या. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी फेस शिल्ड, मास्क व सॅनिटायझरचे वाटप, पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी आर्सेनिक अल्बम ३० औषधाचे मोफत वाटप, उपजिल्हा रुग्णालयात चार महिन्यांच्या कालावधीकरिता वॉर्डबॉय पुरवणे आदींबाबत म्हात्रे ट्रस्टचे कार्य वाखाणण्याजोगे आहे. पनवेलमधील कोरोना संशयितांचे विगलीकरण होत असलेल्या इंडिया बुल्सच्या इमारतीवर लक्ष ठेवून येथील लोकांच्या अनेक समस्या सोडवण्यात, त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था, मनुष्यबळ पुरवण्याचे कामही या वेळी जे. एम. म्हात्रे ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आले.
मोफत बससेवा उपलब्ध
मुंबई, उपनगरातील चाकरमानी असो वा परप्रांतीय, संसर्गाच्या, जीव गमावण्याच्या भीतीने अनेकांनी घरचा रस्ता धरला. हाताला काम नाही, त्याहीपेक्षा जीव महत्त्वाचा असल्याने अनेकांनी मिळेल त्या वाहनाने, मार्गाने, अगदी पायीच मूळ गावी जाण्यासाठी मार्गक्रमण सुरू केले. जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सुमारे १० हजारांपेक्षा जास्त कामगारांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवण्याचे काम करण्यात आले.
टाळेबंदीनंतर जेव्हा रस्त्यावरची सर्वच वाहतूक बंद झाली, अशा अवस्थेत आपला संसार पाठीवर मारून बायको-पोरांसह गावी निघालेल्या कामगारांना म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने बससेवा पुरवण्यात आली. इतकेच नाही, तर ही बस त्या कामगारांना नजीकच्या रेल्वे स्थानक व बसडेपोपर्यंत सेवा देत होती. लॉकडाऊनच्या काळात तब्बल चार महिने ही सुविधा अविरतपणे ट्रस्टतर्फे सुरू होती. परराज्यांतील काही कामगारांना तर त्यांच्या गावी जाण्यासाठी मोफत रेल्वे सुविधाही जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टमार्फत करण्यात आली.
सामाजिक जाणीव
लोकांची कामे, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कुठल्याही पदाची गरज नसते, तर गरज असते ती इच्छाशक्तीची, सामाजिक जाणिवेची आणि माणुसकीची. जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून प्रीतम म्हात्रे यांनी आपले समाजाप्रती असलेले कर्तव्य ओळखले आणि शक्य तितक्या लोकांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच प्रीतम म्हात्रेंच्या रूपात देवमाणूस भेटल्याचे आजही पनवेल परिसरातील अनेक जण सांगतात.
------------------------------------------------
( Edited by Tushar Sonawane )
Unmasking Happiness Personality of social work Pritam Mhatre mumbai marathi news update
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.