कामगार नेते महेंद्र घरत यांनी कोरोना काळात भुकेल्याला अन्न आणि कामगारांना लॉकडाऊन काळातही पगार मिळवून दिला. देशात कोट्यवधींच्या नोकऱ्या गेल्या; परंतु त्यांनी अनेकांना रोजगार मिळवून दिला. आपल्या जन्मदात्या आई-वडिलांनाच त्यांनी देव मानले आहे. त्यांच्या संस्कारांची जाण ठेवून ‘माणूस’ हा त्यांनी केंद्रबिंदू मानला आहे. त्या दृष्टीनेच ते सातत्याने कामगारांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील असतात, लढत असतात. म्हणूनच त्यांना म्हटले जाते- कामगारांची बुलंद तोफ!
महेंद्र घरत यांचा जन्म शेतकरी कुटुंबातला. दिवसभर शेतात राबायचे. उरलेल्या वेळेत शिक्षण घ्यायचे हा त्यांचा तेव्हाचा दिनक्रम. रोजच खडतर परिस्थितीशी सामना, पण शिका आणि संघर्ष करा, हे ब्रीद मनाशी बाळगूनच त्यांनी अवघी वाटचाल केली. पनवेलमधील महात्मा फुले आर्टस्, सायन्स ॲण्ड कॉमर्स कॉलेजात बी.कॉम.पर्यंत शिक्षण घेतले. पदवी घ्यायची, नोकरी धरायची आणि अखेरपर्यंत चाकरमान्यांसारखे मान खाली घालून जगायचे हे त्यांच्या रक्तात नव्हते. सुरुवातीच्या काळात त्यांनी न्हावा येथील माझगाव डॉकमध्ये कामगारांना एकत्र केले. त्यांचे नेतृत्व केले. त्यांचे प्रश्न सोडवले. त्यांना न्याय मिळवून दिला. तेथूनच खऱ्या अर्थाने त्यांनी कामगार क्षेत्रात पदार्पण केले. डिसेंबर २००४ हा त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा काळ. या वर्षात त्यांनी न्यू मेरिटाइम ॲण्ड जनरल कामगार संघटनेची स्थापना केली. आज या संघटनेचे १२ हजार सभासद आहेत. सुमारे १५० कारखान्यांमध्ये संघटना कार्यरत आहे.
आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर कामगार क्षेत्रात त्यांनी उतुंग भरारी मारली. आज ते राष्ट्रीय मजदूर काँग्रेसचे (इंटक) राष्ट्रीय सचिव आहेत. आय.टी.एफ. (लंडन) या बहुराष्ट्रीय महासंघाचे उपाध्यक्ष म्हणून ते काम पाहत आहेत. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन या जागतिक शिखर संघटनेच्या जीनेव्हा येथे झालेल्या परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान त्यांना मिळाला होता. हे सारे यश, सारा संघर्ष, सर्व लढाया यात सामाजिक बांधिलकी आणि न्याय या दोन गोष्टी त्यांनी सातत्याने महत्त्वाच्या मानल्या. म्हणूनच या प्रवासात जीवाला जीव देणारे अनेक सहकारी त्यांनी मिळवले. त्या सहकाऱ्यांना त्यांनी भरभरून दिलेच, पण सर्वसामान्य कामगारांचाही त्यांनी सातत्याने विचार केला.
याचे एक उदाहरण आहे- सिंगापूरमध्ये अलीकडेच आयटीएफ लंडनची परिषद झाली. तेथे जगातून कामगार आले होते. या परिषदेत भारतातील आपल्या कामगार बांधवांनाही सहभागी होण्यास मिळावे यासाठी घरत यांनी वैयक्तिक प्रयत्न केले. एवढेच नव्हे, तर देशातून न्यू मेरिटाइम ॲण्ड जनरल कामगार संघटनेच्या ५० कामगार-सदस्यांना त्यांनी विमानाने सिंगापूरला नेले. त्यात अगदी सफाई कामगार, चालक आणि महिलांचाही समावेश होता. आयुष्यात ज्यांनी केवळ आकाशातून उडणारे ‘विमान’च पाहिले होते, त्यांना त्यांनी सन्मानाने विमान प्रवास घडवला. हे सारे कशासाठी होते? तर जागतिक पातळीवर कामगार क्षेत्रांत होणारे बदल, भावी काळातील आव्हाने आपल्या देशातील कामगारांना समजावीत, कामगारांनी त्या दिशेने सक्षम व्हावे या हेतूने. दरवर्षी अनेक कंपन्यांमध्ये पगारवाढीचे आणि बोनसचे करार करून कामगारांना न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी त्यांची सतत धडपड सुरू असते.
या धडपडीला सामाजिक बांधिलकीची जोड आहे. आपल्या मातोश्रींच्या नावाने त्यांनी ‘यमुना सामाजिक आणि शैक्षणिक संस्थे’ची स्थापना केली आहे. त्या माध्यमातून त्यांचे सामाजिक आणि शैक्षणिक कार्य सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांना त्यांनी संगणक दिले. रुग्णवाहिकांच्या माध्यमातून गरिबांना ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर सेवा दिली. पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेले, सर्व सुविधांयुक्त असे एक भव्य समाजमंदिर त्यांनी आपल्या शेलघर या गावी सिडकोच्या माध्यमातून बांधून घेतले. शेलघरचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून त्यांनी केलेले काम अविस्मरणीय आहे.
कामगारांसाठी, समाजासाठी काम करण्यात एक आगळेच समाधान असल्याचे महेंद्र घरत सांगतात. काही महिन्यांपूर्वीची लॉकडाऊन काळातली ही गोष्ट आहे. एके दिवशी अचानक काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांचा फोन आला. ‘उलव्यात एक कुटुंब संकटात आहे, त्यांना मदत करा’ असे त्यांनी सांगितले. मी तातडीने जाऊन त्या कुटुंबाला भेटलो. त्यांची अडचण समजून घेतली. त्यांना हवी ती सर्व मदत केली. आज ते कुटुंब पूर्णपणे सावरले आहे. स्वतःच्या पायावर उभे आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मनस्वी आनंद वाटतो.
अशा चार ते पाच हजार गरीब लोकांचा आशीर्वाद आज घरत यांच्या पाठीशी आहे. कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या काळापासून पुढील तब्बल अडीच महिने त्यांनी किमान चार ते पाच हजार गरीब गरजूंना अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. रोज दीड हजार गरजूंना उलवे नोड- नवी मुंबई, तळोजा येथे कम्युनिटी किचनच्या माध्यमातून जेवण दिले. काही ज्येष्ठ नागरिक एकटेच राहत असल्यामुळे त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवत होता. हे लक्षात येताच घरत यांनी आपल्या सहकाऱ्यांमार्फत थेट शेतकऱ्यांकडून भाज्या व फळे खरेदी करून ती विनाशुल्क घरपोच पोहोचवण्याची व्यवस्था केली. रायगड जिल्ह्यात आदिवासी बांधवांची संख्या भरपूर आहे. आदिवासी वाड्यांवर जेथे जाण्यासाठी रस्ता नाही, पाण्याची सोय नाही, अशा ठिकाणी महेंद्र घरत यांनी स्वत: ड्रायव्हिंग करत आदिवासी बांधवांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू पोहोचवल्या. खेड्यापाड्यातील गरीब-गरजूंना मास्क, तसेच सॅनिटायझरचे वाटप केले. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित तांबे यांच्या आवाहनानुसार महेंद्र घरत यांनी १ जून रोजी आपल्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. १० हजार कुटुंबांना रोगप्रतिकारक, शक्तिवर्धक होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप आपल्या सहकाऱ्यांमार्फत केले.
लॉकडाऊनच्या काळात कामगारांच्या पगाराचा प्रश्न खूप गंभीर बनला होता; परंतु महेंद्र घरत यांनी आपल्या नेतृत्व कौशल्याने १५० हून अधिक कंपन्यांतील कामगारांना ५० ते १०० टक्केपर्यंत पगारवाढ मिळवून दिली. त्यामुळे कामगारांना आपला संसाराचा गाडा चालवणे शक्य झाले. कामगारांना महेंद्र घरत यांचा खूप आधार वाटतो व त्यांच्याबद्दल आपुलकी वाटते, त्याची ही अशी कारणे आहेत.
पनवेल, उरण विभागात शेकडो गोडाऊन (वेअरहाऊस) आहेत, ज्यांचे काम जेएनपीटी बंदरावर आधारित चालते. येथे २५ हजार भूमिपुत्र कामगार काम करत आहेत. कोरोना संसर्गाने वेअर हाऊसमधील कामगाराचा मृत्यू झाला, तर त्यांनाही ५० लाख रुपये अनुदान मिळावे, अशी मागणी महेंद्र घरत यांनी मुख्यमंत्री व जेएनपीटीचे चेअरमन यांच्याकडे केली होती.
सद्य परिस्थितीत मिळेल ते काम करा, संधीचे सोने करा व बेरोजगारी हटवा, असे कळकळीचे आवाहन ते तरुणांना करतात. लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले; परंतु कामगार नेते महेंद्र घरत यांनी परिसरातील कंपन्यांचा आढावा घेतला. गावोगावी जाऊन तरुणांना रोजगारासाठी प्रशिक्षित करून या कालावधीत किमान २५० तरुणांना पात्रतेनुसार रोजगार मिळवून दिला आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊनमुळे अनेक मालक कामगारांना पगार देण्यास टाळाटाळ करत होते; परंतु महेंद्र घरत यांनी ‘हे पैसे कमावण्याचे दिवस नाहीत, ज्या कामगारांच्या बळावर मोठे झालात त्यांना आता पगार देऊन कोरोनाच्या कठीण परिस्थितीत साथ द्या’ असे ठणकावले. त्यामुळे मालकांनीही नमती भूमिका घेऊन कामगारांना परिस्थितीनुरूप पगार दिला. हे एक कामगार नेते म्हणून महेंद्र घरत यांचे मोठे यश. साहजिकच याचा प्रभाव कामगारांवर पडला. त्यामुळेच ते अध्यक्ष असलेल्या न्यू मेरिटाइम ॲण्ड जनरल कामगार संघटनेच्या ५०० कामगारांनी लॉकडाऊन काळातही नेतृत्व स्वीकारले.
महेंद्र घरत यांनी कोरोना काळात केलेल्या कामाची दखल काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतली. तसेच कामगारांना न्याय मिळवून देण्यात कामगार नेते महेंद्र घरत यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांबद्दल महाराष्ट्र राज्य इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड, जी. संजीवा रेड्डी, तसेच आयटीएफ लंडनचे जनरल सेक्रेटरी स्टिफन कॉटन यांनीही त्यांचे अभिनंदनही केले आहे.
एखाद्या व्यक्तीचे लौकिक यश आपणास दिसते. त्यामागच्या त्याच्या प्रेरणा, त्याचे विचार, त्याने केलेला संघर्ष हे मात्र सहसा नजरेआड होते. खरे तर महेंद्र घरत यांच्यासारख्या व्यक्तीच्या जीवनातील छोट्या-छोट्या प्रसंगांतून, कृतींतून ते दिसतच असते. महिलांना सन्मान आणि अधिकार मिळायला हवेत हे फक्त सांगून चालत नाही. त्यासाठीची कृती घरातूनच करावी लागते. त्याचाच एक भाग म्हणजे महेंद्र घरत यांनी त्यांच्या संपत्तीत मुलासोबत मुलीला आणि पत्नीलाही समान हक्क दिला आहे. या निर्णयाचे समाजातून कौतुक होत असून, ते समाजासाठीही प्रेरणादायक ठरणारे आहे.
प्रत्येकाने आपल्या आई-वडिलांची सेवा करावी. स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी वेळ दिलाच पाहिजे. मी आजही नियमित व्यायाम करतो, क्रिकेट खेळतो. आपण समाजाचे काही तरी देणे लागतो, या भावनेतूनच मी गरीब-गरजूंना मदत करतो.
- महेंद्र घरत,
कामगार नेते.
लॉकडाऊनमध्ये कामगारांना आधार
जे परप्रांतीय कामगार उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार, आसाम, तसेच महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यांतून कामानिमित्त रायगड, नवी मुंबईत आले व लॉकडाऊनमुळे अडकून पडले होते, त्यांना रोजगार नव्हता. अशा वेळी महेंद्र घरत यांनी त्यांना अन्नधान्य वाटप केले. त्यांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी आर्थिक मदत केली. लॉकडाऊनमध्ये आपल्या सहकाऱ्यांसह कामगारांसाठी प्रचंड मेहनत घेतली. कामगारांना मास्क, सॅनिटायझर, कामावर येण्या-जाण्यासाठी पासेस देणे, रेल्वे व बस बंद असल्यामुळे कामगार स्वत:च्या दुचाकीवरून कामावर जात होते; परंतु त्यांना पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळत नव्हते, त्यांना पास देऊन पेट्रोल मिळवून दिले. या वाटतात छोट्या गोष्टी; परंतु सामान्य व्यक्तीसाठी त्या त्या वेळी त्यांचे महत्त्व डोंगराएवढे असते.
---------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
Unmasking Happiness Workers Cannon Mahendra Gharat mumbai corona latest marathi updates news
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.