mumbai : गेल्या दोन दिवसांपासून तुम्ही टेलिव्हिजनवर याकुब मेमनच्या कबरीची बातमी पाहत असाल. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटात सहभाग असल्याचा ठपका ठेवत याकुबला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याला 30 जुलै २०१५ ला नागपुर मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आली. आता त्याच्या मुंबईतील कबरीवर सुशोभिकरण करण्यात आल्यावरुन राजकारण पेटलेलं पाहायला मिळतंय. आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. पण हाच याकुब मेमन निर्दोष असल्याचं अभिनेता सलमान खान म्हणाला होता. नेमकं हे प्रकरण काय आहे ?
ही घटना समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. याकुब मेमनला ३० जुलै २०१५ ला फाशी देण्यात आली. याच्या आदल्या दिवशी अभिनेता सलमान खानने एकामागोमाग एक ट्विट्स केले होते. त्यात त्याने याकुब मेमन निर्दोष असल्याचं म्हंटलं होतं. त्यानंतर त्याच्या घराबाहेर मोठं आंदोलन झालं होतं. सलमानचे वडील सलीम खान देखील सलमानच्या या ट्विट्समुळे नाराज झाले होते. त्यांच्या सांगण्यावरुन सलमानने ते सर्व ट्विट डिलिट करुन माफी मागितली होती.
पहिल्या काही ट्विटमध्ये सलमान म्हंटला होता टायगरला फाशी द्या. नंतर सलमान त्याच्या ट्विटमध्ये म्हणाला होता टायगरसाठी त्याच्या भावाला फाशी दिली जातीये. त्या भावाला टायगर म्हणून घेण्याचा कुठलाही अधिकार नाहीये. पुढे सलमान म्हणाला होता १ निरपराध माणसाचा बळी म्हणजे माणुसकीचा बळी आहे.
सलमानच्या या ट्विटच्या सिरिजमुळे एकच खळबळ माजली होती. सगळीकडून सलमानवर टीका केली जात होती. बीजेपीचे नेते आशिष शेलार यांनी राज्यपालांची भेट घेऊन सलमानला 2002 च्या हिट अॅण्ड रन केसमध्ये बेल मिळाली होती ती रद्द करण्याची मागणी केली. सलमानचे ट्विट म्हणजे कोर्टाचा अपमान आहे असं ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम म्हणाले होते. सलमानने माफी मागितल्यावर हे प्रकरण इथेच थांबल्याचं देखील निकम पुढे म्हणाले होते.सगळीकडून टीकेची झोड उठल्यानंतर सलमान खानने त्याचे ट्विट मागे घेत माफी मागितली होती.
माझ्या वडीलांनी मला बोलावून सांगितले की माझे ट्विट गैरसमज निर्माण करत आहे. म्हणून मी ट्विट मागे घेत आहे.' असं सलमानने ट्विट केले होते.नंतर सलमान म्हणाला होता 'मी अजानतेपणाने केलेल्या ट्विटमुळे गैरसमज पसरत असल्याने मी माफी मागतो.
त्याच्या वादग्रस्त ट्विटबाबत सलमानने केलेल्या खुल्याश्यात तो म्हणाला होता, 'मी टायगर मेमनला त्याच्या कृत्याबाबत फाशी द्यायला हवी असं म्हणालो होतो आणि मी त्यावर ठाम आहे. मला एवढंच म्हणायचं होतं की टायगर मेमनने केलेल्या कृत्याबाबत याकुब मेमनला फाशी द्यायला नको.'
आता नेमका याकुब मेमन कोण आणि टायगर मेमन आणि त्याचा काय संबंध हे समजावून घेऊयात.
याकूब मेनन याचं पुर्ण नाव याकूब अब्दुल रज्जाक मेमन होतं. याकूब चा जन्म 30 जुलै 1962 ला मुंबई येथे झाला. तो पेशाने चार्टर्ड अकाउंटट होता. मेमन कुटूंबात याकुब सर्वात जास्त सुशिक्षित होता.
सन १९९३, मुंबईत ठिकठिकाणी बाँब ब्लास्ट झाले. कित्येक निर्दोष लोकांचे जीव गेले. त्यावेळी हजारो लोक जखमी होते. या घटनेने देशात हाहाकार माजला. या घटनेमागील एक नाव समोर आलं, ते होतं याकुब मेमनचं. याकुब हा या बाँब ब्लास्टमधील मुख्य आरोपी टायगर मेमनचा भाऊ होता. नेपाल च्या काठमांडू येथुन 1994 ला याकूबला पकडण्यात आलं. पुढे त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर त्याला नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. तिथेच त्याला फाशी देण्यात आली.
१९९३ च्या मुंबई बॉम्ब ब्लास्टला आर्थिक मदत पुरवल्याचा आरोप याकुब मेमनवर ठेवण्यात आला होता. त्याचा भाऊ टायगर मेमन हा या ब्लास्टमधील मुख्य आरोप होता. या खटल्यामध्ये याकुबला आर्थिक मदत पुरवल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आलं. त्यानंतर त्याला ३० जुलै २०१५ ला फाशी देण्यात आली.
याकुब मेमनच्या कबरीच्या सुशोभीकरणाचा वाद सुरु झाल्यानंतर पोलिसांनी सगळं सुशोभीकरण हटवून टाकलं. आता या प्रकरणात पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
-राहुल गायकवाड
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.