समत्वं योग उच्यते|
गीतेमध्ये सांगितलेले हे समत्व म्हणजे स्थिरबुद्धी विकसित केल्याने रोजच्या जीवनातील अडथळ्यांवर कसा मार्ग काढता येऊ शकतो, ते पाहू.
आमच्या सोसायटीमध्ये एका जोडप्याशी बोलत असताना विषय थोडा भरकटून कुत्र्यांकडे गेला. साहजिकच माझ्या प्राणिप्रेमामुळे मी म्हणाले, ‘‘मनुष्यांइतकाच प्राण्यांचाही या जगावर तितकाच हक्क आहे. मुलांना मोठ्यांप्रमाणेच निसर्ग आणि प्राण्यांचाही आदर करायला पालकांनी शिकवले पाहिजे. कुत्र्यांना दगड मारू नये, माणसांच्या पिलांना मारलेला आपल्याला आवडेल का?’’ त्यावर ती महिला म्हणाली, ‘‘मग त्या कुत्र्यांनापण समजले पाहिजे ना मुलांवर भुंकू नये, नॉट फेअर!’’ तिच्या या गंभीर, तरीही हास्यास्पद विधानावर मी थक्क झाले. विनोदाचा भाग सोडला, तर आपण पदोपदी आयुष्यात अवास्तव अपेक्षा ठेवत असतो, हेही खरेच. कायम एकमेकांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली वावरतो. नात्यांचे सर्वांत जास्त गुंते अपेक्षांमुळे होतात... अवास्तव अपेक्षा, त्यांचा ताण आणि त्यांचा भंग.
आपला आनंद आपल्या आतच...
आपल्या आनंदासाठी दुसरे कुणीतरी जबाबदार आहे, असे वाटणे आणि अशी अपेक्षा धरणे, हेच मुळात अवास्तव आहे. आपला आनंद आपली जबाबदारी आहे, म्हणजेच तो मिळविण्यासाठी आपण प्रयत्न करणे गरजेचे आहे. स्वतःच्या आनंदी व्यक्तिमत्त्वासह त्या नात्यात सहभागी होणे, ही परफेक्ट पार्टनरशिप. आपण आनंद बाहेर शोधतो. कारण, वर्षानुवर्षे मनाला बाहेर धावण्याची सवय लागली आहे. आपण दिवसातील काही काळ सातत्याने चित्ताचा निरोध करण्याचा अभ्यास केल्यास निर्वृत्तिक आनंद कसा असतो, याचा अनुभव येईल. या अनुभवाशिवाय ओढ तरी कशी लागणार? आपल्या आतील आनंदाच्या साठ्याकडे जाण्यासाठी महर्षी पतंजलींनी सांगितल्याप्रमाणे काही वेळ चित्तवृत्ती निरोध करण्याचा सराव केला पाहिजे. क्षणमात्र घडलेल्या या निरोधाचासुद्धा चित्तावर संस्कार घडत असतो. हळूहळू असे क्षण अधिक होतील व दीर्घकाळ राहतील, तशी मनाची स्थिरता येत जाईल. स्थिर झालेले मन समत्वाच्या दिशेने प्रवास करू लागेल. म्हणजे, दु:खदायक प्रसंगी खेद आणि सुखांच्या प्राप्तीविषयी आसक्ती, हे दोन्ही हळूहळू कमी होऊन नाहीसे होऊ लागतील.
Let come what comes, Let go what goes
हे स्थिर झालेले अंतःकरण रागद्वेष आपल्या ताब्यात ठेवायला शिकते. अंतःकरणाची प्रसन्नता अनुभवू लागते. कारण, शांती नसलेल्या व्यक्तीला सुख तरी कोठून मिळणार? यानिमित्ताने एक छोटा प्रयोग करून पाहूया. कुठल्याही प्रसंगी तुम्हाला वाटले की, एखाद्या व्यक्तीने असे करायला हवे किंवा नको होते आणि वाईट वाटले, तर त्याच क्षणी स्वतःला विचारा, की ती व्यक्ती तुमच्या मनाप्रमाणे वागायला बांधील आहे का? प्रामाणिक उत्तर शोधलेत, तर लगेचच दुःखाची तीव्रता कमी होईल. करून बघा आणि कळवा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.