कामातील प्रगती, आरोग्य, नाती, आर्थिक नियोजन यांचा व्याप काय कमी असतो की त्यात रोज मनोव्यापार पण सांभाळावे लागतात. कधी एनर्जी कमी, कधी कंटाळा, कधी आळस, कधी मूड वर-खाली.. त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला जे काही घडतं ते सगळं आपण आपल्याला लावून घेतो. आपल्याला प्रत्येक गोष्ट पर्सनली घ्यायची सवय असते ज्याचा भार आपण उगीच वाहत राहतो. शाळा-कॉलेजमध्ये आठवते का आपल्याकडे कोणी नुसतं पाहिलं आणि त्यांच्या त्यांच्यात हळूच बोललं किंवा हसलं तर आपल्याला वाटतं की ते आपल्यावर हसत आहेत किंवा आपल्याविषयी बोलत आहेत. याचं कारण आपल्या शंका आणि असुरक्षितता आपण आपल्यावरच लादत असतो. आपल्याला जे आपल्याबद्दल आवडत नाही तेच दुसऱ्याचंही आपल्याबद्दल मत आहे असं आपण गृहीत धरतो. तसं अजिबातच नसू शकतं. उदा. एखाद्या मुलीला वाटत असेल की ती दिसायला चांगली नाही, तर तिची ही असुरक्षितता तिला गृहीत धरायला भाग पाडते की अख्ख्या जगाला वाटतंय की ती चांगली दिसत नाही. आपला मेंदू ज्याचा विचार करत असतो तेच बाहेरही प्रोजेक्ट करतो आणि त्यावरच फोकस करतो. इतर तुमच्याबद्दल काय विचार करतात याची चिंता करत आपण व्यस्त राहतो पण खरं तर ते तुमचा विचारही करत नसतात. आपणच काल्पनिक विश्व निर्माण केलं असतं. जसं आपल्या आयुष्यात बरंच काही चालू असतं तसं त्यांच्याही आयुष्यात बरंच काही चालू असणारच ना!
It''s not about you!
तुम्ही जर कलाकार असाल आणि कोणती ऑडिशन द्यायला गेलात व काही कारणाने तुमची निवड झाली नाही तर त्याचं कारण तुम्ही कामात चांगले नाही, हेच फक्त नसू शकतं. सिलेक्ट न होण्याची अनेक कारणं असू शकतात - दुसऱ्या एखाद्या ओळखीच्या व्यक्तीला संधी मिळाली असेल, त्यांना काहीतरी वेगळं अपेक्षित होतं, काही कारणास्तव आता त्यांची त्या कामाची आवश्यकताच उरली नाही, तो प्रोजेक्टच कॅन्सल झाला इत्यादी.. पण आपण खरी परिस्थिती माहीत नसताना सगळं पर्सनली घेतो आणि त्याचं इतकं भरमसाट दडपण घेतो की आपणच कमी पडलो असा आग्रह धरून बसतो.
Judgement
कोणामुळे आपल्याला त्रास झाला तर त्या व्यक्तीने तसे मुद्दाम आपल्याला त्रास व्हावा म्हणून केलं असंही आपण गृहीत धरतो. ती व्यक्ती त्याच्या परिस्थिती व मनस्थितीप्रमाणे वागत असते. आपल्याला कधी आपल्या आई-वडिलांचा राग आला किंवा त्यांचं वागणं-बोलणं आवडलं नाही तर दोन मिनिटं थांबा.. ते आई-वडील जरी असले तरी आधी माणसं आहेत, त्यांनाही त्यांच्या वैयक्तिक समस्या असणारच आहेत ना! मुलांना वाटतं त्यांच्या पालकांनी कायम परफेक्ट वागावं, असं का? पालक आहेत म्हणून त्यांनी अमुक पद्धतीनेच वागावं असं ओझं त्यांच्यावर टाकू नका.
कधी कोणती गोष्ट तुम्ही वैयक्तिकरीत्या घेतली आहे असं तुमच्या लक्षात आलं तर मनाला पोखरत अस्वस्थ होण्यापेक्षा हे करा
इतर लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात याची चिंता करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा.
तुमची बलस्थाने आणि मूल्यं काय आहेत ते जाणून घ्या. तुमचे काम तुम्ही सर्वोत्तमरीत्या करण्यावर भर द्या, स्वतःवर विश्वास ठेवा.
पटकन निष्कर्षावर पोहोचू नका. घाईत भावनिक प्रतिक्रिया देण्यापेक्षा संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य विचारपूर्वक प्रतिसाद द्या.
तुमचे आयुष्य, तुमचा रोजचा दिवस विधायक कार्यात घालवला तर इतरांचा विचार करायला वेळच उरणार नाही. स्वतःला प्राधान्य द्या. काम, कुटुंब, मित्रमैत्रिणी, ज्यातून तुम्हाला आनंद मिळतो यावर फोकस शिफ्ट करा.
दुसरा वागतो म्हणून तुम्ही खाली उतरून तसेच वागू नका. त्या क्षणाला पटकन करून बसाल आणि नंतर कदाचित पश्चात्ताप होईल.
रोजच्या रोज २० मिनिटे शांत, विचारशून्य होऊन स्वतःपाशी राहण्याची सवय लावली तर बाहेरच्या परिस्थितीनुसार मन हेलकावे कमी कमी देऊ लागेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.