‘Life comes full circle’ असे म्हणतात, हे वाक्य माझ्या आयुष्याचे सार आहे. लहानपणापासून घरापेक्षा नृत्य आणि खेळात मी जास्त रमत असे. धावणे, पोहणे, सायकलिंग यात स्वतःला आणि जगाला विसरायची. हळूहळू विविध स्पर्धा आणि मग राज्य पातळीपर्यंत झेप असं त्याचं स्वरूप होत गेलं. एका दिशेनं शिक्षण सुरू होतचं, शाळा, कॉलेज आणि मग इंजिनिअरिंग असा सहज होत गेलेला शैक्षणिक प्रवास. इतकं खेळल्यामुळं बालपणापासूनच आहार उत्तम होता. त्यामुळं ग्राउंडवरून घरी आलं की घरचं शाकाहारी, सात्त्विक, गरम, प्रेमाने बनवलेलं, पचायला हलकं परंतु पौष्टिक जेवण. पोळी, भाकरी, सर्व भाज्या, कडधान्यं, डाळी, भात, फळे, ताक, दही, दूध, लोणी, तूप, इ. पुढं जाऊन असा आहार ‘डाएट’ नावाने विकला जाईल, असं वाटलं नव्हतं. बाहेरचं खाणे, जंक फूड हे माहीतच नव्हतं. त्या दिवसांचा माझ्या घडण्यात मोठा वाटा आहे, कारण फिटनेस कमावताना मेटाबॉलिजम, खाण्याच्या व इतर सवयी कसे परिणाम करतात, याचा अभ्यास माझ्या नकळत होत गेला.
फिटनेसची पॅशन
फिटनेसने हळूहळू रूप घेतलं – फिटनेस मॉडेलिंगचं! अनेक फोटोशूट्स, मोठ्या ब्रँडच्या ॲडस्, अनेक ब्युटी पॅजंटस् आणि फिटनेस कॉम्पिटिशन्समध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळाला. चीन, दक्षिण अमेरिका, कॅनडा, दुबई, बेरूट, ऑस्ट्रेलिया अशा अनेक देशांत जाऊन काम करण्याची संधी मिळाली. घरातील वातावरण अत्यंत बौद्धिक आणि आध्यात्मिक होतं. वाचन, संस्कृत ग्रंथांचा अभ्यास, गुरुपरंपरा, ध्यानसाधना, शरीराचे स्वास्थ्य, मनाची व बुद्धीची मशागत, योग्य सवयी हे आईमुळं मिळत गेलं. फिटनेसची आवड विविध प्रकारे जपत असताना माझी पॅशन ही मिशन बनत गेली.
मला प्रकर्षानं जाणवू लागलं की मला याच क्षेत्रात काम करायचंय. मी उत्तर शोधत होते आणि मनापासून जोर लावला की गोष्टी घडतात तसं उत्तरं सापडत गेली. घरातील आध्यात्मिक वातावरण आणि माझी फिटनेसची आवड हे मध्यभागी येऊन भेटले आणि शारीरिक-मानसिक आरोग्य या दोन्हीना बांधणारा ‘योग’ हे उत्तर सापडलं.
शिस्त आरोग्याची... आनंदाची...
लोणावळा येथील प्रख्यात योग आणि संशोधन संस्था ‘कैवल्यधाम’ येथून मी योगाचं प्रशिक्षण घेतलं आणि मला उत्कृष्ट शिक्षक मिळाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी घडत गेले. शिकण्याची प्रचंड इच्छा, ऊर्जा आणि योगावर असलेलं प्रेम मला कमी वेळात खूप प्रगती करून देऊ लागलं. शरीरशास्त्राचा अभ्यास, योगाभ्यास, चांगले क्लायंट्स मिळत जाणं या सगळ्या काही वर्षांतील प्रवासानंतर स्वतःचा योग स्टुडिओ स्थापन करायचं ठरवलं. अधिक लोकांपर्यंत पोचून योगशास्त्राद्वारे लोकांच्या शारीरिक व मानसिक विकारांवर-त्रासांवर होलिस्टिक उपचार आणि एकंदरीत हेल्थ कोशंट वाढवायचं ध्येय मनात ठेवून पुण्यात कर्वेनगर येथे स्वतःचा स्टुडिओ सुरू झाला. आसन, प्राणायाम हे कवायत केल्यासारखं नसावं, पारंपरिक योग, हठ योग आणि योग्य मार्गदर्शन लोकांपर्यंत पोचवून त्यांच्यात याची गोडी निर्माण करायची आहे.
शिस्तबद्ध आयुष्य आपल्या आनंदाच्या आड येत नाही किंबहुना आनंदाच्या खऱ्या व्याख्येपर्यंत घेऊन जातं. योगाच्या या ऊर्जेचा लाभ सर्वांनी घ्यावा; कारण तुम्ही आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर असाल, तुमचे काम किंवा पार्श्वभूमी काहीही असेल – योगात प्रत्येकासाठी भरपूर काही आहे. आपण तो अंगीकारून शिस्तबद्ध राहण्याची गरज आहे. योगाविषयी अजून जाणून घेऊच, दर आठवड्याला याच ठिकाणी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.