नागपूर : रामटेक विधानसभा मतदारसंघावर उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेने दावा केला आहे. शिवसैनिकांनी मंथन बैठक घेऊन विधानसभा प्रमुख विशाल बरबटे यांना विजयी करण्याचा संकल्पसुद्धा सोडला आहे. यामुळे काँग्रेसच्या गोटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. या जागेवर माजी अर्थराज्यमंत्री तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनीही निवडणुकीची तयारी केलेली आहे. त्यामुळे जागा वाटपावेळी महविकास आघाडीत मोठे मतभेद उफाळण्याची शक्यता आहे.
शिंदेसेनेमुळे रामटेक कुणाचे यावरून नवा वाद सुरू झाला आहे. युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. आशिष जयस्वाल यांनी तीन वेळा शिवसेनेला तो जिंकून दिला होता. २०१४ युती आणि आघाडी तुटल्यानंतर भाजपच्या मल्लिकार्जुन रेड्डी यांनी जयस्वालांना पराभवाचा धक्का दिला होता. मात्र पाच वर्षांतच त्यांनी अपक्ष लढून कमबॅक केले. ते सध्या शिंदे यांच्यासोबत आहेत. शिवसेना जिंकत आली असल्याने उबाठाने यावर आपला दावा सांगितला आहे. काँग्रेस विरुद्ध शिवसेना असाच आजवर येथे सामना रंगला आहे. त्यामुळे काँग्रेसही मतदारसंघावर आपला हक्क सांगत आहे.
रामटेकमधून लाढण्यास राजेंद्र मुळक इच्छुक आहेत. मागील दहा वर्षांपासून ते रामटेकवरच लक्ष केंद्रित केले आहे. स्थानिकांच्या विरोधामुळे मागील निवडणुकीत त्यांनी माघार घेतली होती. काँग्रेसने गज्जू यादव यांना उमेदवारी देऊन पराभव ओढवून घेतला होता. यादव आता भाजपात गेले आहेत. रामटेक विधानसभा काँग्रेससाठी पोषक मानल्या जाते. जागा वाटपाची कुठलीही चर्चा आणि वाटाघाटी झाल्या नसताना उबाठाने आधीच दावा ठोकल्याने मतभेद उफाळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
संघटक म्हणून जबाबदारी मिळाल्यानंतर विशाल बरबटे यांनी नागपुरातून आपला मुक्काम रामटेकमध्ये हलवला आहे. सुमारे दोन वर्षांपासून ते निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. रामटेक लोकसभेत महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकला आहे. यात काँग्रेस आणि उबाठा दोघेही वाटेकरी आहेत. त्यामुळे ही जागा सोडताना काँग्रेस आणि उबाठाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. बरबटे यांच्या नेतृत्वात विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या पाश्वभूमिवर मंथन बैठक घेतली. यात लोकसभेप्रमाणे रामटेक विधानसभेची निवडणूकसुद्धा ताकदीने लढण्याचा निर्धार करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.