तामसा : नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने हदगाव तालुक्यातील १९ गावांमध्ये जिल्हा परिषद शाळेच्या वर्गवाढीला मंजुरी दिली आहे.
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सविता बिरगे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सात जूनला बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत.
उमरी जहागीर (ता. हदगाव) येथील जिल्हा परिषद शाळेत नवव्या वर्गाला मंजुरी मिळाली आहे. या शाळेत १९७५ पर्यंत चालू असलेल्या दहावी वर्गाचे पुढीलवर्षी या निर्णयामुळे पुनरुज्जीवन होणार आहे.
उमरी जहागीर शाळेची ठाकरे सरकारच्या काळात तालुक्यात मॉडेल स्कूल म्हणून व शिंदे सरकारच्या काळात ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ म्हणून निवड झालेली आहे. या निर्णयामुळे भागातील नववीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची विशेषतः मुलींची मोठी सोय होणार आहे.
शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे वर्गवाढ मंजूर झालेल्या शाळेतील विद्यार्थी व पालकांची पुढील वर्गात प्रवेश घेण्याबाबतची चिंता मिटणार आहे.
पाचव्या वर्गाची वर्गवाढ मिळालेली गावे ः
तामसा तांडा, ब्रह्मवाडी, तळ्याची वाडी, बामणीतांडा, हुलकानी तांडा, नवी आबादी (हदगाव), हदगाव तांडा, खरबी, शिबदरा (नवीन). आठवीची वर्गवाढ मिळालेली गावे ः गोजेगाव, रुई, शिबदरा, बाभळी, उंचाडा, हडसणी, तरोडा, चाभरा. नववीची मान्यता मिळालेली गावे ः उमरी (जहागीर), निमगाव.
उमरी जहागीर शाळेला नवव्या वर्गाची मान्यता मिळाल्याने गावातील मुलींची पुढील शिक्षणाची चांगली सोय होणार आहे. शिक्षण विभागाचा हा निर्णय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयीसाठी चांगला आहे.
- संध्या अमृते, सरपंच, उमरी जहागीर
मी उमरी जहागीर येथील जिल्हा परिषद शाळेत १९७४ मध्ये नवव्या वर्गात होतो. १९७५ मध्ये येथील दहावी वर्ग बंद झाला. गावात पुन्हा नववी व पुढीलवर्षी दहावीचा वर्ग सुरू होण्याचा मनस्वी आनंद वाटतो.
- गजेंद्र शिंदे, निवृत्त सहायक उपायुक्त (समाजकल्याण विभाग)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.