नांदेड : शेतकरी संकटात असतांना केळीचे एजंट आणि व्यापारी याचा गैरफायदा घेत विविध प्रकारे शेतकऱ्यांची लूट करत आहेत. ही लूट थांबविण्यात यावी अशी मागणी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांच्याकडे मंगळवारी (ता. २३) केली आहे.
केळीची मोठी आर्थिक उलाढाल
जिल्ह्यातील अर्धापूर, मुदखेड व नांदेड तालुक्यातील चांगल्या प्रतीच्या केळी देशात व बाहेर देशात उत्पादनासाठी आणि निर्यातीसाठी प्रसिद्ध आहेत. जिल्ह्यातील खरेदीदार आणि कमिशन एजंट यांची मोठ्या संख्येने दुकाने असल्याने येथे केळीची फार मोठी आर्थिक उलाढाल होते. सध्या कोरोनामुळे केळीच्या मालाची उचल नसल्यामुळे अगदी कमी भावात देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. केळीचे चांगले उत्पादन काढण्यासाठी शेतकऱ्यांना खूप मोठी आर्थिक गुंतवणूक करावी लागते. पण इतर शेतमाला सोबतच केळीचे दर खूप खाली कोसळल्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठा आर्थिक फटका बसला आहे.
शेतकऱ्यांच्या अडचणीचा फायदा घेवून लूट
शेतकरी अगोदरच आर्थिक संकटात असतांना केळीचे एजंट आणि व्यापारी याचा गैरफायदा घेत विविध प्रकारे शेतकऱ्यांची लूट करत आहेत. व्यापारी मनमानी पद्धतीने केळीच्या सध्या असलेल्या दरातूनच ६० रुपयांपर्यंत प्रति क्विंटल कमिशन घेत आहेत. तसेच केळीचे घड न मोजताच प्रति क्विंटल १२ किलो पर्यंत दंडा व वजन कपात करून घेत आहेत. सध्या तोड आणि वाहतुकीचे दर मनमानी पद्धतीने आकारले जात आहेत. गाडी भरतांना लागणारी पत्ती न मोजताच भरली जातो. आणि त्याचे ज्यादा वजन दाखवून शेतकऱ्यांची लूट केली जाते. शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत इलेक्ट्रॉनिक काट्यात रिमोटने फेरफार करून अंदाजे दहा टक्क्यांपर्यंत वजन चोरले जाते. तसेच विकलेल्या मालाची पक्की पावती न देता कच्या पावत्या दिल्या जातात.
हेही वाचलेच पाहिजे.....सोयाबीन बियाणे तक्रारीबाबत जिल्हाधिकारी बांधावर....कुठे ते वाचा
व्यापाऱ्यांची नसते नोंद
अनेक केळीचे व्यापारी बाहेर राज्यातून केळी खरेदीसाठी येतात. त्यांची शासन दरबारी कुठेच नोंद नसते. अनेक व्यापाऱ्यांनी याचा गैरफायदा घेत करून शेतकऱ्यांचे पैसे बुडविण्याचे प्रकार घडले आहेत. या सर्व गोष्टींना एखाद्या शेतकऱ्याने विरोध केल्यास सर्व व्यापारी त्या शेतकऱ्यावर अघोषित बहिष्कार टाकून त्याचा माल उचलत नाहीत. अशा प्रकारच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. यामुळे बागायती शेतकरी चांगले उत्पादन निघून सुद्धा आर्थिक लूट होत असल्याने अडचणीत सापडला आहे.
बाजार समिती व जिल्हा उपनिबंधकाचे दुर्लक्ष
कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच जिल्हा उपनिबंधक यांचे या लुटीकडे संपूर्ण दुर्लक्ष असल्यामुळे शेतकऱ्यांना कुणीही वाली उरला नाही अशी परिस्थिती निर्माण झाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. याकडे शासनाने तातडीने लक्ष्य घालून तोडगा काढावा किंवा व्यापारी शेतकऱ्यांची बैठक घेऊन मार्ग काढावा व शेतकऱ्यांची लूट थांबवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्याकडे केली आहे. यावेळी निलेश देशमुख बारडकर, हनुमंत राजेगोरे, नागोराव भांगे पाटील, प्रविण देशमुख, दिगंबर धुमाळ, ज्ञानेश्वर माटे, अरुण सुकळकर आदी शेतकरी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.