देगलूर ः देगलूर मतदार संघाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे गेल्या एप्रिलमध्ये निधन झाल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी शनिवारी (ता.३०) ऑक्टोंबर रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले. निवडणुकीच्या रिंगणात दोन राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांसह इतर सात उमेदवार होते. मात्र शेवटच्या टप्प्यात दोन राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारातच अटीतटीची लढत झाली.
वंचितच्या उमेदवारामुळे या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली. मतदानाला सकाळी सात वाजता सुरुवात झाली. सध्या रबी पेरणीचा हंगाम सुरू असल्याने अनेक शेतकरी व शेतमजूरांनी सकाळीच मतदानाचे आपले कर्तव्य पूर्ण करून पेरणीसाठी शेताकडे रवाना होत असल्याचे चित्र सकाळी दिसून आले.
गेल्या निवडणुकी पेक्षा या निवडणुकीत जवळपास सात हजार मतदार वाढले आहेत. या नवतरुण मतदारांनी मतदानात हिरिरीने सहभाग नोंदविल्याचे दिसून आले. वृद्ध व दिव्यांग मतदारांनीही या मतदानात तरुणांच्या आधारावर मतदानात सहभाग नोंदवला.
उमेदवारांसह मान्यवरांचे मतदान ः
काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी आपल्या मातोश्री श्रीमती शितलताई रावसाहेब अंतापूरकर यांच्यासह अंतापूर येथे मतदान केले. भाजपचे उमेदवार माजी आमदार सुभाष साबणे यांनी पत्नी गंगूबाई सुभाष साबणे यांच्यासह शहरातील पेठअमरापुर शाळेत मतदानाचा हक्क बजावला. वंचितचे उमेदवार डॉ. उत्तम इंगोले यांनी पत्नी नीतुताई इंगोले यांच्यासह रामपूर रोडवरील सावित्रीबाई फुले शाळेत मतदान केले. माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी पत्नी स्नेहलताताई खतगावकर यांच्यासह खतगाव येथे मतदान केले, तर जिल्हा परिषद सदस्या डॉ. मीनलताई निरंजन पाटील-खतगावकर यांनीही खतगाव येथेच मतदान केले. नगराध्यक्ष मोगलाजी शिरसेटवार यांनी शहरात, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रीतम देशमुख यांनी हाणेगव येथे तर माजी सभापती शिवाजीराव देशमुख बळेगावकर यांनी बळेगाव येथे, भाजपेी तालुका अध्यक्ष शिवाजीराव कनकंटे यांनी शहापूर येथे मतदानाचा हक्क बजावला.
सखी मतदान केंद्राची स्थापना ः
शहरातील मतदान केंद्र क्रमांक ५५ हे नगरपालिकेच्या इमारतीत ‘सखी मतदान केंद्र’ म्हणून कार्यान्वित करण्यात आले होते. विशेष म्हणजे या मतदान केंद्रात अधिकाऱ्यांसह सर्व कर्मचारी या महिलाच होत्या.
१९ मशीनमध्ये बिघाड ः
मतदान प्रक्रियेदरम्यान बियु १, सियु तीन व व्हीव्हीपॅट १५ अशा एकूण १९ मशीन मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने त्या तत्काळ बदलून पुन्हा नवीन मशीन बसविण्यात आल्या.
‘वंचित’ची तक्रार ः
मतदारसंघातल्या केरूर तालुका बिलोली येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी मतदाराला पैसे वाटप करतानाचा फोटो समाज माध्यमावर प्रसारित झाला होता.
तसेच भाजपनेही पैसे वाटप केल्याची तक्रार वंचीतचे उमेदवार डॉ. उत्तमराव इंगोले यांनी निवडणूक आयोगाकडे केली असल्याची माहिती वंचीतच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.