नांदेड : राज्यातील महापालिका, नगरपालिकांच्या आगामी निवडणुकीसाठी नगरसेवकांची संख्या १७ टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार नांदेड वाघाळा महापालिकेत सध्या ८१ नगरसेवक असून त्याची संख्या ९२ होणार आहे. त्यामुळे आणखी ११ सदस्य वाढणार आहेत. त्याचबरोबर स्वीकृत सदस्यसंख्याही पाचवरून सहावर जाण्याची शक्यता आहे.
नांदेड नगरपालिका ‘अ’ वर्गात होती. युती सरकारच्या काळात १९९७ मध्ये नांदेड नगरपालिका आणि ‘क’ दर्जाची वाघाळा नगरपालिका एकत्र करून नांदेड वाघाळा महापालिका करण्यात आली. त्यावेळी नांदेड नगरपालिकेची सदस्यसंख्या ५८ होती तर वाघाळाची १७ होती. पहिल्या निवडणुकीत १९९७ मध्ये ६५ सदस्यसंख्या होती आणि स्वीकृत संख्या पाच होती.
त्यानंतर पाच निवडणुका झाल्या. शेवटच्या निवडणुकीत २०१७ मध्ये ८१ सदस्यसंख्या झाली आणि स्वीकृत संख्या पाच होती. नवीन निर्णयानुसार आता ९२ सदस्यसंख्या होणार आहे तर स्वीकृत संख्या सहा होण्याची शक्यता आहे.
मध्यंतरीच्या काळात २०१० मध्ये महापालिका हद्दवाढ होऊन सहा सदस्य वाढले होते. काही दिवसांपूर्वीच महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पुन्हा एकदा हद्दवाढीचा ठराव घेण्यात आला आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने कार्यवाही झाली तरी हद्दवाढ होऊन पुन्हा सदस्यसंख्या वाढण्याची शक्यता आहे. नांदेड महापालिकेची २०११ नुसार पाच लाख ५० हजार ४३९ लोकसंख्या आहे. त्यानुसार सुधारणेनंतर प्रस्तावित सदस्यसंख्या ९२ होणार आहे. येत्या ऑक्टोबर २०२२ मध्ये महापालिकेची निवडणूक असून त्या दृष्टीने त्रिसदस्यीय प्रभाग करण्याचे काम सुरू आहे. त्यात या निर्णयाची भर पडली आहे. त्यामुळे त्या दृष्टीने निवडणूक विभागाला काम करावे लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.