बिलोली ः देगलूर - बिलोली मतदारसंघाची पोटनिवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनली आहे. मागील पंधरवड्यापासून सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या राष्ट्रीय स्तरापासून ते स्थानिक पातळीवरील सर्वच नेतेमंडळींनी एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करून जनतेची करमणूक केली. परंतु मराठवाडा - तेलंगणा सीमेलगत असलेल्या या मतदारसंघातील विकासाच्या प्रश्नावर जाहीरपणे कुणीच भाष्य केले नसल्यामुळे सगळेच राजकीय पक्ष एकाच माळेचे मणी असल्याची चर्चा मतदारातून ऐकावयास मिळत आहे.
या पोटनिवडणुकीत पंढरपुरची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी सत्ताधारी महाविकास आघाडीने राज्यभरातील संपूर्ण यंत्रणा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघात राबविली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी उमेदवारांच्या प्रचारार्थ राष्ट्रीय स्तरावरील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील, विद्यमान मंत्री विजय वडेट्टीवार, अस्लम शेख, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक, ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, शिवसेनेचे आनंद जाधव, आमदार विक्रम काळे, बनसोडे, प्रा. यशपाल भिंगे आदींना प्रचारासाठी पाचारण केले. भाजपकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील, भगवंत खुबा, डॉ. भागवत कराड, रामदास आठवले, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह आजी माजी मंत्र्यांना निवडणूक प्रचारार्थ उतरविले. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड प्रकाश आंबेडकर यांचीही सभा झाली.
मागील अनेक वर्षांपासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या या मतदारसंघाचे नेतृत्व एकेकाळी धर्मनिरपेक्ष जनता दलाने व शिवसेनेने केले आहे.मागील आठ दिवसापासून या मतदारसंघाचे नेतृत्व ठरवणाऱ्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आलेल्या राजकीय पुढाऱ्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून जनतेची करमणूक केली. परंतु या सीमावर्ती भागातील नेमके विकासाचे आणि मूळ प्रश्न काय आहेत, विकासासाठी भविष्यात कोणत्या योजना राबवणे गरजेचे आहे. याकडे राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी भाष्य केले नसल्याने लबाडाचे आवतन जेवल्याशिवाय खरं नाही अशी चर्चा मतदारात आहे.
मराठवाड्यातील सर्वात जुना तालुका म्हणून परिचित असलेल्या बिलोली व देगलूर तालुक्यातील मतदारसंघाचा म्हणावा तेवढा विकास झालेला नाही. तीस तारखेला मतदान होऊन दोन तारखेला निकाल जाहीर होणार आहे. मात्र, या मतदारसंघातील विकासकामांचे काय? हा प्रश्न निरुत्तरित आहे. शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळावी, मांजरा नदीवर बंधारा बांधावा, बिदर - देगलूर - नरसी - नांदेडमार्गे रेल्वेसेवा सुरू व्हावी, लेंडी प्रकल्पाचे काम पूर्ण व्हावे, दोन्ही तालुक्यातील शैक्षणिक दर्जा सुधारावा, सीमावर्ती भागातील भात पिकाचे उत्पन्न लक्षात घेऊन धान खरेदीसाठी हमीभावाचे केंद्र मंजूर करावेत, यासारखे अनेक महत्त्वाचे प्रश्न राजकीय पक्षांकडून चर्चिले गेले नाहीत. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनविली गेली असली तरीही सर्वच पक्ष एकाच माळेचे मणी असल्याची चर्चा होत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.