नांदेड - विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने पहिल्यांदा यादी जाहीर करुन त्यात नांदेडचे भाजपचे एकनिष्ठ डॉ. अजित गोपछडे यांचा समावेश केला होता. त्यामुळे त्यांना आणि नांदेडला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत होती. मात्र, अचानक त्यांच्याऐवजी रमेश कराड यांना उमेदवारी देऊन त्यांना माघार घ्यायला लावली. त्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह अनेकांना डॉ. गोपछडेंना डावलल्याचे खटकले आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी येत्या २१ मे रोजी निवडणुक होत आहे. त्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने चार अर्ज भरण्यात आले होते. त्यामध्ये नांदेडचे बालरोगतज्ज्ञ डॉ. अजित गोपछडे यांचाही समावेश होता. त्यांनी सर्व तयारी करुन मुंबई गाठली आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. मात्र, मंगळवारी (ता. १२) डॉ. गोपछडे यांच्याऐवजी लातूरचे भाजपचे ग्रामिण जिल्हाध्यक्ष रमेश कराड यांना उमेदवारी देऊन डॉ. गोपछडे यांना माघार घेण्यास सांगण्यात आले.
नांदेडला भाजपची स्थिती चांगली
नांदेड जिल्ह्यात कॉँग्रेस आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे वर्चस्व आहे. पूर्वी शिवसेनेचे वर्चस्व होते. मात्र, २०१४ पासून भाजपची नांदेड जिल्ह्यातील परिस्थिती सुधारण्यास सुरवात झाली. मागील वेळेस भाजपचा एक आमदार होता. मात्र, २०१९ मध्ये परिस्थिती बदलली आणि भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर खासदार झाले. तसेच लातूरच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे खासदार सुधाकर श्रृंगारे यांना लोहा - कंधार मतदारसंघातून मोठे मताधिक्य मिळवून दिले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील नऊ पैकी तीन जागा भाजपने जिंकल्या. त्यात आमदार भीमराव केराम (किनवट), राजेश पवार (नायगाव) आणि डॉ. तुषार राठोड (मुखेड) यांचा समावेश आहे. तसेच इतर भाजपच्या उमेदवारांनीही चांगली लढत दिली.
रातोळीकरांना मिळाली संधी
भाजपचे ग्रामिण जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर यांनाही भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी विधान परिषदेवर घेतले त्यामुळे त्यांना आमदार होण्याची संधी मिळाली. श्री. रातोळीकर यांनी केलेल्या कामाची पावती म्हणून त्यांना आमदारकीची संधी मिळाली. त्यामुळे नांदेड जिल्ह्यात एक खासदार आणि चार आमदार भाजपचे झाले. आता डॉ. गोपछडे यांना उमेदवारी मिळाल्यामुळे भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचाही उत्साह वाढला होता.
हेही वाचलेच पाहिजे - Video - साहित्यिक, कवी प्रा. मनोज बोरगावकरांनी व्यक्त केला सकारात्मक विश्वास...
सोशल इंजिनिअरिंगमुळे गणित बिघडले
भाजपने सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग केल्यामुळे गणित बिघडले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला मराठा आणि लिंगायत असा मुद्दा उपस्थित झाला की डॉ. गोपछडे यांचे नाव मागे पडायचे. आता विधानपरिषदेच्या माध्यमातून उमेदवारी मिळाल्यानंतर पक्षनिष्ठा बाळगणाऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळू शकते, असे आश्वासक वातावरण तयार झाले होते तसेच अन्याय दूर झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली होती. पण पुन्हा अन्याय झाला. उमेदवारी देऊन ती परत घ्यायला लावल्यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांचा तसेच लिंगायत समाजाचाही अपमान झाल्याची भावना तयार झाली असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. आता भविष्यात भाजप आणि पक्षश्रेष्ठी यातून काय मार्ग काढणार? हे पाहणेही महत्त्वाचे ठरेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.