नांदेड : मराठवाड्यातील नांदेड, परभणी व हिंगोली या जिल्ह्यांना बुधवारी (ता.१०) सकाळी सात वाजून १४ मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला. त्याची ४.५ रिश्टर स्केल नोंद झाली. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील रामेश्वर तांडा (ता. कळमनुरी) या गावात होता. या भूकंपाचे धक्के परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांच्या काही भागांनाही बसले.
नांदेड शहर व जिल्ह्याला जाणवलेला धक्का सौम्य स्वरूपाचा असून कुठेही नुकसान झालेले नाही, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले. यापूर्वी २१ मार्चला जिल्ह्यात सहाव्यांदा भूकंपाची नोंद झाली होती. त्यावेळीही त्याची तीव्रता ४.५ रिश्टर स्केल होती. चार महिन्यानंतर पुन्हा एकदा जिल्हा भुकंपाच्या धक्क्याने हादरला. नांदेड जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत वारंवार भूकंप होत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. आज दैनंदिन कारभार सुरू होताच सकाळी सात वाजून १४ मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला. त्यामुळे घरांवरील लोखंडी पत्रे, भांड्यांचा आवाज झाला. ठिकठिकाणचे नागरिक भितीने रस्त्यावर आले. अनेक जण एकमेकांना सावध करत घराबाहेर येण्यास सांगत होते. दरम्यान, नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे. गावांत घरांवरील पत्र्यांवर अनेक जण आधारासाठी दगड ठेवतात. अशांनी ते त्वरीत काढून घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
यापूर्वी भूगर्भात ‘स्वार्म ॲक्टिव्हिटी’ होत होती. यात मोठ्या तीव्रतेचे भूकंप नसतात. परंतु आता ४.५ रिश्टर स्केलच्या भूकंपाची दुसऱ्यांदा नोंद झाली आहे. याचे कारण सांगता येणार नाही. भूगर्भातील काही हालचालींमुळे भूकंप होत आहेत. या हालचालींचा शोध, अभ्यास सुरू आहे.
-डॉ. टी. विजयकुमार, भौतिकशास्त्र विभागप्रमुख, ‘स्वारातीम’ विद्यापीठ
हिंगोली जिल्ह्यातल वारंगा फाट्याच्या पश्चिमेला रामेश्वर तांडा नावाच्या गावशिवारात भूकंपाचे केंद्र दिसून येत आहे. स्थानिक माहिती घेतली असता पहाटे सहाच्या दरम्यानही हलका हादरा जाणवला. त्यानंतर ठिकठिकाणी सकाळी सव्वासातच्या सुमारास जास्तीचा हादरा जाणवला. राष्ट्रीय भूकंपमापन संस्थेने त्याची नोंद घेतली आहे. त्यानुसार ती ४.५ रिश्टर स्केल दाखवत आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या सर्व भूकंपमापन यंत्राद्वारे येणाऱ्या नोंदीची तपासणी करून घेतली जात आहे. विद्यापीठाने नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली जिल्ह्यात १६ ठिकाणी भूकंपमापन यंत्रणा उभारली आहे.
प्रा. डॉ. अविनाश कदम, संचालक भूशास्त्र संकुल
‘स्वारातीम’ विद्यापीठ
नागरिकांनी घाबरून जाऊ नये ; अजित पवार
‘मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यांत बुधवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाने नागरिकांनी घाबरून न जाता सावध राहून बचावासाठीच्या दिलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. गावांमध्ये ज्या घरांवर पत्र्याचे छत आहे, त्यावर आधारासाठी ठेवलेले दगड काढून टाकावेत,’ असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.