किनवट ( जिल्हा नांदेड ) : ए. पी. अँड जी. पी. असोसिएटस (जे. वी.) कंत्राटदार, अकोला यांनी शुक्रवारी (ता. नऊ) सकाळी ११ वाजता समतानगर, किनवट येथील पाण्याच्या टाकी परिसरात आयोजित केलेल्या किनवट शहर वाढीव पाणी पुरवठा ( नळ ) योजनेच्या खासगी कार्यक्रमात उपस्थित राहून जमावबंदीच्या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या लोकप्रतिनिधी, अधिकारी व पदाधिकारी यांच्यावर गुन्हे नोंदविण्यात यावेत. अशी मागणी शहरातील कांही कायदाप्रेमी नागरिकांनी केल्याने जमावबंदीचे उल्लंघन करणाऱ्या लोकप्रतिनिधी, अधिकारी व पदाधिकारी यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या दिवसा सात ते रात्री आठ या काळात जमावबंदी लागू आहे. तर रात्री आठ ते सकाळी सात या काळात संचारबंदी लागू आहे. असे असतानाही आज ए. पी. अँड जी. पी. असोसिएट ( जे. वी. ) यांनी सकाळी ११ वाजता समतानगर पाण्याच्या टाकी परिसरात किनवट शहर वाढीव पाणी पुरवठा ( नळ ) योजनेच्या भूमिपूजनाचा खासगी कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमास जमावबंदीचे आदेश धाब्यावर बसवत जवळपास १०० च्या आसपास लोक उपस्थित होते.
विशेष म्हणजे जमावबंदी व संचारबंदी कायद्याचे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ज्या तालुका प्रशासनातील अधिकाऱ्यावर असते त्यापैकीच कांही जण या कार्यक्रमास उपस्थित होते. यात सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार, आमदार भीमराव केराम, तहसीलदार उत्तम कागणे, मुख्याधिकारी निलेश सुंकेवार, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, उपनगराध्यक्ष व्यंकट नेम्मानीवार, पाणीपुरवठा सभापती अजय चाडावार यांच्यासह नगरसेवक व नगरपरिषद कर्मचारी यांचा प्रमुख सहभाग होता.
कालच ( ता. आठ ) सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शांतता समितीची बैठक झाली होती. या बैठकीचा समारोप करतांना किर्तीकिरण पुजार म्हणाले होते की, "कोविड- १९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहरात जमावबंदी व संचारबंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या कायद्याचा भंग करणाऱ्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल.
वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी, अधिकारी व पदाधिकारी यांनीच एका कंत्राटदाराच्या खासगी कार्यक्रमास उपस्थित राहून जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. यांच्यावर जिल्हाधिकारी काय कार्यवाही करतील याकडे किनवटकर जनतेचे लक्ष लागले आहे. दरम्यान, जमावबंदीचे उल्लंणघन करणाऱ्या अधिकारी, पदाधिकारी व लोकप्रतिनिधीवर गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी फिर्याद सामाजिक कार्यकर्ते अभय नगराळे यांनी पोलिस निरीक्षक व उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडे केली आहे.
लोकप्रतिनिधी, अधिकारी व पदाधिकारी यांनी जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला नाही, तर येत्या महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात जनता जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याशिवाय राहणार नाही, हेही तितकेच खरे आहे.
संपादन- प्रल्हाद कांबळे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.