नांदेड : यंदा समाधानकारक तसेच वेळेवर पर्जन्यमान होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी ८० ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतर सोयाबीनची पेरणी करावी. तसेच कपाशीचीही लागवड जमिनीत आवश्यक ओलावा झाल्यानंतरच करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले आहे. जिल्ह्यात खते-बियाणांची मुबलकता असल्याचे त्यांनी यावेळी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
आठ लाख हेक्टरवर होणार पेरणी
जिल्ह्यात खरिपामध्ये यंदा आठ लाख हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. यामध्ये सर्वाधिक चार लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी होईल तर कापसाची दोन लाख हेक्टरवर लागवड होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. सोयाबीनच्या पेऱ्यात वाढ तर कपाशीची लागवड घटण्याचा अंदाजही व्यक्त केला आहे. मागील वर्षी तीन लाख ७० हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. यात वाढ होऊन यंदा तीन लाख ९५ हजार हेक्टरवर सोयाबीन पेरले जाईल. सोयाबीन नंतर हरभरा पेरणी करता येत असल्याने शेतकरी सोयाबीनकडे वळत आहेत. तर कपाशीला समाधानकारक दर मिळत नसल्याने कपाशी लागवड कमी होत आहे.
घरच्या सोयाबीन बियाणांची करावी पेरणी
सोयाबीनचे बियाणे बाजारामध्ये उपलब्ध आहे. यात महाबीज तसेच खाजगी कंपन्यांच्या बियाणाचा समावेश आहे. परंतु शेतकऱ्यांनी एकदा घेतलेले सोयाबीनचे बियाणे तीन ते चार वर्षापर्यंत वापरता येते. यात उगवण क्षमता तपासून ६५ ते ७० टक्के बियाणे उगवण झाली तर ते पेरणीस वापरता येते. यासोबतच कपाशी दोन लाख हेक्टरवर लागवड होण्याची शक्यता आहे. कपाशीचे जिल्ह्याला दहा लाख पाकीट लागतील. जिल्ह्यात १४ लाख कपाशीचे बियाणे उपलब्ध असल्याचे श्री चलवदे यांनी सांगितले. सोयाबीनची पेरणी बीबीएफ पद्धतीने करावी. यामुळे सोयाबीनचे बियाणे एकरी २० किलो लागते तसेच उत्पादनात वाढ होते असे ते म्हणाले. कपाशीमध्ये तूर, उडीद व मुगाचे आंतरपीक घ्यावे. तसेच सोयाबीनमध्येही तुरीची लागवड करावी. या मुख्य पिकासोबत जिल्ह्यात लागणाऱ्या मुग, तूर, उडीद व ज्वारी या पिकांचे बियाणे ही उपलब्ध आहे.
हेही वाचलेच पाहिजे - धक्कादायक : तेरा दिवसाच्या बालकाचे अपहरण
दोन लाख २७ हजार टन खत आवंटन मंजूर
जिल्ह्यासाठी आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना लागणाऱ्या रासायनिक खताची मागणी कृषी विभागाने राज्याच्या कृषी आयुक्तालयाकडे केली होती. त्यानुसार दोन लाख २७ हजार ९८० मेट्रिक टन खताचे आवंटन मंजूर झाले आहे. कृषी विभागाच्या मागणीनुसार एप्रिल महिन्यामध्ये एकूण ३१ हजार २३२ मेट्रिक टन खताचा पुरवठा झाला आहे. मागील वर्षीचे ४० हजार टन खत शिल्लक आहे. त्यामुळे यंदा पेरणीमध्ये खताची तसेच बियाणाची कमतरता नाही.
थेट बांधावर खते-बियाणांचा पुरवठा
शासनाने केलेल्या आवाहनानुसार कृषी विभागाने ‘आत्मा’ तसेच शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बांधावर खते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. यात जिल्ह्यात आठशे शेतकरी गटांना पाच हजार मेट्रीक टन खताचा पुरवठा केला आहे. तर तीन ते चार हजार क्विंटल बियाणे बांधावर नेले आहे. बांधावर खते पोहोचल्याने वाहतुकीचा खर्च तसेच बियाणाच्या किमतीतही बचत झाला.
कपाशीची लागवड जूनमध्ये करावी
गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी कपाशीची लागवड ता. २५ मे नंतर करण्याचे आवाहन केले. ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहे अशा शेतकऱ्यांनी पाच जूननंतर कपाशीची लागवड करता येते. यामुळे शेतकऱ्यांनी यंदा आवश्यक पाऊस पडल्यावर पेरणीला सुरुवात करावी. खते तसेच बियाणांची उपलब्धता असल्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये असेही श्री चलवदे यांनी सांगीतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.