जगणं झालं महाग महागाईने हिरावला घास sakal
नांदेड

जगणं झालं महाग महागाईने हिरावला घास

जीवनावश्‍यक वस्तूंच्या भाववाढीचा भडका

राजेश नागरे

नाशिक : महागाईने कळस गाठला असून, जीवनावश्‍यक वस्तूंच्या महागाईचा भडका उडाला आहे. त्यामुळे सामान्य माणसाचे जगणे महाग झाले आहे. पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीमुळे वाहनांसाठीचा सीएनजी गॅस, घरगुती गॅस सिलिंडरपासून कुटुंबासाठी दैनंदिन लागणारा किराणा मालाच्या किमती वधारल्या आहेत.

पेट्रोल-डिझेलच्या भावात झालेल्या वाढीमुळे कंपन्यांनी पंपासाठी इंधन पुरवणे बंद केले आहे. त्यामुळे पंपचालकांच्या संघटनेच्या माहितीनुसार शहर आणि जिल्ह्यातील कंपन्यांचे जवळपास ५० पंप बंद आहेत. जिल्ह्यातील पंपांची संख्या ४५० पर्यंत आहे. तसेच, घरगुती गॅस सिलिंडरची किंमत हजाराच्या पुढे तरी जाणार नाही, अशा धास्ती गृहिणींमध्ये आहे. किराणा मालामध्ये क्विंटलला २०० ते ३०० रुपयांनी वाढ झाली आहे. अशा साऱ्या महागाईमुळे कुटुंबांचे ‘बजेट’ कोलमडले आहे. सामान्य माणसांच्या प्रतिक्रियांमधून त्याबद्दलची चीड व्यक्त झाली. तसेच, व्यावसायिकांनी महागाईबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

लिटरभर पेट्रोलचा आजचा भाव १२० रुपये ९३ पैसे, तर डिझेलचा भाव १०३ रुपये ९२ पैसे आहे. पूर्वी इंधनाचा टँकर मागवण्यासाठी आम्हाला ६ लाख रुपये पुरेसे ठरायचे, आता मात्र बारा लाख रुपये कमी पडतात. व्यवसायातील गुंतवणूक एकीकडे वाढत असली, तरीही त्या तुलनेत कमिशन मिळत नसल्याने धंदा करणे कठीण झाले आहे. वाहनचालकांची ओरड महागाईबद्दल आम्हाला ऐकावी लागते.

- भूषण भोसले, अध्यक्ष, नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स वेल्फेअर असोसिएशन

नाशिक शहराबरोबरच पुणे- मुंबईच्या वाहनांसाठी दिवसाला २० हजार किलो सीएनजी गॅसची गरज भासते. महाराष्ट्र सरकारने १० टक्के वॅट कमी केल्याने सीएनजीचा भाव कमी झाला होता. आता केंद्र सरकारने कर वाढविल्याने किलोला ७१ रुपये द्यावे लागतात. भाववाढीचा आलेख पेट्रोल-डिझेलच्या गतीने वाढत गेल्यास सीएनजी गॅसचा व्यवसाय करणे अवघड होणार आहे.

- साहेबराव महाले, सीएनजी गॅस विक्रेते

घरगुती आणि व्यावसायिक गॅसच्या किमती वाढत चालल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या नाराजीला आम्हाला तोंड द्यावे लागते. जानेवारीपासूनचे घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचे भाव महिनानिहाय बदलत गेला आहे. घरगुती गॅसचे सिलिंडर जानेवारी ते २२ मार्चपर्यंत ९०३ रुपये ५० पैसे या भावाने विकले जात होते. २३ मार्चपासून आतापर्यंत हाच भाव ९५३ रुपये ५० पैसे असा आहे. व्यावसायिक गॅसचे सिलिंडर जानेवारीमध्ये २ हजार २ रुपये ५० पैसे, फेब्रुवारीमध्ये १ हजार ९११ रुपये, २२ मार्चपर्यंत २ हजार १६ रुपये ५० पैसे, २३ मार्चला २ हजार ८ रुपये ५० पैसे, तर आता २ हजार २६४ रुपयांना विकले जात आहे.

- रोहित वैशंपायन, संचालक, वैशंपायन गॅस एजन्सी

शेतमालाला एकतर अपेक्षित भाव मिळत नाही. त्यात महागाईचा डोंब उसळला असल्याने किराणा माल, गॅस सिलिंडर, कपडे, मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा करायचा, असा गंभीर प्रश्‍न तयार झाला आहे. शिवाय निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतीतून शाश्‍वत उत्पादन मिळेल, याची खात्री राहिलेली नाही. त्यामुळे आसमानी आणि सुलतानी संकटामुळे आम्ही शेतकरी पुरते बेजार झालो आहेत.

- मीराबाई मोराडे, शेतकरी, म्हसरुळ

परदेशी गुंतवणुकीचा डंका वाजवत रिफायनरीच्या नावाने मोठ्या कंपन्यांना परवानगी देत घरगुती आणि स्थानिक तेलघाणी बंद करण्याचा डाव आखला. आता खाद्यतेलाच्या किमती दुप्पटीने वाढविल्याने गरिबांचे कंबरडे मोडले आहे. त्याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची वेळ आली आहे.

- अभिजित भावसार, छोटे व्यावसायिक

खाद्यतेल, शेंगदाणे, डाळी, तांदूळ यावर सरकारने सबसिडी लागू करावी. तसेच सिलिंडर इतके महाग झाले आहे की घेणे परवडत नाही. जीवनावश्यक वस्तूंच्या दिवसेंदिवस किमती वाढत चालल्याने कुटुंबाचे अर्थकारण बिघडले आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी सर्व खर्च होत असल्याने बचत होत नाही.

- वेदश्री गवळी, गृहिणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Vikhe Patil Won Shirdi Assembly Election 2024 final result live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपाचे उमेदवार कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांना ५१७८ मतांची आघाडी घेतली

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT