कंधार : कंधार तालुक्यासह नायगाव व बिलोली तालुक्यातील सिंचनक्षेत्रात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या बारुळ (ता. कंधार) येथील निम्न मानार प्रकल्पातून उदगीर व जळकोट तालुक्यातील जवळपास दीडशे गावासाठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. पाईपलाइनसाठी खोदकाम सुरू करण्यात आल्यानंतर परिसरातील गावातून प्रचंड विरोध झाला. जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदने पाठवविण्यात आली. परंतू काही दिवसांपूर्वी योजनेसाठी आवश्यक पाईप येऊन पडल्याने ही योजना पुन्हा सुरू होण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून आगामी काळात कंधारवर अवकळा पसरणार, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
या प्रकल्पात परिसरातील २३ गावातील ग्रामस्थांच्या शेत जमिनी व घरे गेली आहेत. या धरणामुळे २४ हजार हेक्टरच्या आसपास शेती सिंचनाखाली येते. रब्बी व उन्हाळी पिकांना सुद्धा धरणाचा लाभ होतो. पिण्यासाठी १५ टक्के आणि ८० टक्के सिंचनासाठी असे प्रकल्पाच्या पाण्याचे नियोजन आहे. असे असले तरी लाभक्षेत्रातील गावांना पुरेसे पाणी मिळत नाही. उन्हाळ्यात अनेक गावात टंचाई निर्माण होते. प्रकल्पाच्या उद्देशाला हरताळ फासून लातूर जिल्ह्यातील उदगीर आणि जळकोटसाठी जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. लगेच उदगीरहून खोदकामास सुरुवातही करण्यात आली. दिग्रस (ता. कंधार) पर्यंत खोदकाम झाले.
याच्या विरोधात धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातील ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन त्वरित काम बंद करण्याचे ठराव पारित केले. शिवसेना (उबाठा) आणि संभाजी ब्रिगेडकडून धरणाचे पाणी पळविण्याच्या विरोधात आंदोलन, उपोषण करण्यात आले. चोहीकडून काम बंद करण्याचा रेटा सुरू झाल्याने योजनेच्या काम थांबवण्यात आले. आणि अचानक महिनाभरापूर्वी पाणीपुरवठा योजनेचे पाईप गउळ पर्यंत (ता.कंधार) येऊन पडल्याने योजनेचे काम पुनश्च सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. योजनेचे काम सुरू होत असल्याने लातूर समोर नांदेडची ताकद कमी पडली की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कंधारला दोन आमदार आणि दोन खासदार असताना धरणाचे तळे करण्याचा घाट घातला गेला. या प्रश्नावर राजकारणी मूग गिळून गप्प आहेत. कोणीच काही बोलत नाही. लोकप्रतिनिधी केवळ नालाच आहेत. आम्हीच याबाबत आवाज उठवून काम बंद पाडले होते. पुन्हा हे काम सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. लोकप्रतिनिधींनी आता तरी गंभीर व्हावे. धरणाचे पाणी बाहेर जिल्ह्यात गेल्यास येथील जनता त्यांना कधीच माफ करणार नाही.
- परमेश्वर जाधव, तालुकाप्रमुख, शिवसेना कंधार.
प्रकल्पाचे नाव-निम्न मानार प्रकल्प
नदीचे नाव मानार
एकूण पाणीसाठा ४६.९२१ दलघमी
उपयुक्त पाणीसाठा १३८.२९१ दलघमी
एकूण लाभक्षेत्र ३३ हजार २८८ हेक्टर
लागवडी योग्य लाभक्षेत्र २७ हजार ७४५ हेक्टर
सिंचन लाभक्षेत्र २३ हजार ३१० हेक्टर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.