माहूर : उन्हाच्या झळा वाढत असतानाच महावितरण कंपनीकडून शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात भारनियमन देखील सुरू करण्यात आले आहे. एकीकडे उन्हाचा पारा वाढत असताना दुसरीकडे भारनियमन केल्याने नागरिकांच्या जीवाची लाही लाही होत आहे. त्यामुळे वीज वापर करणाऱ्या नागरिकांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत.
ग्रामीण भागात दिवसाचे तीन व रात्रीचे तीन तास भारनियमन लागू करत असल्याचे वेळापत्रक महावितरणकडून निर्गमित केले आहे. देशभरात कोळशाचे संकट आणि वाढत्या उन्हाळ्यामुळे विजेची वाढती मागणी यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात भारनियमनाचे नियोजन करण्यात आले आहे. सुमारे तीन महिन्यांचे भारनियमन वेळापत्रक जाहीर करून जनतेला दणका दिला आहे.
माहूर तालुक्यातील वाई बाजार, आष्टा व वानोळा या वीज उपकेंद्रांमध्ये सहा तास, तीन तास दिवस रात्र या प्रमाणे भारनियमन लागू असेल तर रेणुका देवी मंदिर, दत्त शिखर संस्थान व माहूर शहरात दिवसा अडीच तास व रात्री अडीच तास या प्रमाणे पाच तास भारनियमन राहील, अशी माहिती उपकार्यकारी अभियंता कोटे यांनी दिली आहे. भारनियमन नियोजनातून शेतकी कृषी पंप व उद्योजकांना वगळण्यात आल्याने एक प्रकारे त्यांना दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांना पहिल्या प्रमाणेच आठ तास वीज पुरवठा केला जाणार आहे. सध्या माहूर तालुक्यात उन्हाचा पारा सध्या ४० अंशावर आहे. याही पेक्षा भारनियमनच्या आधीपासूनच माहूर तालुक्यात विजेचा लपंडाव नित्याची बाब बनलेली आहे. त्यात भारनियमन लादणे म्हणजे हे वीज ग्राहकांना वेठीस धरण्यासारखे असल्याची तक्रार वीज ग्राहक करत आहेत.
विजेची बचत करणे म्हणजे वीज निर्माण केल्यासारखे आहे. अनावश्यक वीज वापर टाळा. अनधिकृत वीज वापर करणाऱ्यांनी त्यांची वीज जोडणी नियमित करून घ्यावी. सध्या परिपत्रकानुसार पाच ते सहा तास या प्रमाणे भारनियमन लागू असेल. यामध्ये बदल होऊन भारनियमनामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. वीज चोरी थांबवण्यासाठी विभागाच्या पथकाने माहूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये तपासणी करून अनाधिकृत वीज वापर करणाऱ्यांचे विद्युत साहित्य जप्त केले असून ही कार्यवाही नियमित सुरू राहील.
- एन. पी. कोटे, उपकार्यकारी अभियंता, महावितरण,माहूर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.