नांदेड - कोरोनाचे रुग्ण वाढल्याची धसकी... त्यातच तो कुठे निघाला आणि किती निघाले?, याची अनेकांना काळजी लागलेली असते. यात गांभीर्यपूर्वक प्रसिद्धीपत्रक काढण्याची जबाबदारी असलेल्या संबंधित विभागाकडून किरकोळ पण महत्वाच्या चुका होत आहेत. त्यामुळे भविष्यात गंभीर प्रसंग ओढवू शकतो. ‘ध’ चा ‘मा’ होत असल्यामुळे नांदेडकर बुचकळ्यात पडत आहेत. त्यामुळे असे असेल तर जबाबदारी कोणाची? आणि त्यावर काय कारवाई होणार? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
नांदेडला लॉकडाउनच्या पहिल्या टप्यात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही. दुसऱ्या टप्यात मात्र, रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. एक एक करत आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा ११० वर जाऊन पोहचला आहे. त्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर ३६ रुग्ण निगेटिव्ह आढळून आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. पण अजूनही दोन पॉझिटिव्ह रुग्णांचा शोध लागला नसून ते फरारच आहेत.
चुकांची जबाबदारी कोणाची?
जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोरोना रुग्णांसंदर्भात माहिती देण्यात येत आहे. मात्र, सदरील माहिती देत असताना त्यात चुका आढळून येत आहेत. बुधवारी (ता. २०) चार पॉझिटिव्ह रुग्ण निघाल्यानंतर त्यामधील एक श्रेय नगर येथील असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे प्रसारमाध्यमाद्वारे काही ठिकाणी ही माहिती गेली. श्रेयनगर कुठे आहे? याचा शोध सुरु झाला. त्यासाठी विचारणा झाली? एवढेच नव्हे तर गुगल मॅपचाही काहींनी आधार घेतला. काहींना हे नगरच सापडले नाही? त्यामुळे पुन्हा प्रशासनाकडे विचारणा झाल्यावर श्रेयनगर नव्हे तर स्नेहनगर पोलिस कॉलनी अशी दुरुस्ती करण्यात आली.
दोन फरारचे पत्तेच अर्धवट
कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असेल तर त्याची सर्व नोंद ही अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी कोणाची? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण अजूनही दोन पॉझिटिव्ह रुग्ण फरारच आहेत. ते सापडले नसल्यामुळे पुढील अडचणींचा सामना कोणाकोणाला करावा लागत आहे? हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्याचबरोबर याबाबत प्रसारमाध्यमांनी विषय मांडल्यानंतर महापालिका प्रशासन गुन्हा दाखल करुन मोकळे झाले. आता वजिराबादचे पोलिस त्यांना शोधत आहेत. पण त्यांच्यापुढे अडचण आहे ती पत्ता व्यवस्थित नसल्याची. पत्ता नीट नसल्यामुळे पोलिसांनी फरार आरोपी सापडत नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता रुग्णांची नोंद व्यवस्थित घेण्याची जबाबदारी कोणाची? असा प्रश्न आहे.
हेही वाचलेच पाहिजे - नांदेडला कोरोनाचा धक्का अन् दिलासाही...
कोण करणार कुणावर कारवाई?
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची सविस्तर माहिती घेण्याची आणि ती जतन करुन ठेवण्याची जबाबदारी कोणाची? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्याचबरोबर रुग्णांचे पूर्ण नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक आदींची माहिती लिहण्याबाबतचा कंटाळा कोणाला आहे? हे देखील तपासणे गरजेचे आहे. त्यामुळे भविष्यात एखादी गंभीर घटना घडण्याआधीच त्याकडे लक्ष देण्याची आणि तशी कार्यवाही करण्याची गरज आहे. आता याबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन, पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंह बिसेन यांनी अधिक लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
माहिती देण्याची वेळ ठरवावी
दिल्लीला केंद्र सरकारच्या वतीने आरोग्य विभाग दररोज सायंकाळी वेळ देऊन प्रसारमाध्यमांना माहिती देत आहे. मग नांदेडलाच का वेळी, अवेळी माहिती प्रसारित होते. रात्री साडेदहा वाजता तर कधी सकाळीच आठ वाजता माहिती देण्यात येते. त्यामुळे सर्वांचीच धावपळ होते. त्यातूनही मार्ग काढण्यात यावा आणि दररोज माहिती देण्याची वेळ निश्चित करावी, जेणेकरुन माहिती अचूक आणि बिनचूक जनतेपर्यंत जाईल, अशी मागणीही या निमित्ताने होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.