नांदेड - विष्णुपुरी प्रकल्पात असलेला पाणीसाठा आणि उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेऊन नांदेड महापालिकेने गुरुवारपासून (ता. २८) तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या दोन दिवसांआड पाणीपुरवठा सुरू असून विष्णुपुरी प्रकल्पात जूनअखेरपर्यंत, म्हणजेच दोन महिने पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे.
नांदेड शहराला गोदावरी नदीवरील विष्णुपुरी प्रकल्पातून तसेच आसना नदीच्या सांगवीतील बंधाऱ्यातून पाणीपुरवठा करण्यात येतो. सध्या विष्णुपुरी प्रकल्पात २४.५१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक आहे. तर इसापूर प्रकल्पातून आसना नदीच्या सांगवीतील बंधाऱ्यात जवळपास एक दलघमी पाणीसाठा आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता आणि उन्हाळा वाढला तर पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी नांदेड शहराला तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांनी दिली.
हेही वाचा - अशोक चव्हाण मुंबईत दाखल, प्रकृती ठणठणीत...
आयुक्तांनी घेतला आढावा
महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी पाणीसाठा आणि पाणीपुरवठ्याबाबत नुकतीच आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला असल्याची माहिती श्री. अंधारे यांनी दिली. गेल्या वर्षी नांदेडला जून ते आॅगस्ट या तीन महिन्यांत कमी पाऊस झाला. ता. दोन सष्टेंबरला चांगला पाऊस झाल्यामुळे विष्णुपुरी प्रकल्पात पाणीसाठा झाला होता. त्यामुळे मागील पाण्याची टंचाई लक्षात घेता उपाययोजना करण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत अंतेश्वर बंधाऱ्यातून वीस आणि दिग्रस बंधाऱ्यातून वीस, असे एकूण ४० दलघमी पाणी विष्णुपुरी प्रकल्पात मागविण्यात आले असल्याची माहितीही श्री. अंधारे यांनी दिली.
दररोज लागते ९० ते ९५ एमएलडी पाणी
नांदेड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी एका वेळेस जवळपास ९० ते ९५ दशलक्ष लिटर (एमएलडी) एवढे पाणी लागते. महापालिकेचे ३९ जलकुंभ असून त्यापैकी ३६ जलकुंभांद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. शहरात जवळपास एक हजार किलोमीटर पाइपलाइन असून सध्या नळजोडणीची संख्या जवळपास ५८ हजार इतकी आहे. त्याचबरोबर शहरातील वेगवेगळ्या भागात असलेल्या विंधन विहिरी आणि हातपंपांच्या माध्यमातूनही पाणीपुरवठ्याची सोय करण्यात आल्याची माहिती श्री. अंधारे यांनी दिली.
हेही वाचलेच पाहिजे - पावसाळापूर्व कामांना कर्मचारी कमतरतेचा अडसर...; तरीही कामे सुरु...
विष्णुपुरीच्या पाण्यासाठी सहा पथके
विष्णुपुरी प्रकल्पात सध्या २४.५१ दलघमी पाणीसाठा असून दररोज ०.४१ दलघमी पाणीसाठा कमी होत आहे. त्यामुळे साधारणतः एका महिन्यात बारा दलघमी पाणी कमी होत आहे. ही परिस्थिती पाहता आगामी जूनअखेरपर्यंत पाणीपुरवठा होऊ शकतो. विष्णुपुरीतील पाण्याचा अपव्यय होऊ नये आणि शेतकऱ्यांनी अवैध पाणी उपसा करू नये, यासाठी गेल्या १४ तारखेपासून सहा पथकांची स्थापना करून त्याद्वारे गस्त घालण्याची आणि कार्यवाहीची प्रक्रिया सुरू आहे. तसेच गोदावरी नदीच्या दोन्ही काठांवर असलेले एक्सप्रेस फीडरही एक दिवसाआड चालू ठेवण्यात येत असल्याची माहिती श्री. अंधारे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.