नांदेड : जनतेने मनामध्ये कोणतीही शंका न बाळगता कोव्हिड -19 चे लसीकरण करून घ्यावे, तसेच उपलब्ध असलेल्या दोन्ही प्रकारच्या लस सुरक्षीत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो महाराष्ट्र आणि गोवा राज्य, पुणे यांच्यावतीने कोव्हिड -19 लसीकरण तसेच आत्मनिर्भर भारत अभियान या विषयावर बहुमाध्यम चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती अभियानाच्या उदघाटन प्रसंगी आज जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हा माहीती अधिकारी विनोद रापतवार, क्षेत्रीय लोकसंपर्क ब्यूरो, नांदेडचे प्रचार अधिकारी माधव जायभाये, सहायक प्रचार अधिकारी सुमीत दोडल आदी मान्यवर उपस्थित होते.
सुरक्षित अंतर व शासनाने निर्गमित केलेल्या सूचना लक्षात घेवून जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांपर्यत कोरोना लसीकरण व उपाययोजनाबाबत वेळोवेळी संदेश पोहचणे तेवढेच अत्यावश्यक आहे असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट करुन कोरोना बरा करण्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनच लागते ही निर्माण झालेली अंधश्रध्दा प्रत्येकाने दूर केली पाहीजे असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.
हेही वाचा - आम्ही प्रयत्नांची पराकाष्टा करु; नांदेडकरांनो गतवर्षीसारखे सहकार्य द्या- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
जनजागृतीच्या या उपक्रमातून जनतेच्या मनातील लसीकरणाबाबातच्या शंका दुर होऊन अधिकाधिक जनता लसीकरण करून घेईल. असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी जनतेने आवश्यकतेनुसार घराबाहेर पडावे तसेच मास्कचा वापर, किमान 6 फुटाचे अंतर तसेच वेळोवेळी हाताची स्वच्छता करणे या त्रीसूत्रीचा अवलंब करणे गरजेचे आहे असे सांगून या त्रीसूत्रिचा वापर आणि लसीकरण केले तरच आपल्याला कोरोना आजारावर मात करता येईल यासाठी जनतेने सहकार्य करावे असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी केले.
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात या बहुमाध्यम चित्ररथाचे उदघाटन आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून तसेच फित कापून करण्यात आले. या बहुमाध्यम चित्ररथामध्ये शाहीर रमेश गीरी आणि सहकारी यांच्याद्वारे गीत व नाटक सादरीकरणाच्या माध्यमातून कोरोना लसीकरण, आत्मनिर्भर भारत, शासनाच्या विविध योजना आणि उपक्रमांची जनजागृती करण्यात येणार आहे. या प्रचार मोहिमेचा मुळ उद्देश हा लोकांपर्यत लसीकरण मोहिमेची खरी माहिती देऊन त्यांचा संभ्रम दूर करणे हा आहे.
“लोकल फॅार व्होकल ” हे ब्रीद वाक्य घेऊन राबविण्यात येत असलेल्या आत्मनिर्भर भारत अभियान या योजनेची माहिती ग्रामीण भागातील लोकांना देण्याचे अमुल्य कार्य या जनजागृती अभियानातून केले जाणार आहे. तसेच एलईडी डिस्प्लेच्या माध्यमातूनही संदेश दाखविण्यात येणार आहेत. तसेच श्राव्य संदेशाचाही समावेश या चित्ररथात करण्यात आला आहे.
पुढील 20 दिवस नांदेड जिल्ह्यातील लोहा, कंधार, मुखेड, भोकर, उमरी, हदगाव तसेच नांदेड या तालुक्यातील ग्रामीण भागात तसेच शहरी भागातून या चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.