नांदेड ः दक्षिण मध्य रेल्वे विभाग मराठवाड्यातील प्रवाशांवर अन्याय कसा करतो आणि तोंडाला पाने कशी पुसतो, याचे ताजे उदाहरण म्हणजे सध्या सुरु केलेल्या किंवा घोषणा केलेल्या दिवाळी दसरा स्पेशल रेल्वे. ज्यामध्ये नांदेड विभागात मराठवाड्यातून केवळ सचखंड, नांदेड-मुंबई आणि पुर्णा-पाटना या रेल्वे सध्या सुरु आहेत. तर आंध्र आणि तेलंगणात सिंकदराबाद विभागात शंभर विशेष सुरु करण्याच्या निर्णय घेतला. त्यातील काही रेल्वे सुरु पण झाल्या आणि काही होणार आहेत.
लॉकडाउननंतर तब्बल सहा महिन्यानंतर रेल्वे विभागाने काही गाड्यांची सुरूवात केली. एकीकडे महाराष्ट्र परिवहन मंडळ पूर्ण क्षमतेने एसटी चालवित असताना रेल्वे विभाग मात्र एसी आणि श्रीमंत वर्गाच्या प्रवाश्यांची काळजी घेत केवळ एक्सप्रेस, मेल, एसी गाड्यांना प्राधान्य देऊन सुरू करत आहे. त्याच वेळी विभागातील मराठवाडा, पुणे, मुंबई तसेच सवारी गाड्यांना रद्द ठेऊन गोरगरिब आणि मध्यमवर्गीय लोकांना रेल्वे सुविधांपासून वंचित केले आहे. ऐन दसरा व दिवाळीला विभागातील मराठवाडा एक्सप्रेस, पुणे, पनवेल, गंगानगर, अकोला, कोल्हापूर इत्यादी शहरांना जोडणारी रेल्वे नाही, सवारी गाड्यांची सोय नाही.
मराठवाड्यात रेल्वे सुरू करा, अन्यथा रेल रोको
रेल्वे सेवा हळूहळू पूर्वपदावर येत असताना दक्षिण मध्य रेल्वे मराठवाड्याला वगळून आपल्याच भागात रेल्वे सुरू करत आहे. विभागात मराठवाडा एक्सप्रेस, नांदेड-पनवेल, नांदेड-गंगानगर, नागपूर-कोल्हापूर, अकोला-काचिगुडा, इत्यादी रेल्वेंची मागणी असूनही ती सुरू न केल्याचा निषेधार्थ रेलरोको करण्याचा इशारा मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने दिला आहे. सध्या सुरू असलेल्या दसरा आणि दिवाळीचा लक्षात घेता २५ ऑक्टोबरपर्यंत रेल्वे प्रशासनाने मराठवाडा एक्सप्रेस, तपोवन, नांदेड-पनवेल, नांदेड-गंगानगर, नांदेड-पुणे, कोल्हापूर-नागपूर, काचिगुडा-अकोला/नरखेडा, तसेच विभागातील सवारी गाड्या पूर्ववत सुरू करण्यात यावेत, अन्यथा परभणी स्थानकावर रेल रोको करण्याचा इशारा मराठवाडा रेल्वे प्रवाशी महासंघाचे अरुण मेघराज, राजेंद्र मुंडे, प्रा.सुरेश नाईकवाडे, संभानाथ काळे, रितेश जैन, डॉ. राजगोपाल कालानी, प्रवीण थानवी, श्रीकांत गडप्पा, रवींद्र मूथा, बाळासाहेब देशमुख, कादरीलाला हाशमी, ॲड.अटल पुरुषोत्तम यांनी दिला.
या पॅसेंजर रेल्वेंना एक्सप्रेसचा दर्जा
रेल्वे बोर्डाने काही पॅसेंजर रेल्वेगाड्यांना सणासुदीच्या काळात एक्स्प्रेस गाड्या म्हणून चालविण्याची मान्यता दिली आहे. रेल्वेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांनी काही रेल्वेगाड्यांच्या दर्जामध्ये सद्यस्थितीत बदल करण्यासंदर्भात शिफारस केली होती. त्यानुसार पॅसेंजर ट्रेनला एक्स्प्रेसचा दर्जा देण्यास रेल्वे बोर्डाने मान्यता दिली. त्यात पुणे - निजामाबाद- पुणे (५१४२१/२२), निजामाबाद - पंढरपूर - निजामाबाद (५१४३३/३४), दौंड - नांदेड - दौंड (५७५१५/१६), हैदराबाद - पूर्णा - हैदराबाद (५७५४७/४८), हैदराबाद - औरंगाबाद - हैदराबाद (५७५४९/५०), काचिगुडा - नगरसोल - काचिगुडा (५७५६१/६२), हैदराबाद - परभणी - हैदराबाद (५७५६३/६४), अकोला - पूर्णा - अकोला (५७५८३/८४) या गाड्यांचा समावेश आहे.
प्रवाशांची गैरसोय करणारा विभाग
कोरोना काळानंतर देशभरात सुरु झालेल्या विशेष रेल्वे मराठवाडा भागातून जास्तीत जास्त प्रमाणात सुरु होणे गरजेचे होते. मात्र, आपल्याच विभागात बोटावर मोजण्याइतक्या रेल्वे चालू करुन प्रवाशांची गैसोय केली जात आहे. औरंगाबाद, पुणे, मुंबईसाठी मराठवाडा, तपोवन, पनवेल, पुणे सुपरफास्ट रेल्वे सुरु कराव्यात, तरच अनेकांना ये-जा करणे सोयीचे होईल.
- रितेश जैन-झांबड, उपाध्यक्ष, मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघ, परभणी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.