नांदेड : राज्य परिवहन मंत्री अनिल परब यांनी बुधवारी (ता.१९) राज्यांतर्गत बससेवा सुरु करण्याची घोषणा केली. त्यानुसार नांदेड विभागातून २०० बसचे नियोजन करण्यात आले होते. परंतू गुरुवारी (ता.२०) सकाळी दहा वाजेपर्यंत केवळ ४५ बसेस धावू शकल्या अशी माहिती वरिष्ठ विभागीय अधिकारी अविनाश कचरे यांनी दिली.
यापूर्वी समांतर अंतर राखत जिल्ह्यांतर्गत दिवसाला ७७ बस धावत होत्या. परंतू अनेक ठिकाणच्या बसस्थानकात पुरेशी प्रवाशी संख्या नसल्याने महामंडळाच्या बसला चांगलाच घाटा सहन करावा लागत होता. परंतु गुरुवारापासून सुरु करण्यात आलेल्या राज्यांतर्गत बससेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पहिल्याच दिवशी नांदेड विभागातील नांदेड, भोकर, मुखेड, देगलूर, कंधार, हदगाव, बिलोली आणि माहूर या आगारातून बस सोडण्यात आल्या आहेत. मात्र किनवट आणि माहूर तालुक्यातून जाणाऱ्या रस्त्यावरील पूल तुटल्याने दोन्ही आगारातून बस धावू शकल्या नाही. माहूर - किनवट मार्गाला पर्यायी रस्ता म्हणून महामंडळाच्या काही बसेस ह्या टेभूर्णी मार्गे सोडण्यात आल्या आहेत.
हेही वाचा- राज्यातील २३६ महिला चालकांना कामावर परतण्याची आस
बसची चाके थांबल्याने प्रवाशांनाच नव्हे तर, चालक, वाहक व इतर कर्मचाऱ्यांना फटका
रोज लाखो रुपयाचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या बसची चाके थांबल्याने केवळ प्रवाशांनाच नव्हे तर, चालक, वाहक व इतर कर्मचाऱ्यांना देखील त्याता फटका सहन करावा लागला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यापासून ते चतुर्थ कर्मचाऱ्यांचे पगार करण्याइतके पैसे देखील महामंडळाच्या तिजोरीत शिल्लक राहिले नाहीत.
हेही वाचा- नांदेडमधील एका लग्नाची अशीही गोष्ट, आरोप- प्रत्यारोपाने गाजली
जिल्ह्यातील या आगारातून इथे सोडण्यात आल्या बसेस
नांदेडहून- बीड, सोलापूर, सातारा, नागपूर
भोकर- नगर, अक्कलकोट, लातूर
मुखेड- पुणे, सोलापूर, सिंगणापूर, अमरावती
देगलूर- औरंगाबाद
कंधार- नागपूर (दोन बस)
हदगाव- आकोला, औरंगाबाद
बिलोली- रिसोड, औरंगाबाद, आमरावती
माहूर- टेभूर्णी मार्गे परळी आणि आमरावती या मार्गावर सकाळी दहा वाजेपर्यंत ४५ बसेस सोडण्यात आल्या आहेत.
शुक्रवारी ३०० बस सोडण्यात येतील
प्रवाशांचा प्रतिसाद कसा मिळतो यावर बस फेऱ्यांचे नियोजन करण्यात येत आहे. पहिल्या दिवशी २०० बसचे नियोजन करण्यात आले आहे. परंतु पावसामुळे अनेक मार्गावर बस धावू शकल्या नाहीत. शुक्रवारी ३०० पर्यंत बस फेऱ्या वाढवण्यास उत्सुक असलो तरी, सर्व काही पावसावर अवलंबून असेल.
-अविनाश कचरे (वरिष्ठ विभागीय अधिकारी)
|