नांदेड : गेल्या काही महिन्यापासून खून, खुनाचा प्रयत्न, लुट, दरोडे, चोरी, घरफोडी आदी घटनांमध्ये वाढ होत आहे. या घटनांमधील बऱ्याच गुन्हेगारांना पकडून पोलिसांनी जेलची हवा दाखवली आहे. मात्र, गुन्ह्यांचे प्रमाण अजूनही नियंत्रणात आले नाही. त्यामुळे आता पोलिसांनी वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी तसेच त्या रोखण्यासाठी वेगवेगळ्या गुन्ह्यातील आरोपींसह संशयित आणि रेकॉर्डवरील आरोपींची धरपकड सुरू केली आहे.
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरनंतर नांदेड दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे. नांदेडचा दिवसेंदिवस वाढता विस्तार आणि विविध शैक्षणिक संस्था यामुळे नांदेडची ओळख शैक्षणिक हब म्हणून होत आहे. राज्यातून शिक्षणासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने नांदेडला येत आहेत. तसेच नांदेड जिल्हा हा तेलंगणा आणि कर्नाटक या दोन राज्याच्या सीमेवर आहे.
तसेच नांदेडला असलेल्या रेल्वेस्थानकावरून देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जाण्यासाठी रेल्वे उपलब्ध आहे. मात्र, याचा फायदा गुन्हेगार घेत आहेत. गुन्हेगारांना पळून जाण्यासाठी आणि लपून राहण्यासाठी सोयीचे ठरत आहे. पोलिस विभागाच्या वतीने वेळोवेळी कारवाई करण्यात येत असते. मात्र, असे असले तरी त्यांच्या कारवाईला अपुरे मनुष्यबळ आणि इतर अडचणी येत असतात. दुसरीकडे शहरासह जिल्ह्याची वाढती व्याप्ती लक्षात घेऊन पोलीस आयुक्तालयाचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता.
मात्र, त्यावर अजूनही निर्णय झाला नाही. गेल्या अनेक महिन्यापासून निर्णय प्रलंबित आहे. त्याचबरोबर राजकीय उदासिनताही त्यास कारणीभूत ठरत आहे. गेल्या काही दिवसांपासून विशेष करून शहर आणि शहरालगत असलेल्या नगरांमध्ये गुन्हे घडण्याचे प्रमाणही वाढले आहे. गुन्हेगारीच्या घटनांमध्ये आरोपी असलेल्या तरूणांची संख्या जास्त आहे. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिस विभागाकडून देखील सडेतोड उत्तर मिळायला हवे, तरच वचक निर्माण होईल, आणि गुन्हेगारी नियंत्रणात येईल, अशी अपेक्षा नांदेडकरांनी व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.